अखेर बांधकाम विभागाला आली जाग

कुंजीरवाडी ग्रामपंचायत हद्दीतील (तालुका- हवेली) थेऊरफाटा येथील रेल्वे उड्डाणपुलावर कठड्याला धडकून अनेक निष्पाप नागरिकांना नाहक आपला जीव गमवावा लागला आहे,

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Sat, 11 Jan 2025
  • 02:07 pm

संग्रहित छायाचित्र

'सीविक मिरर'च्या वृत्ताची दखल, थेऊरफाटा रेल्वे उड्डाणपुलावरील कठडे काढण्यास सुरुवात, दोघांना गमवावा लागला जीव; काहींना कायमचे अपंगत्व

कुंजीरवाडी ग्रामपंचायत हद्दीतील (तालुका- हवेली) थेऊरफाटा येथील रेल्वे उड्डाणपुलावर कठड्याला धडकून अनेक निष्पाप नागरिकांना नाहक आपला जीव गमवावा लागला आहे, तर काहींना आपले अवयव गमावून कायमस्वरूपी अपंगत्व आले आहे. याबाबत स्थानिक नागरिक आणि 'सीविक मिरर'ने प्रशासनाकडे केलेल्या पाठपुराव्याला अखेर सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून सार्वजनिक बांधकाम विभागाकडून उड्डाणपुलावरील कठडे गुरुवारपासून (९ जानेवारी)  काढण्यास सुरुवात केली आहे.

पुणे-सोलापूर महामार्गावरून पुणे-नगर अथवा पुणे-नाशिक महामार्गावरून अथवा पुण्याच्या गर्दीतून बाहेर जायचे असेल तर अनेक वाहनचालक वेळ आणि अंतर वाचवण्यासाठी थेऊर फाट्याच्या मार्गाचा वापर करतात. परंतु थेऊर फाट्याकडून थेऊरच्या दिशेकडे अथवा नगर रस्त्यावरून पुणे-सोलापूर महामार्गाकडे जात असताना चालकांना रेल्वेच्या उड्डाणपुलावरून जावे लागते. या उड्डाणपुलावर दोन्ही बाजूकडे मध्यभागी असलेले कठडे हे चालकांसाठी जीवघेणे बनले होते.

वाहनचालकांना गाडी चालवताना हे कठडे अचानक रस्त्यातच येत असल्याने वारंवार अपघात होत होते. विशेषतः दुचाकीचालकांना समोरून येणाऱ्या मोठ्या वाहनांची लाईट चमकल्याने कठडे दिसत नव्हते, त्यामुळे बहुतांशी अपघात हे दुचाकीचालकांचे होत होते. त्यामुळे थेऊरफाटा येथील रेल्वे उड्डाणपुलावरील कठडा मृत्यूचा सापळा बनत चालला होता. याच उड्डाणपुलावर दुचाकीवरील दोघांचा मृत्यू झाल्याची घटना २ जानेवारी रोजी घडली होती. 'कठडा बनला मृत्यूचा सापळा' या मथळ्याखाली 'सीविक मिरर'ने या विषयाचा पाठपुरावाही केलेला आहे.  

थेऊरफाटा रेल्वे उड्डाणपुलावरील कठडे हटवण्याची मागणी नागरिक अनेक वर्षांपासून करत होते. परंतु प्रशासनाकडून याबाबत कोणतीही कार्यवाही होत नव्हती. यामुळे स्वयंसेवी संस्था तसेच कुंजीरवाडी ग्रामपंचायतीने सामाजिक बांधिलकीतून या कठड्याला रेडिअम व छोटे छोटे रेडिअमचे पोल कठड्यावर लावण्यात आले होते. यामुळे दुचाकीवरून प्रवास करणाऱ्यांना ते दिसत होते.

परंतु काही कालावधीनंतर ते गायब होत असल्याने उड्डाणपुलावरून दुचाकीस्वारांचा प्रवास धोक्याचा झाला होता. त्यामुळे अनेक निष्पाप नागरिकांचे जीव जात होते, तर काहीजण जायबंदी झाले होते. २ जानेवारी रोजी या उड्डाणपुलावर झालेल्या अपघातात रामेश्वर किशोर राठोड (वय २३) व  श्याम गजमल जाधव (वय २९, दोघेही सध्या रा. टिळकनगर कात्रज, पुणे, मूळ रा. जामठी गाव, ता. सोयगाव जि. छत्रपती संभाजीनगर) या दोघांना आपला जीव गमवावा लागला आहे. या दुर्घटनेमुळे नागरिकांनी प्रशासनाकडे नाराजी व्यक्त केली होती.

या संदर्भात थेऊर ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य युवराज काकडे यांनी थेऊर फाटा येथील  रेल्वे उड्डाणपुलावरील अपघाताची माहिती पश्चिम महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण व पीडब्लूडीचे (विशेष रस्ते) आर वाय पाटील  यांना फोनद्वारे दिली होती. तसेच रेल्वे उड्डाणपुलावरील तत्काळ कठडे कायमस्वरूपी काढून टाकण्याची मागणी केली होती. याची दखल घेऊन अधिकाऱ्यांच्या एका टीमने तत्काळ घटनास्थळी भेट देऊन घटनास्थळाचा सेफ्टी ऑडिट अहवाल पाठवला. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून उड्डाणपुलावरील कठडे काढण्यास सुरुवात केली आहे.

Share this story

Latest