ग्राम सुरक्षा पथके प्रभावीपणे कार्यरत करण्याची पोलीस उपअधीक्षक प्रशांत ढोले यांची सूचना
शिरूर: पोलिसिंगमध्ये जनतेचा सहभागही महत्त्वाचा आहे. गाव पातळीवर पोलीस पाटील हे नागरिक व पोलीसा मधील दुवा आहे. ग्राम सुरक्षा पथक गाव पातळीवर प्रभावीपणे कार्यरत करावीत. सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत, अशा सूचना पोलीस उपअधिक्षक प्रशांत ढोले यांनी केली. शिरूर येथील प्रशासकीय इमारतीमधील सभागृहात पोलीस पाटील व व्यापारी तसेच व्यवसायिकांची बैठक आयोजित केली होती. शिरूर पोलिसांच्या वतीने या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत ढोले यांनी मार्गदर्शन केले. यावेळी पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यावेळी उपस्थित होते.
ढोले म्हणाले, घर मालकांनी भाडेकरुची माहिती ठेवावी. ही माहिती वेळोवेळी पोलीस ठाण्याला कळवावी. शहर तसेच परिसरातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी सर्वोच्च प्राधान्य द्यावे. त्यासाठी पोलीस मित्र व प्रत्येक गावचे पोलीस पाटील यांनी नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण माहिती पोलीस ठाण्याला तातडीने पुरवणे गरजेचे आहे. शहरातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि चोरीच्या घटना रोखण्यासाठी पोलीस हेल्पलाइन नंबरवर तात्काळ संपर्क करून पोलीस ठाण्याला त्याबद्दल माहिती द्यावी, त्यामुळे चोरीच्या घटनांना आळा बसू शकतो असे ते म्हणाले.
वेगाने गाडी चालवणे, जोरात हॉर्न वाजविणे यावर पोलीसांनी कारवाई करावी असं फार्मसी संघटनेचे बाबाजी गलांडे यावेळी बोलताना म्हणाले. तर बिगर नंबरप्लेट मोटारसायकल फिरवणारे व चारचाकी गाड्यांना काळ्या काचा लवणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी सूचना सामाजिक कार्यकर्ते नितीन थोरात यांनी केली. तर शिरूरजवळ एमआयडीसी असून मोठ्या संख्येने परप्रांतीय येथे येत असतात, त्यांची नोंद ठेवावी, अशी मागणी माजी सरपंच प्रकाश थोरात यांनी केली. शहरातील पार्किंगचा प्रश्न नगरपालिकेच्या मदतीने सोडवावा, असं जनता दलाचे जिल्हाध्यक्ष संजय बारवकर म्हणाले.
दररोज संध्याकाळी शिरुर शहरातील रामआळी ते डंबेनाला परिसरातील दुकाने बंद करण्याचा वेळी सायंकाळी साडेसहा ते साडेआठचा दरम्यान पोलीसांची गस्त ठेवावी अशी सूचना सराफ संघाचे माजी उपनगराध्यक्ष नेमीचंद फुलफगर यांनी केली. तर नागरिकांच्या मदतीसाठी असणारा ११२ कॉल डायलचा अनुभव फारसा सकारात्मक नसल्याचे आम आदमी पक्षाचे ॲड . सुभाष जैन यांनी सांगितले. त्यासोबतच नितीन बारवकर,अभिजीत आंबेकर, मुकुंद ढोबळे, अनिल डांगे यांनी विविध सूचना मांडल्या .
आखिल भारतीय मराठा महासंघाच्या शोभना पाचंगे, आदित्य पतसंस्थेचे अध्यक्ष विनोद धाडीवाल, जैन युवा परिषदेचे प्रकाश बाफना, शिरुर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद कालेवार, समस्त सकल मराठा समाज संघाचे विश्वस्त सागर नरवडे यांच्या सोबत अनेक मान्यवर या बैठकीस उपस्थित होते. बैठकीचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांनी केले.