- सायबर भामट्यांनी गेल्या काही दिवसांत चार वेगवेगळ्या घटनांमधून केली १५ लाखांहून अधिक रक्कम लंपास;
- बनावट ओळख, खोट्या गुंतवणूक योजना आणि डिजिटल फसवणूक तंत्रांच्या वापराद्वारे आता नव्या पद्धतीने केली जाते लूट
तनया कुलकर्णी
पुणे : शहरात सायबर गुन्ह्यांचे स्वरूप झपाट्याने बदलत असून फसवणूक करणारे आता बनावट ओळख, खोट्या गुंतवणूक योजना आणि डिजिटल फसवणूक तंत्रांचा वापर करून लोकांना लुबाडत आहेत. अलीकडील चार वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये नागरिकांची एकूण १५ लाख रुपयांहून अधिक रक्कम लंपास करण्यात आली आहे.
या सर्व प्रकरणांमध्ये फसवणुकीच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत. बनावट हेल्पलाइन नंबर, क्रेडिट कार्ड फसवणूक, बनावट व्यवसाय ऑफर किंवा टेलिग्राम वरील टास्क स्कॅम या सगळ्या प्रकारात एक समान धागा स्पष्ट दिसतो तो म्हणजे आधी लोकांचा विश्वास निर्माण करणे, त्यांच्या डिजिटल सवयींचा गैरफायदा घेणे आणि या आधारे फसवणूक करणे.
बनावट हेल्पलाइनद्वारे ६३ वर्षीय नागरिकाची ५.४८ लाखांची फसवणूक
एरंडवणे येथील ६३ वर्षीय नागरिकाला बनावट कस्टमर केअरच्या नावाखाली केलेल्या फसवणुकीत ५,४८,६९० रुपयांचा फटका बसला. ही घटना १४ ते २१ मार्चदरम्यान घडली. मात्र डेक्कन पोलीस ठाण्यात तक्रार एप्रिलमध्ये दाखल करण्यात आली. पिडित व्यक्ती इएनटी डॉक्टरांच्या सल्ल्यासाठी ऑनलाइन शोध घेत असताना त्यांना एक हेल्पलाइन नंबर सापडला, जो खरा असल्यासारखा वाटत होता. फोन केल्यावर समोरील व्यक्तीने स्वतःला संबंधित रुग्णालयातील कर्मचारी म्हणून सांगितले आणि अपॉइंटमेंट बुक करण्याची प्रक्रिया समजावून सांगितली. या प्रक्रियेत पाच रुपये गुगल पे द्वारे पाठवण्यास सांगण्यात आले. व्यवहार करताना पीडिताला संशय आला आणि कॉल कट झाला. मात्र लगेचच त्यांच्या खात्यातून अनधिकृत व्यवहार सुरू झाले. मेसेज मिळाल्यानंतर त्यांना ही फसवणूक असल्याचे लक्षात आले.
‘‘फसवणूक करणारे आता मूळ वेबसाइटसारखे दिसणारे बनावट लिंक आणि हेल्पलाइन नंबर वापरून लोकांची माहिती मिळवतात. त्याद्वारे मग फसवणूक केली जाते,’’ अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीशा निंबाळकर यांनी ‘सीविक मिरर’ला दिली.
क्रेडिट कार्ड फसवणुकीत २.९९ लाख रुपयांचा फटका
बोपोडी येथील २८ वर्षीय युवकाला क्रेडिट कार्ड फसवणुकीत २,९९,४८० रुपयांचे नुकसान झाले. ही घटना फेब्रुवारीमध्ये घडली, मात्र एप्रिलमध्ये खडकी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. पीडित युवकाला बँक अधिकाऱ्यांच्या नावाने फोन आला आणि त्याचे क्रेडिट कार्ड बंद करणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले. या संभाषणादरम्यान फसवणूक करणाऱ्यांनी एपीके फाइलद्वारे त्याच्या मोबाईलमध्ये प्रवेश मिळवला आणि बँकिंग माहिती चोरली. या माहितीच्या आधारे त्यांनी अनधिकृत व्यवहार करून पैसे काढले. पोलिसांनी सांगितले की अशा स्कॅममध्ये लोकांना अधिकृत वाटणाऱ्या संवादाद्वारे फसवले जाते. सध्या पोलीस संबंधित बँकेशी संपर्क साधून रक्कम गोठवण्याचा प्रयत्न करत आहेत.
बनावट डीलरशिप ऑफरद्वारे पाच लाखांची फसवणूक
हडपसर येथील २९ वर्षीय व्यक्तीला बनावट व्यवसाय गुंतवणूक योजनेत ५,०३,२०० रुपयांचा फटका बसला. ही फसवणूक ऑगस्ट २०२५ ते मे २०२६ या कालावधीत झाली. फसवणूक करणाऱ्यांनी मोबाईल आणि ईमेलद्वारे संपर्क साधून एका नामांकित सोलर कंपनीची डीलरशिप देण्याचे आश्वासन दिले. त्यांनी करारपत्रे, कोटेशन आणि नोंदणी कागदपत्रे पाठवून ऑफर विश्वासार्ह असल्याचे भासवले.
पीडित व्यक्तीने यावर विश्वास ठेवून विविध बँक खात्यांमध्ये पैसे ट्रान्सफर केले. मात्र नंतर कोणतीही व्यवसाय संधी मिळाली नाही आणि आरोपींनी संपर्क तोडला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमोल मोरे यांनी सांगितले की, अशा गुंतवणूक फसवणुकीत बनावट कागदपत्रे आणि ब्रँडिंगचा वापर करून विश्वास निर्माण केला जातो.
टेलिग्राम टास्क स्कॅममुळे दोन लाखांचा तोटा
सिंहगड रोड परिसरातील ३२ वर्षीय व्यक्तीला टास्क आधारित स्कॅममध्ये २,०७,९०० रुपयांचा फटका बसला. ही घटना २९ ते ३१ डिसेंबर २०२५ दरम्यान घडली. तक्रार मात्र एप्रिलमध्ये नोंदवली गेली. पीडिताला ऑनलाइन टास्क करून पैसे कमावण्याची ऑफर देणारा मेसेज आला आणि त्याला टेलिग्राम ग्रुपमध्ये सामील करण्यात आले. त्या ग्रुपमध्ये इतर सदस्यांकडून नफ्याचे स्क्रीनशॉट शेअर केले जात होते. यामुळे त्याच्या मनात विश्वास निर्माण झाला.
हळूहळू त्याला अधिक पैसे गुंतवण्यास प्रवृत्त करण्यात आले. मात्र नंतर कोणताही परतावा मिळाला नाही आणि फसवणूक करणाऱ्यांनी संपर्क बंद केला. पोलिसांच्या मते, अशा टास्क स्कॅममध्ये सुरुवातीला लहान नफा दाखवून किंवा मोठ्या परताव्याचे आश्वासन देऊन लोकांना जाळ्यात अडकवले जाते.
सर्व प्रकरणांमध्ये समान पॅटर्न
या चारही प्रकरणांमध्ये एक ठरलेली पद्धत दिसून येते. सुरुवातीला कॉल, लिंक किंवा मेसेजद्वारे संपर्क साधला जातो. त्यानंतर विश्वास निर्माण केला जातो. मग तातडीची गरज किंवा आकर्षक संधी दाखवली जाते. त्यानंतर पैसे विविध खात्यांमध्ये ट्रान्सफर करायला लावले जातात आणि शेवटी आरोपी संपर्क तोडतात किंवा पैसे काढण्यास नकार देतात.
सायबर फसवणूक झाल्यास काय करावे?
सायबर फसवणूक झाल्यास त्वरित कारवाई करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. १९३० या सायबर हेल्पलाइन नंबरवर संपर्क साधावा. तसेच www.cybercrime.gov.in या संकेतस्थळावर तक्रार नोंदवावी. आपल्या बँकेला तत्काळ फसवणुकीची माहिती देऊन व्यवहार थांबवण्याची विनंती करावी आणि जवळच्या सायबर पोलीस ठाण्यात तक्रार करावी. लवकर तक्रार केल्यास पैसे परत मिळण्याची शक्यता वाढते.


