मांजरीत दूषित पाणीपुरवठ्याचा धोका
मांजरी गावातील नागरिकांना पाणीपुरवठ्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाअंतर्गत पाईपलाईन टाकण्यात आली आहे. या पाईपलाईनमधून बेकायदा नळजोड घेण्यात आले आहेत. तसेच अनेक ठिकाणी पाईपलाईन उघड्या गटारांजवळून गेली आहे. यामुळे इलेन बॅरे सिंड्रोमच्या (जीबीएस) पार्श्वभूमीवीर मांजरीवासियांना दूषित पाण्याचा पुरवठा होण्याचा धोका निर्माण झाला आहे.
मांजरी गावाला पाणीपुरवठा करण्यास पुणे महापालिकेने सुरुवात केली आहे. तत्कालीन मांजरी ग्रामपंचायतीने निर्माण केलेल्या जलवाहिन्यांना पाण्याच्या टाकीतून पाण्याचा पुरवठा केला जात आहे. काही ठिकाणी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणअंतर्गत पाईपलाईन टाकण्यात आली आहे. या पाईनलाईनमधून बेकायदा नळ कनेक्शन घेतले जात आहेत, तर काही ठिकाणी उघडे गटारांपासूनच पाईपलाईन टाकण्यात आली आहे. गटाराचे पाणी या पाण्याच्या लाईनमध्ये मिसळण्याचा धोका आहे. सध्या जीबीएस आजाराचे रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे महापालिकेने पाहणी करून बेकायदा नळ कनेक्शन घेण्यांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
मांजरी गावातील झोपडपट्टी परिसर, मांजरी फार्म, महादेवनगर, घुले वस्ती, गोपाळपट्टी, मुंढवा रस्ता या भागातील नागरिकांना पाण्यासाठी वणवण फिरण्याची वेळ आली आहे. तसेच पाणी मिळण्यासाठी टॅंकरला हजारो रुपये मोजण्याची वेळ आहे. महापालिकेत गावाचा समावेश झाल्यानंतर गावात पाणी येईल, अशी अपेक्षा ग्रामस्थांना होती. त्यानुसार महापालिकेने पाणीपुरवठा करण्यास सुरुवात केली आहे. परंतु संपूर्ण गावात पाण्याचे जाळे निर्माण करण्यास अद्याप महापालिकेला यश आलेले नाही. ज्या ठिकाणी पाण्याची पाईपलाईन टाकण्यात आली आहे, तेथून नळ कनेक्शन घेणे सुरू केले आहे, परंतु अपुरा पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांचा घसा कोरडाच राहात आहे. ज्या भागात पाणी नाही तिथे शुद्ध पाण्याचा पुरवठा करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
मांजरी गाव महापालिकेत समाविष्ट होऊन अडीच वर्षे उलटली आहेत, तरीही महापालिकेला गावच्या पाण्याचे नियोजन करता आलेले नाही. मात्र मिळकतकर आकारणी जोरात सुरू केली होती. मांजरी गावात अनेक वर्षांपासून पाण्याचा प्रश्न बिकट आहे. गावकऱ्यांच्या शेतातील विहिरी आणि शेताला सोडणाऱ्या बोरवेलमधून गावातील इतर नागरिक पाण्याचा वापर करत आहेत. महापालिकेत समावेश झाल्यानंतर पाण्याचा प्रश्न सुटेल, अशी अपेक्षा नागरिकांना होती. मात्र महापालिका अद्याप पाणीपुरवठा पुरेशा प्रमाणात करू शकली नाही. त्यामुळे ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे. याबाबत ‘सीविक मिरर’ने पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख नंदकिशोर जगताप यांना संपर्क साधला असता, त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही.
कूपनलिकांमध्ये नाही पाणी, पाईपलाईनमधून अपुरा पुरवठा अन् टँकर बंद
मांजरी गावात दरवर्षी उन्हाळ्याची चाहूल लागताच कूपनलिकांचा तळ गाठला जातो. त्यामुळे गावातील नागरिकांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे. गावात ७ झोपडपट्ट्या आहेत, या भागात पाणीपुरवठा करण्यासाठी महापालिकेला कसरत करावी लागत आहे. पुरेशा प्रमाणात पाणी नसल्याने पाणी विकत घेण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. महापालिकेने पाणीपुरवठा करण्यास सुरुवात केल्याने गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेले पाण्याचे टॅंकर जवळपास बंद झाल्याची माहिती नागरिकांनी दिली. कूपनलिकांमध्ये पाणी नाही. तसेच पाईपलाईनमधून पाण्याचा पुरवठा अपुरा, तर टॅंकरही आता बंद यामुळे गावकऱ्यांची कोंडी होऊ लागली आहे. गावातील नागरिकांचा विचार करून महापालिकेने वाढीव आणि सुरळीत पाणीपुरवठा करण्यासाठी पावले उचलण्याची गरज असल्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. या गावामध्ये अनेक ठिकाणी शेततळी करण्यात आली आहेत. या शेततळ्यातून टॅंकरने पाणीपुरवठा केला जात आहे. यामुळे तरी नागरिकांची तहान भागविण्यासाठी पर्याय ठरत आहे, परंतु हे पाणी पिण्यास शुद्ध आहे का याचीही तपासणी महापालिकेने करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जाऊ लागली आहे.
मांजरी गावात सात झोपडपट्ट्या आहेत. नागरिकांना पाण्यासाठी वर्षभर वणवण फिरावे लागते. महापालिकेच्या विरोधात आंदोलन केल्यानंतर टॅंकर सुरू करण्यात आले होते. त्यानंतर महापालिकेकडून पाणीपुरवठा करण्यास सुरुवात झाली आहे, तर आता पाण्याचे टॅंकर जवळपास बंद केले आहेत. पुरेशा प्रमाणात पाणी येत नसल्याने पाण्याचे टॅंकर सुरू राहणे अपेक्षित आहे. परंतु महापालिकेकडून उदासीनता दाखविली जात आहे. पाईपलाईनमधून बेकायदा कनेक्शन घेतले जात आहे. याची पाहणी पाणीपुरवठा विभागाने करावी. राजकारण्यांकडून केवळ पाणीपुरवठा केल्याबाबत बॅनरबाजी केली जात आहे. परंतु प्रत्यक्ष परिस्थिती फार वेगळी आहे. गटारे उघडी असल्याने दूषित पाणीपुरवठा होण्याचा धोका आहे.
- राजेंद्र साळवे, अध्यक्ष अखिल मांजराई नगर नागरिक कृती समिती