स्थानिक स्वराज्य निवडणुकीची सर्व पक्षीयांकडून जोरदार तयारी सुरु आहे. त्या चार महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका जाहीर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. न्यायालयाच्या या निर्देशानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सत्ताधारी पक्षामध्ये इनकमिंग सुरु आहे. तर अनेक पक्षांमध्ये मोर्चेबांधणी सुरु आहे. अशातच, राजकीय वर्तुळात महायुती एकत्र लढणार का ? असा सवाल उपस्थित होत असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठं विधान केलं आहे. महापालिका निवडणुकीसंदर्भात महायुतीची नेमकी स्टॅटर्जी काय असणार आहे याचा खुलासा केला आहे. देवेंद्र फडणवीस पुण्यात बोलत होते. ज्या ठिकाणी युती होणार नाही, त्या ठिकाणी वेगळं लढू असं विधान मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलं आहे.
समजुतीने लढू पण युती होणार नाही..
पुण्यात माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ''महायुती म्हणूनच आम्ही निवडणुका लढवू. आम्ही तिन्ही पक्ष एकत्र आहोत. काही अपवादात्मक ठिकाणी तुल्यबळ उमेदवार असतील तर समजुतीने लढू पण युती होणार नाही, त्या ठिकाणी वेगळं लढू. एकमेकांवर टीका न करता सकारत्मक प्रचार करु असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
तसेच, महापालिका निवडणुका वेळत घेण्यासाठी निवडणूक आयोगाने तयारी सुरु केली आहे. ज्या भागात पावसाचा प्रभाव जास्त आहे, तिथे गरज भासल्यास 15 दिवसांची मुदतवाढ मागितली जाऊ शकते असंही यावेळी फडणवीस म्हणाले.
यासोबतच, जास्तीत जास्त ठिकाणी महायुती एकत्र लढेल. कार्यकर्त्यांची इच्छा ही स्वाभाविक आहे. ते वर्षानुवर्षे काम करतात. त्यांना संधी मिळावी असं वाठणे साहजिक आहे. आमच्या तिन्ही पक्षांनादेखील हेच वाटते. पण काही ठिकाणी युती शक्य नसल्यास निवडणुकीनंतर युती होऊ शकते, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.