शिवसेना वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांनी "Come On, Kill Me"असे ओपन चॅलेंज दिले होते. त्यानंतर उपमु्ख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी "मरे हुए को क्या मारना?" असे प्रत्युत्तर दिले होते. या दोघांमधील शाब्दिक युद्धाचे पडसाद स्थानिक पातळीवर उमटले आहेत.
शहरात पक्षाच्या वर्धापनदिनाच्या पार्श्वभूमीवर शिंदे गट आणि ठाकरे गटामध्ये जोरदार बॅनरबाजीचे युद्ध रंगलेले पाहायला मिळत आहे. शिंदे गटाचे नेते नाना भानगिरे यांच्याकडून शहरातील प्रमुख भागांमध्ये भले मोठे पोस्टर लावले आहेत. या पोस्टर मध्ये उद्धव ठाकरे यांच्या व्यंगचित्रांचा वापर करण्यात आला आहे. या व्यंगचित्रांमध्ये उद्धव ठाकरे यांच्या एका हातात कुबडी तर दुसऱ्या हातामध्ये ऑक्सिजनचा , टॅंक पाहायला मिळत आहे तसेच या ऑक्सिजनच्या टॅंकवर काँग्रेस पक्षाच्या चिन्ह असलेलं हातात निशाण पाहायला मिळत आहे.
तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे व्यंगचित्र काढून त्यामध्ये त्यांच्या हातामध्ये भगवा झेंडा आणि धनुष्यबाणाचे चिन्ह देण्यात आला आहे. एक प्रकारे या व्यंगचित्रातून शिंदे यांनी पक्ष, चिन्ह आणि हिंदुत्व राखलं असल्याचं दाखवण्याचा प्रयत्न करू उद्धव ठाकरे यांच्या सेनेला डिवचण्याचा प्रयत्न केला.
त्यानंतर आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून देखील पोस्टरबाजीनेच याला उत्तर देण्यात आले आहे. शहरातील प्रमुख चौकामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेने पोस्टर लावले आहे. शहर प्रमुख संजय मोरे यांच्या माध्यमातून हे पोस्टर लावण्यात आले आहे.
या पोस्टमध्ये एकीकडे एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरे यांच्या पाया पडून आशीर्वाद घेत आहेत. तर दुसऱ्या व्यंगचित्रांमध्ये शिंदे हे झुकेगा मै... म्हणत वाकून देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्र्याच्या खुर्ची पर्यंतचा रस्ता करून देत असल्याचं दाखवण्यात आला आहे. तसेच याला निष्ठेचे विचार सोडून सत्तेसाठी एक लाचार असं कॅप्शन देण्यात आला आहे.