संग्रहित छायाचित्र
पुणे : वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या हिवाळी सत्र २०२३ परीक्षेअंतर्गत परीक्षा केंद्रावर अनावधानाने अगोदरच प्रश्नपत्रिका उघडली. ही बाब लक्षात येताच महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे तातडीने उपाययोजना करत प्रश्नपत्रिका बदलली आहे. पुण्यासह राज्यभरातील एकूण आठ हजार ३९५ विद्यार्थी या परिक्षेला बसले होते. सदर परीक्षा केंद्रावर घडलेल्या घटनेबाबत विद्यापीठ प्रशासनामार्फत चौकशी केली जात आहे.
यासंदर्भात नाशिक येथील महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ. संदीप कडू म्हणाले, की महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या हिवाळी-२०२३ सत्राच्या लेखी परीक्षा २८ ऑक्टोबरपासून सुरू होत्या. बुधवार (ता. ८)पर्यंत परीक्षा नियोजित होती. राज्यभरातील पन्नास परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा झाली.
दोन दिवसांपूर्वी सोमवारी (ता. ६) एका परीक्षा केंद्रावर अनवधानाने एमबीबीएस-२०१९ च्या अभ्यासक्रमाच्या बायोकेमिस्ट्री भाग- १ विषयाऐवजी बायोकेमिस्ट्री भाग- २ या विषयाच्या प्रश्नपत्रिकेचा बॉक्स उघडण्यात आला. वास्तविक बायोकेमिस्ट्री भाग- २ विषयाचा पेपर बुधवारी (ता. ८) नियोजित होता. ही बाब लक्षात येताच विद्यापीठाने तातडीने उपाययोजना केली.
कुलगुरू लेफ्टनंट जनरल (निवृत्त) डॉ. माधुरी कानिटकर यांच्या आदेशानुसार राज्यातील पन्नास परीक्षा केंद्रावर बायोकेमिस्ट्री भाग- २ विषयाची दुसरी प्रश्नपत्रिका विद्यापीठामार्फत पुरविण्यात आली व तातडीने प्रश्नपत्रिका बदलल्यामुळे परीक्षा पुढे ढकलण्याचा प्रसंग टाळला. परीक्षा प्रक्रियेत अडचणी निर्माण होऊ नयेत तसेच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी विद्यापीठाकडून तत्परतेने कार्यवाही केली गेली. एमबीबीएस- २०१९ च्या अभ्यासक्रमाच्या परीक्षेसाठी राज्यभरातील एकूण आठ हजार ३९५ विद्यार्थी प्रविष्ट होते. सदर परीक्षा केंद्रावर घडलेल्या घटनेबाबत विद्यापीठामार्फत चौकशी केली जात आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.