मतसंग्राम 2024 : हडपसर मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी ?

आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी सर्वच राजकीय पक्षांनी केली आहे. दोन पक्षांचे प्रत्येकी दोन गट निर्माण झाल्याने उमेदवारीवर दावा करणाऱ्यांची संख्या वाढली असून राजकीय पक्षांची चांगलीच डोकेदुखी वाढणार असल्याचे दिसून येत आहे.

Matsangram 2024

मतसंग्राम 2024 : हडपसर मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी ?

इच्छुकांच्या गर्दीमुळे राजकीय पक्षांची डोकेदुखी वाढली; महाविकास आघाडीसह महायुतीतदेखील वादाची शक्यता

आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी सर्वच राजकीय पक्षांनी केली आहे. दोन पक्षांचे प्रत्येकी दोन गट निर्माण झाल्याने उमेदवारीवर दावा करणाऱ्यांची संख्या वाढली असून राजकीय पक्षांची चांगलीच डोकेदुखी वाढणार असल्याचे दिसून येत आहे. अशीच मोठी डोकेदुखी हडपसर मतदारसंघात राजकीय पक्षांची होणार आहे.

महाविकास आघाडीत तब्बल सात इच्छुकांनी हडपसरमधून उमेदवाररीसाठी दावा केला आहे. दुसीकडे महायुतीत ज्या पक्षाचा विद्यमान आमदार त्या पक्षाला उमेदवारी, असे सूत्र ठरलेले आहे. या मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे विद्यमान आमदार असतानाही भारतीय जनता पक्षाने तसेच शिवसेनेनेदेखील (शिंदे गट) दावा केला आहे. एकूणच या मतदारसंघात महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये उमेदवारीवरून गोंधळाची परिस्थिती आहे. असे असले तरी मुख्य लढत ही राष्ट्रवादीविरुध्द राष्ट्रवादीच अशी होण्याची दाट शक्यता आहे.

हडपसर विधानसभा मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अतिशय जवळचे अशी ओळख असलेले प्रमोद भानगिरे यांनी उमेदवारीवर दावा ठोकला आहे. तसेच शहरातील आणखी दोन मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाला उमेदवारी मिळावी, अशी मागणी केली आहे. सामुळे साहजिकच हडपरवरून महायुतीत मिठाचा खडा पडला आहे. तसे पाहता मतसंघावर प्रमुख दावा असलेले योगेश टिळेकर यांना विधान परिषदेची आमदारकी दिल्याने भाजपला तलवार म्यान करावी लागू शकते. राष्ट्रवादी आणि शिवसेना या उरलेल्या दोन घटकपक्षांमध्ये उमेदवारीवरून जुंपण्याची शक्यता आहे. कारण विद्यमान आमदार चेतन तुपे असताना शिवसेनेला हा मतदारसंघ सोडण्याची चिन्हे कमीच आहे, असे असले तरी गणित बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही.

महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी आपल्यालाच उमेदवारी मिळणार असल्याचे स्पष्ट करत मतदारसंघाच्या कानाकोपऱ्यात मोठमोठे होर्डिंग लावून प्रचाराला सुरुवात केली आहे. जगताप यांच्यासोबतच योगेश ससाणे, बंडू गायकवाड, प्रवीण तुपे यांनीही उमेदवारीवर दावा केला आहे.  महाविकास आघाडीतील घटक असलेल्या कॉंग्रेसचे माजी आमदार बाळासाहेब शिवरकर, शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी आमदार महादेव बाबर यांनीदेखील उमेदवारी मागितली आहे.

निवडणूक लढविणाऱ्या इच्छुकांची संख्या अधिक वाढल्याने गोंधळाची परिस्थिती निर्माण होणार आहे. या मतदारसंघातून उमेदवारी ही वरिष्ठ पातळीवरूनच ठरणार असल्याने प्रत्येक उमेदवाराने आपआपली ताकद लावत प्रचाराला सुरुवात केली आहे.

आमदारकी कायम न राहण्याचा इतिहास

मागील तीन विधानसभा निवडणुकांचा विचार केला तर हडपसरमधून एकच उमेदवार पुन्हा निवडणूक आला नसल्याचे दिसून येते. आगामी निवडणुकीतदेखील असेच चित्र राहिले तर नवीन उमेदवार निवडून येऊ शकतो.

२००९ मध्ये येथून शिवसेनेचे महादेव बाबर निवडून गेले. २०१४ मध्ये भाजप आणि शिवसेना वेगवेगळे लढले. यात भाजपने बाजी मारली. २०१४ पूर्वी मतदारसंघात भाजपची तेवढी ताकद नव्हती. मात्र, २०१४ मध्ये योगेश टिळेकर हे भाजपचे आमदार झाले. त्यानंतर मतदारसंघात पक्ष संघटन वाढत गेले. तरीही विधानसभा निवडणुकीतही निसटता पराभव झाला होता. असे असले तरी याठिकाणी भाजपचे संघटन आणि पक्षीय ताकद अधिक आहे. ११ नगरसेवक, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत सरपंच हे भाजपचे राहिले आहेत. त्यामुळे महायुतीत हा मतदारसंघ भाजपलाच मिळावा, अशी भाजप नेत्यांची आग्रही मागणी आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे उमदेवार चेतन तुपे यांनी २०१९ मध्ये भाजपचे विद्यमान आमदार योगेश टिळेकर यांचा २,८२० मतांनी पराभव केला होता. मात्र आता आमदार तुपे यांना पुन्हा उमेदवारी दिली तर त्यांच्यासोबत टिळेकर असतील. त्यामुळे मराठा-माळी समाजाचे एकगठ्ठा मतदान तुपे यांना मिळून त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे. दुसरीकडे तुपे यांनी विकासकामे केली नाहीत, असा आरोप केला जात आहे. राष्ट्रवादी फुटल्यानंतर ते अजित पवारांसोबत राहिल्याने त्यांच्यावर मतदारांची नाराजी असल्याचे सांगितले जात आहे.

या भागात अनेक सहकारी संस्था, शेतकरी वर्ग, व्यावसायिक असल्याने तसेच जुने मतदार शरद पवार यांना मानणारे असल्याने पवार गटाला फायदा होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. याच मतदारसंघात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून साईनाथ बाबर यांनी तयारी सुरू केली आहे. एकूणच हडपसर मतदारसंघाचा अंदाज घेतल्यानंतर मुख्य लढत राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादीच अशी रंगतदार लढाई होईल, असे मतदारांचे म्हणणे आहे.

विधानसभा २०१९ : उमेदवारांना मिळालेली मते

उमेदवार मते

चेतन तुपे (राष्ट्रवादी काँग्रेस) : ९२,१४४

योगेश टिळेकर (भाजप) : ८९,५०६

वसंत मोरे (मनसे) : ३४,८०९

जाहिद इब्राहिम शेख (अपक्ष) : ७,९०१

घनशाम हक्के (वंचित) : ७,५७०

नोटा : २,४७४

राज्य शासनाच्या माध्यमातून विकासकामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी आणला आहे.  मुळातच हा भाग अनेक उपनगरांचा मिळून बनलेला मतदारसंघ असून नव्याने विकसित होणारा आहे. मोठ्या प्रमाणात नागरीकरण झालेले आहे. त्यामुळे पायाभूत सुविधांवर ताण आलेला आहे. वाहतूक कोंडीतून सुटका होण्यासाठी महापालिकेने तयार केलेला वाहतूक आराखडा प्रत्यक्षात येणे अपेक्षित आहे. स्वारगेट ते लोणी काळभोरपर्यंत महामेट्रो, तसेच हडपसर ते खराडी अशी महामेट्रो यावी, यासाठी विधानसभेत प्रश्न उपस्थित केला आहे. सर्वसामान्यांचे प्रश्न विधानसभेत मांडल्यामुळेच उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार मिळाला आहे. रेल्वेवरील उड्डाणपूल, नदीवरील पुलाची कामे केली आहेत. पाणी, कचरा, वाहतूक कोंडी हे महापालिकेशी संबंधित आहेत. त्या मुद्द्यावर बोलणाऱ्या व्यक्तींना आमदारांची कामे माहिती नसतात. म्हणून ते बडबडत असतात. अनेक उमेदवार निवडणूक लढविण्यास इच्छुक असणे हे सुदृढ लोकशाहीचे लक्षण आहे. उमेदवारी कोणाच्या पक्षाला किंवा कोणाला दिली जाणार हे वरिष्ठ नेते ठरवत असतात. ज्याला उमेदवारी मिळेल, त्या उमेदवाराचा सर्व मिळून प्रचार करतील.

 - चेतन तुपे, विद्यमान आमदार, राष्ट्रवादी कॉंग्रेस (अजित पवार गट)

हडपसर मतदारसंघातून २०१९ ला राष्ट्रवादी काॅंग्रेसचा उमेदवार निवडून आला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत ठरलेल्या फाॅर्म्युल्यानुसार ही जागा आमची आहे. आमच्या पक्षातून पळून गेलेला विकासकामे न करणारा आमदार जनतेने पाहिला आहे. ते चित्र बदलण्यासाठी पक्षाच्या वतीने मी या मतदारसंघावर दावा केला आहे. लोकशाही असल्याने महाविकास आघाडीतील इतरांना उमेदवारी मागण्याचा अधिकार आहे. शहराचा माजी महापौर, तसेच गेल्या १०-१२ वर्षात केली विकासकामे, मतदारसंघातून मिळत असलेला पाठिंबा, कार्यकर्त्यांच्या बैठका तसेच मतदारसंघात केलेल्या सर्व्हेक्षणानुसार माझा निवडणुकीत विजय निश्चित असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत आमची प्रमुख दावेदारी आहे. मतदारसंघातील पाणीटंचाई, कचरा प्रश्न मार्गी लावण्याची क्षमता माझ्यात आहे. विद्यमान आमदारांनी विकासकामे केलेली नाहीत. त्यामुळे मतदारसंघाच्या विकासाचे ध्येय ठेवून मी निवडणुकीला सामोरे जाणार आहे.

 - प्रशांत जगताप, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार.

हडपसर मतदारसंघात शिवसेनेला मानणारा मतदार आहे. २०१९ ला ही जागा आम्हांला सोडण्यात आली नव्हती. या जागेसह शहरातील तीन जागांवर आम्ही दावा केला आहे. शिवसेना हा पक्ष शहरात वाढविण्यासाठी रुजवण्यासाठी तसेच महापालिकेच्या निवडणुकीला सामोरे जावे लागण्यासाठी शिवसेनेचे तीन आमदार असणे आवश्यक आहे. यापूर्वी येथून आमचे आमदार आणि खासदार निवडून गेले आहेत. त्यामुळे हडपसर मतदारसंघात गेल्या अनेक वर्षांपासून कामे सुरू आहेत. वाहतूक कोंडी हा मुख्य प्रश्न आहे, ही कोंडी फोडण्यासाठी पर्यायी रस्ते तयार करण्याची गरज आहे. त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा केला. मतदारसंघात मांजरी, केशवनगर, साडेसतरा नळी, केशवनगर या समाविष्ट गावांमध्ये विकासकामे करण्याचे मोठे आव्हान आहे. मूलभूत प्रश्न, पिण्याचे पाणी, सोलापूर रस्त्यावरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी उपाययोजना कराव्या लागणार आहेत. मला उमेदवारी मिळावी आणि येथून शिवसेनेचा आमदार व्हावा, अशी इच्छा या मतदारसंघातील कार्यकर्त्यांची आहे. म्हणून मतदारसंघात सगळीकडे मोठे होर्डिंग लावले गेले आहेत.

 - प्रमोद भानगिरे, शहरप्रमुख, शिवसेना (शिंदे गट)

महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार गटातून हडपसर मतदारसंघातून उमेदवारीवर दावा केला आहे. मतदारसंघात विकासकामे केली आहेत. लढवय्या नगरसेवक म्हणून अशी ओळख मतदारांनी करून दिली आहे.  माळी समाजासह इतर समाजातील मतदारांचा मोठा पाठिंबा मला आहे. त्याचा विचार करता विद्यमान आमदारांच्या विरोधात लढत झाली तर २५ ते ३० हजारांच्या मताधिक्याने मी निवडणूक येऊ शकतो. मोहम्मदवाडी, मांजरी, मुंढवा या भागात मोठ्या प्रमाणात नाती-गोती आहे. तसेच इतर भागातील मतदारांचा मोठा पाठिंबा आहे. हडपसरची वाहतूक कोंडी फोडण्यासाठी रस्त्यावरील बीआरटी स्वत:च्या पैशातून काढून टाकली. मी नेहमी कचरा प्रकल्पाला विरोध केला आहे. मतदारसंघाच्या हितासाठी कठोर निर्णय घेण्याची क्षमता आहे. कोणा एकाच्या हितासाठी कामे अडवून ठेवणार नाही, विद्यमान आमदारांनी काही रस्ते अडवून ठेवले आहेत. ते चुकीचे आहे. धाडसी निर्णय घेत विकासकामे करणार म्हणून विजयी होण्याचा विश्वास असल्यानेच उमेदवारीवर दावा केला आहे.

 - योगेश ससाणे, माजी नगरसेवक  

 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest