गेल्या काही दिवसांपासून पुण्यात सुरू असलेल्या अवकाळी पावसाने मंगळवारी (दि. २०) तुफान रुप धारण केलं. फक्त दोन तासांच्या पावसात संपूर्ण शहर जलमय झालं. दुपारी तीन वाजल्यापासून वातावरणात बदल होऊन पावसाला सुरूवात झाली, आणि त्यानंतर मुसळधार पावसामुळे रस्ते, चौरस्ते, गल्लीबोळ सगळेच पाण्याखाली गेले.
वाहतूक पूर्णपणे ठप्प
सिंहगड रोड, डेक्कन, बाणेर, कात्रज चौक या प्रमुख भागांमध्ये पावसामुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. रस्त्यांवर साचलेल्या पाण्यामुळे वाहने रस्त्यातच अडकली, काही ठिकाणी वाहने वाहूनही गेल्याचे दृश्य दिसून आले. शहरातील नागरिक आणि चाकरमानी वर्गाला प्रचंड हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या.
पावसामुळे 50 हून अधिक झाडपडीच्या घटना
पुणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरात तब्बल 54 झाडपडीच्या घटना नोंदवण्यात आल्या आहेत. या घटनांमध्ये धानोरी, एरंडवणे, येरवडा, हडपसर, कोथरुड आणि कर्वेनगर भागांचा समावेश आहे.तसेच दोन ठिकाणी भिंती कोसळल्याच्या घटना घडल्या. धनकवडीतील तीन हत्ती चौक आणि हिंगणे खुर्द येथील अक्षय कॉम्प्लेक्समध्ये भिंत पडल्याचे वृत्त आहे.
- पावसाने उघड केला पालिकेचा भोंगळ कारभार
पावसामुळे पुण्यात पालिकेच्या व्यवस्थापनातील त्रुटी पुन्हा समोर आल्या. पावसाळ्यापूर्वी नालेसफाई आणि ड्रेनेज व्यवस्था सुदृढ करण्यात आल्याचे महापालिकेने जाहीर केले होते. मात्र प्रत्यक्षात रस्ते पाण्याने भरले, नाले तुडुंब भरले आणि वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागला. कात्रज चौक, येरवडा, कल्याणी नगर परिसरात रस्त्यावर पाणीच पाणी, तर खड्ड्यांमुळे वाहनचालकांनी धोका पत्करून प्रवास केला.
हवामान खात्याचा पुढील ६ दिवसांचा अंदाज
पुणे वेधशाळेने पुढील ६ दिवस ढगाळ वातावरण आणि वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे शहर प्रशासन आणि नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.