सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या
लग्नात ठरलेल्या हुंड्यातील वस्तू दिल्या नसल्याने सासरच्या मंडळींकडून सातत्याने त्रास दिला जात होता. अखेर मानसिक आणि शारीरिक त्रासाला कंटाळून २३ वर्षीय विवाहित महिलेने गळफास घेवून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना हिंजवडीतील मारुंजी वस्ती परिसरात रविवारी (दि. २१) घडली.
या प्रकरणी विवाहित महिलेचे वडील तुकाराम सुदाम केंद्रे (वय ५३, धंदा मोलमजुरी, रा. यलदरवाडी ता. अहमंदपुर जि. लातुर) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, विवाहिचे पती राहुल सदाशीव कराड, सासरे सदाशीव कराड आणि सासू विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हिंजवडी पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, २३ वर्षीय महिलेचा ७ मे २०१९ रोजी राहुल सोबत लग्न झाले होते. मात्र, लग्नातील ठरलेल्या हुंड्यामध्ये बोली केलेला बेड आणि गादी मुलीच्या वडीलांनी दिला नव्हता. त्यामुळे सुरूवातीच्या दिवसापासूनच महिलेला सासरच्या मंडळींनी त्रास द्यायला सुरूवात केली. हुंड्यामध्ये बोली केलेला बेड आणि गादी दिली. त्यामुळे, टेम्पो घेण्यासाठी माहेरहून १ लाख रुपये आण, अशी मागणी सासरच्या मंडळींकडून महिलेकडे सासत्याने केली जात होती.
विवाहितेचे सासरच्या मंडळींची मागणी पुर्ण न केल्यामुळे तिला सातत्याने धमकावून मानसिक आणि शारीरिक त्रास दिला जात होता. अखेर सासरच्या त्रासाला कंटाळून २३ वर्षीय विवाहितेने राहत्या घरामध्ये गळफास घेऊन आत्म हत्या केली. या प्रकरणी विवाहितेचे वडील तुकाराम केंद्रे यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार विवाहिचे पती राहुल सदाशीव कराड, सासरे सदाशीव कराड आणि सासू यांच्या विरोधात कलम ३०६,३०४ (ब), ४९८ (अ), ५०६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंजवडी पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.