Pune Traffic News : नऱ्हे परिसरातील भुमकर चौक अंडरपास ते श्री कंट्रोल चौक या दरम्यान जड वाहनांना बंदी, जाणून घ्या महत्त्वाचे बदल

सिंहगड रस्त्यावरील भुमकर चौक अंडरपास ते नऱ्हे गावातील श्री कंट्रोल चौक या दरम्यान 'पिक अवर्स'दरम्यान अवजड वाहनांना बंदी घालण्याचे आदेश पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी दिले आहेत.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Yogesh Sangale
  • Sat, 11 Jan 2025
  • 05:09 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

सिंहगड रस्त्यावरील भुमकर चौक अंडरपास ते नऱ्हे गावातील  श्री कंट्रोल चौक या दरम्यान 'पिक अवर्स'दरम्यान अवजड वाहनांना बंदी घालण्याचे आदेश पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी दिले आहेत. या भागात सततच्या गंभीर अपघातांच्या पार्श्वभूमीवर सकाळी सात ते अकरा आणि सायंकाळी पाच ते रात्री नऊ यावेळेत जड वाहनांना बंदी घालण्यात येणार आहे.

सिंहगड रस्ता वाहतूक विभागाच्या हद्दीमधील भुमकर चौक अंडरपास, नऱ्हे, धायरीगाव, मानाजीनगर या भागाचा नव्याने पुणे महापालिकेत समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे या परिसरातील रहिवाशांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणावर घरे तसेच इमारतींची बांधकामे सुरू आहे. नऱ्हे परिसरात औद्योगिक  क्षेत्र असल्याने या भागात जाणारी जड वाहने ही भुमकर चौकातून येजा करत असतात. ही जड वाहने तसेच स्थानिक नागरिक दळणवळणाकरिता भुमकर चौक ते  श्री कंट्रोल चौक हाच रस्ता प्रामुख्याने वापरतात. या भागात शाळा, महाविद्यालय तसेच हॉस्पिटल असल्याने 'पिक अवर्स'दरम्यान या भागात मोठ्या प्रमाणात वाहतूक असते. तसेच,  भुमकर चौक ते कंट्रोल चौक हा रस्ता अरुंद आहे. त्यामुळे जड वाहतूकीमुळे या भागात वारंवर वाहतूक कोंडी होत असते. त्यामुळे स्थानिक नागरिक त्रस्त झाले आहेत. स्थानिकांनी याबाबत वारंवार तक्रारी केल्या आहेत.

या सगळ्यांची दखल घेऊन नागरिकांना  पोहचणारा धोका, अडथळा आणि गैरसोय टाळण्यासाठी पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी या भागातील जड वाहतुकीच्या संदर्भात आदेश काढले आहेत.  सिंहगड रस्त्यावरील भुमकर चौक अंडरपास ते नऱ्हे गावातील  श्री कंट्रोल चौक या दरम्यान 'पिक अवर्स'दरम्यान अवजड वाहनांना बंदी घालण्यात येणार असल्याचे या आदेशामध्ये म्हटले आहे. नमूद वेळेत सर्व प्रकारच्या जड, अवजड, मंदगती वाहनांची वाहतूक तसेच पार्किंग करण्यास बंदी घालण्यात येत असल्याचे पोलीस उपायुक्त झेंडे यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे. दरम्यान, फायरब्रिगेड, पोलीस वाहने, रुग्णवाहीका यांसारख्या अत्यावश्यक सेवेतील वाहनांना यामधून सूट देण्यात आली आहे.  

सिंहगड रस्त्यावर 'या' ठिकाणी वाहने लावण्यास मनाई
सिंहगड रस्ता वाहतूक विभागाअंतर्गत वाहतूक सुरक्षित आणि सुरळीत होण्याच्या उद्देशाने  सिंहगड रस्त्यावरील मॅकडोनल्डस् उपहारगृहसमोर दोन्ही बाजूस ५० मीटर अंतरापर्यंत सर्व प्रकारची वाहने लावण्यास मनाई करण्यात आली आहे. याबाबत नागरिकांच्या काही हरकती किंवा सूचना असल्यास वाहतूक पोलीस उपायुक्त कार्यालय, येरवडा, गोल्फ क्लब रस्ता येथे लेखी स्वरुपात कळावाव्या, असे आवाहन पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी केले आहे.

Share this story

Latest