स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकीय वर्तुळात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अशातच, दोन कट्टर राजकीय प्रतिस्पर्धांमधील रंगलेल्या हास्यविनोदाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना थेट लक्ष राहूद्या आमच्यावर अशी मिश्किल टिप्पणी केली आहे.
आज (दि.18) बारामतीमध्ये छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी मतदान केले. यावेळी मतदान केंद्रावर माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट झाली. या भेटीत अजित पवार व हर्षवर्धन पाटील यांच्या संवादातून मिश्किल टोलेबाजी झाल्याचे पाहायला मिळाले.
दोघांमध्ये नेमका संवाद काय?
अजित पवार : नमस्ते...हर्षवर्धन पाटील साहेब... लक्ष राहूद्या आमच्यावर!
हर्षवर्धन पाटील : चांगलं ठेवलंय की...
अजित पवार : झालं का मतदान....?
हर्षवर्धन पाटील : नाही. आताच आलो आहे...!
अजित पवार : आम्ही पाच संस्थेवर आहोत, हे मला माहितीच नाही.
हर्षवर्धन पाटील : (अजित पवार मतपत्रिका पेटीत टाकत असताना) शिक्के नीट मारले का.?
अजित पवार : मारले.... मारले.....
हर्षवर्धन पाटील : चुकलं नाही ना काय?
अजित पवार : दाखवू का तुम्हाला....
दोघांमधील मिश्किल टिपण्णी पाहून मतदान कार्यालयात एकच हशा पिकला.
इंदापूर आणि बारामती तालुक्याच्या सीमेवर असलेल्या भवानीनगर (ता. इंदापूर) येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्यासाठी आज (ता. 18 मे) मतदान झाले. . उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या मार्गदर्शनाखाली पृथ्वीराज जाचक यांच्या नेतृत्वात सर्वपक्षीय पॅनेल निवडणूक लढवत आहेत. त्याला छत्रपती बचाव पॅनेलने आव्हान दिले आहे. कारखान्याची निवडणूक बिनविरोध होईल, असे वाटत असतानाच माजी आमदार राजेंद्र घोलप यांचे नातू करण घोलप, काही माजी संचालक रिंगणात उतरल्याने छत्रपतीची निवडणूक रंगतदार झाली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि कुटुंबीयांनी भवानीनगर येथील केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये खासदार सुनेत्रा पवार, आशाताई पवार, तसेच अजित पवारांच्या निकटवर्तीयांनी मतदान केले.
आमच्या पॅनेलला मतदान करा...
मतदान केल्यानंतर हर्षवर्धन पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी माध्यमांनी अजित पवारांच्या भेटीसंदर्भात प्रश्न उपस्थित केला असता, अजित पवार आणि माझी नेहमीच भेट होते. ते आले मला म्हणाले, आमच्या पॅनेलला मतदान करा. मी त्यांना म्हटलं आमचं तुमचं काय? शेतकऱ्यांचं पॅनेल आहे. असं पाटील यांनी यावेळी सांगितलं.
बारामती आणि इंदापूरच्या कार्यक्षेत्रात हा कारखाना आहे. या कारखान्याचा मी प्रतिनिधी आहे. असे सांगत ते पुढे म्हणाले, सहकारामध्ये कुठला पक्ष वगैरे काही नसतो. सर्वांनी एकत्रित येऊन इथे पॅनेल केलेला आहे. कारण आपण पाहाताय महाराष्ट्रातील सहकारातील साखर कारखानदारी अडचणीत आलेली आहे. ऊस पिकवणारा शेतकरी अडचणीत आलेला आहे. साखर कारखान्यामध्ये काम करणारे कामगार अडचणीत आलेले आहेत. त्यामुळे सहकारी कारखान्यात कुठलंही राजकारण आणलं नाही पाहिजे. सर्वच नेत्यांनी राजकीय मतभेद विसरुन शेतकरी कामगारांसाठी निवडणूक पाहायला हवी. सर्वांचं सहकार्य असायला हवं. अस मतही त्यांनी यावेळी व्यक्त केलं.