पुणे : श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यात चार लाख ९० हजार वारकरी सहभागी झाल्याची माहिती आर्टीफिशियल इंटलिजन्स तंत्रज्ञानाद्वारे करण्यात आलेल्या मोजणीतून मिळाली आहे. पालखी सोहळ्यात गर्दीचे नियंत्रण, तसेच व्यवस्थापन करण्यासाठी यंदा पहिल्यांदाच पुणे पोलिसांनी एआय तंत्रज्ञानाचा वापर केला. त्याद्वारे पोलिसांनी पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या वारकऱ्यांची संख्या मोजली.
पालखी सोहळ्यात यंदा सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांची नोंद करण्यासाठी पोलिसांनी एआय तंत्रज्ञानावर आधारित कॅमेऱ्यांची मदत घेतली. श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्यात दोन लाख ९५ हजार वारकरी सहभागी झाले होते. तर श्री तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यात एक लाख ९५ हजार वारकरी सहभागी झाल्याची नोंद करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार, पालखी सोहळ्यातील वारकरी, वाहनांची नोंद एआय प्रणालीद्वारे करण्यात आली. या तंत्रज्ञानामुळे गर्दीचे व्यवस्थापन, नियोजन आणि वाहतूक नियोजनात मदत झाली. पालखी सोहळा शुक्रवारी (२० जून) शहरात दाखल झाला. संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यासोबत एक लाख ९५ वारकरी आणि दिंडीतील ६०० वाहने शहरात दाखल झाली . त्यानंतर आलेल्या ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यासोबत दोन लाख ९५ हजार वारकरी बांधव आणि दोन हजार वाहने शहरात दाखल झाली होती. ही माहिती एआय तंत्रज्ञानावर आधारित विश्लेषणातून करण्यात आली.
या ठिकाणी बसविले होते कॅमेरे
पोलिसांनी पालखी मार्गावर वेगवेगळ्या भागात एआय तंज्ञज्ञानावर आधारित कॅमेरे बसविले होते. पुणे-मुंबई रस्त्यावरील नरवीर तानाजीवाडी, संचेती रुग्णालय, शिमला ऑफिस चौक, खंडोजीबाबा चौक, लक्ष्मी रस्ता या भागात हे कॅमेरे बसविण्यात आले. या कॅमेऱ्यांनी केलेली नोंद आणि माहितीचे विश्लेषण करण्यात आले. पालखी प्रस्थान सोहळ्यात हे कॅमेरे प्रस्थान मार्गावर बसविण्यात आले होते.
यंदाच्या पालखी सोहळ्यात आर्टीफिशियल इंटलिजन्स तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला. पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या वारकऱ्यांची संख्या विचारात घेता या तंत्रज्ञानाचा वापर करुन नियोजन, अंमलबजावणी, तसेच विश्लेषण करण्यात आले. पोलिसांच्या कडक बंदोबस्तासह आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेण्यात आली.
- अमितेश कुमार, पोलीस आयुक्त, पुणे