माळेगाव साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत गुलाल उधळल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर केल्याप्रमाणे कारखान्याच्या अध्यक्षपदाची धुरा स्विकारली आहे. तर उपाध्यक्षपदी नीरा वागज गटातून निवडून आलेल्या संगीता बाळासाहेब कोकरे यांची निवड केली आहे.
माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीत पवार यांच्या नेतृत्त्वाखाली निळकंठेश्वर पॅनेसने २१ पैकी २० जागा जिंकल्या आहेत. त्यानंतर कारखान्याच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची निवडणूक आज झाली. निवडणूक निर्णय अधिकारी यशवंत माने यांच्या अध्यक्षतेखाली माळेगावचे अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवडणूक प्रक्रिया पार पडली. अध्यक्षपदासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार तर उपाध्यक्षपदी संगीता कोकरे यांचे एकमेव अर्ज आल्याने दोघांची निवड बिनविरोध करण्यात आली.
माळेगावचे चेअरम झाल्यानंतर अजित पवारांचे सहकार क्षेत्रातील राजकारणात पुन्हा एकदा एन्ट्री झाली आहे. त्यांना सहकार क्षेत्रात ३५ वर्षाच्या कामाचा अनुभव आहे. तसेच कोकरे या गेली २५ वर्षे माळेगावच्या संचालिका म्हणून काम करत आहेत.
ही निवड बेकायदेशीर
दरम्यान, या निवडीवर रंजन तावरे आणि चंद्रराव तावरे यांनी आक्षेप घेतला आहे. माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी अजित पवारांची निवड झाल्यानंतर सहकार बचाव पॅनलचे नवनिर्वाचित संचालक चंद्रराव तावरे आणि रंजन तावरे यांनी अजित पवारांच्या चेअरमन पदावर आक्षेप नोंदवला असून, औरंगाबाद खंडपीठाच्या निर्णयानुसार अजित पवारांना चेअरमन होता येत नसल्याचा दावा करीत, ही निवड बेकायदेशीर असल्याचा आरोप केला.