पुणे विद्यापीठाच्या कारभाराविरोधात अभाविपचा 'महाआक्रोश मोर्चा'
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाअंतर्गत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना गेल्या २-३ वर्षांपासून गंभीर समस्यांचा सामना करावा लागत आहे. परीक्षा विभागाच्या गलथान कारभार, मुलींना मोफत शिक्षण योजनेची सर्व महाविद्यालयांमध्ये अंमलबजावणी आणि विद्यार्थ्यांना मूलभूत सुविधांसाठी करावा लागत असणारा संघर्ष अशा विविध गंभीर समस्यांना घेऊन अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठावर 'महाआक्रोश मोर्चा' काढला.
विद्यार्थ्यांच्या विविध गंभीर प्रश्नांवर अभाविपने सातत्याने पत्रव्यवहार, चर्चा, पाठपुरावा करून देखील त्यावर कुठलीही ठोस कारवाई विद्यापीठाच्या माध्यमातून करण्यात आली नाही. पूनर्मूल्यांकनाच्या बदललेल्या निकषांमुळे विद्यार्थ्यांच्या मूलभूत अधिकारांवर घाला घालण्यात आला आहे, विद्यापीठामध्ये कुलसचिव, परीक्षा नियंत्रक, अधिष्ठाता अशा सर्व संविधानिक पदांवरती सध्या प्रभारी अधिकारी कार्यरत आहेत, विद्यापीठ परिसरात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना रोजच गंभीर समस्यांना सामोरे जावे लागत आहे. यामध्ये वसतिगृहातील समस्या, भोजनाचा खालावत जाणारा दर्जा, कॅम्पस मध्ये गांजा सापडणे, उंदरांचा हैदोस होणे असे अनेक प्रश्न विद्यार्थ्यांना भेडसावत आहेत. उत्तरपत्रिकेची छायांकित प्रत १००/- उपलब्ध होणे, वर्षभराचे वेळापत्रक विद्यापीठाने वर्षाच्या सुरुवातीला घोषित करावे, बोगस महाविद्यालयांवर कारवाई करावी अशा अनेक महत्त्वाच्या मागण्या अभाविपने केल्या. हा मोर्चा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारापासून सुरू झाला व विद्यापीठाचे मुख्य इमारतीपाशी जाहीर सभा पार पडली. आंदोलनाला उग्र स्वरूपाचे वळण येताना बघून कुलगुरू प्र-कुलगुरू आणि कुलसचिव हे विद्यार्थ्यांपुढे लोटांगण घालीत आंदोलन स्थळावर उपस्थित झाले. सर्व विद्यार्थ्यांच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करण्यात येईल असे आश्वासन देत अभाविपच्या शिष्टमंडळाने चर्चेसाठी यावे अशी विनंती केल्यानंतर अभाविप पश्चिम महाराष्ट्र प्रदेशाच्या शिष्टमंडळाने तब्बल दीड तास कुलगुरू, प्र कुलगुरू,प्रभारी कुलसचिव आणि प्रभारी परीक्षा नियंत्रक यांच्याशी चर्चा करीत सर्व प्रश्न आणि मागण्या मांडल्या. यावेळी जे प्रश्न लगेच सोडविणे आवश्यक आहे त्यावर तात्काळ तोडगा काढण्यात येईल व सर्व मागण्यांवर संबंधित अधिकार मंडळांमध्ये चर्चा करून सकारात्मक निर्णय करण्यात येतील असे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलनाला तात्पुरती स्थगिती देण्यात आली. तसेच सर्व प्रश्न आगामी काही दिवसांमध्ये न सुटल्यास याहीपेक्षा मोठे आंदोलन विद्यापीठा विरोधात करण्याचा इशारा विद्यार्थी परिषदेने दिला. या महाआक्रोश मोर्चात पुणे, अहील्यानगर आणि नाशिक जिल्ह्यातील १५०० हून अधिक विद्यार्थी सहभागी झाले व तब्बल चार तासांनंतर मोर्चा स्थगित करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी विद्यापीठा विरोधात घोषणाबाजी करीत आपला आक्रोश व्यक्त केला. प्रदेश मंत्री अथर्व कुलकर्णी, प्रदेश सहमंत्री ओम मालुंजकर, मेघा शिरगावे, श्रावणी बाचल, पुणे महानगर मंत्री हर्षवर्धन हारपुडे, अहिल्यानगर महानगर मंत्री आनंद गांधी,पिंपरी चिंचवड महानगर मंत्री सिध्देश्वर लाड यांच्यासह पुणे, अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्यातील कार्यकर्ते उपस्थित होते.
"विद्यापीठ प्रशासन गेल्या काही वर्षांपासून विद्यार्थी विरोधी धोरण राबवत आहे. अनेकदा निवेदन, चर्चा आणि पत्रव्यवहार करून देखील या गंभीर समस्यांकडे पाठ करण्याचं काम कुलगुरू करीत आहे.आज अभाविपच्या आंदोलनाने कुलगुरू आणि विद्यापीठ प्रशासनाला झुकण्यास भाग पाडले.पुणे, अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून या मोर्चात विद्यार्थी सहभागी झाले. हा सर्वसामान्य विद्यार्थ्यांचा विजय आहे. संपूर्ण मागण्या पूर्ण होईपर्यंत पाठपुरावा करीत राहणार"
- अथर्व कुलकर्णी, प्रदेश मंत्री, अभाविप प.महाराष्ट्र प्रदेश