बीएस्सी ॲग्रिकल्चर पदवीसाठी पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विषय वगळले

कृषी पदवी अभ्यासक्रमातील पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभागाचे विषय वगळण्यात आल्यामुळे राज्यभरातील चारही कृषी विद्यापीठातील पशुसंवर्धन आणि दुग्धशास्त्र या विषयात अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांनी पुण्यातील महाराष्ट्र कृषी संशोधन व शिक्षण परिषद येथे आंदोलन केले आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Sat, 11 Jan 2025
  • 02:02 pm
Animal husbandry, Dairy science,Agriculture ,Degree course,B.Sc Agriculture degree

विद्यार्थी झाले संतप्त; प्राध्यापकांनी घेतला संयमी पवित्रा

कृषी पदवी अभ्यासक्रमातील पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभागाचे विषय वगळण्यात आल्यामुळे राज्यभरातील चारही कृषी विद्यापीठातील पशुसंवर्धन आणि दुग्धशास्त्र या विषयात अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांनी पुण्यातील महाराष्ट्र कृषी संशोधन व शिक्षण परिषद येथे आंदोलन केले आहे. या आंदोलनासाठी राज्यातील चारही कृषी विद्यापीठातून पीएचडी केलेल्या विद्यार्थ्यांचा सहभाग होता.

कृषी पदवी अभ्यासक्रमामध्ये पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभागाचे विषय पाचव्या अधिष्ठाता समितीच्या अभ्यासक्रमाप्रमाणे ६ व्या अधिष्ठाता समितीच्या अभ्यासक्रमामध्ये कायम राखण्यात यावेत, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे. समितीने घेतलेला हा निर्णय कायम ठेवला तर आमच्या नोकऱ्यांवर गदा येईल, असे मत विद्यार्थ्यांनी व्यक्त केले आहे.

अधिष्ठाता डॉ. सातप्पा खडतरे म्हणाले की, पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र हा विषय कृषिपूरकच नव्हे तर एकात्मिक कृषि व्यवसाय साखळीचा अतिशय महत्त्वाचा घटक आहे. महाराष्ट्रातील शेतकरी व ग्रामीण लोकसंखेचा शाश्वत विकास करण्यासाठी पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसायाची जोड कृषी शिक्षणामध्ये आवश्यक आहे. पशुवैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांमध्ये जनावरांचे आजार-चिकित्सा विषयक अभ्यासक्रमावर भर देण्यात येतो, तर कृषी पदवी अभ्यासक्रमांमध्ये खाद्यान्न व पशुव्यवस्थापन, दुग्ध व्यवसाय संदर्भातील विषय शिकविण्यात येतात.

विद्यार्थी प्रतिनिधी सचिन पाटील म्हणाले की‚ अभ्यासक्रमांमध्ये ३० टक्केपर्यंत सुधारणा करण्यास वाव असल्यामुळे महाराष्ट्र राज्याच्या चारही कृषी विद्यापीठांमध्ये महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद पुणे, मार्फत ६ व्या अधिष्ठाता समितीच्या कृषी पदवी अभ्यासक्रमामध्ये वरीलप्रमाणे सर्व विषयांचा समावेश करणे अत्यंत आवश्यक आहे. जेणेकरून कृषी पदवीधारकांना पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र ज्ञान प्राप्त होऊन सर्वसमावेशक विद्यार्थी घडून त्याचा उपयोग शेतकरी, पशुपालक व ग्रामीण जनतेच्या सर्वांगीण विकासाकरिता केला जाईल तसेच मोठ्या प्रमाणात स्वयंरोजगार निर्मितीस चालना मिळेल अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.

काय झाला आहे बदल?

कृषी पदवी अभ्यासक्रमामध्ये पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विषयाचे महत्त्व लक्षात घेऊन ०४ विषय (८ भारांक) ग्रामीण कृषी कार्यानुभव (०+२ भारांक) व अनुभवातून शिक्षण (०÷१० भारांक प्रत्येकी) शिकविले जात होते. भारतीय कृषी अनुसंधान परिषद, नवी दिल्ली यांच्या ५ व्या अधिष्ठाता समिती अहवालानुसार कृषी पदवी अभ्यासक्रमामध्ये पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभागाच्या एका विषयाचा (३+१=४ भारांक) अंतर्भाव करण्यात आला होता. नियमानुसार राज्याची निकड व महत्त्व लक्षात घेऊन ३० टक्केपर्यंत सदर अभ्यासक्रमामध्ये सुधारणा करण्याची मुभा होती. त्यानुसार पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभागाचे उपरोक्त अ. क्र. १ नुसार सर्व विषय कायम ठेवून शिकविण्यात येत होते, पण २०२४-२५ या शैक्षणिक वर्षापासून भा.कृ.अ.प. नवी दिल्ली यांच्या ६ व्या अधिष्ठाता समितीच्या अहवाल शिफारशीनुसार पुन्हा कृषी पदवी अभ्यासक्रमामध्ये फक्त एकाच विषयाचा (१+१=२ भारांक) अंतर्भाव करण्यात आला आहे.

Share this story

Latest