पुणे : पीएमपीमध्ये प्रवासी महिलांचे दागिने चोरणारी टोळी अटकेत

पुणे शहराची जीवनवाहिनी असलेल्या पीएमपी बसने दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. बसमधील प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांचे दागिने चोरणारी टोळी सक्रिय असून चोरट्यांच्या टोळीला फरासखाना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

Gang, Stole jewelery,Traveling women, Arrested,PMP

File Photo

पुणे शहराची जीवनवाहिनी असलेल्या पीएमपी बसने दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. बसमधील प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांचे दागिने चोरणारी टोळी सक्रिय असून चोरट्यांच्या टोळीला फरासखाना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्याकडून सात लाख ३४ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने आणि कटर असा मुद्देमाल जप्त केला आहे. यावेळी चार गुन्हे उघड झाले.  

राज कृष्णा माने (वय २३), विकी कृष्णा माने (वय १९), कृष्णा रमेश माने (वय ४४, तिघे रा. सर्वोदय काॅलनी, मुंढवा), सुधीर नागनाथ जाधव (वय ४६, रा. शास्त्रीनगर, अंबरनाथ, जि. ठाणे), संतोष शरणप्पा जाधव (वय ४०, रा. घुलेनगर, मांजरी, हडपसर) अशी अटक केलेल्या टोळीतील चोरट्यांची नावे आहेत. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीएमपी प्रवासी महिलांचे दागिने चोरीला जाण्याचे प्रमाण वाढले होते. हातातील सोन्याच्या बांगड्या कटरचा वापर करून चोरून नेण्याच्या घटना वाढल्या आहेत. तसेच प्रवासी महिलांच्या पिशवीतून दागिने चोरीला जाण्याच्या घटना घडल्या होत्या. या प्रकरणी शहराच्या विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते. तसेच  येरवडा, फरासखाना पोलीस ठाण्यात प्रवासी महिलांकडील दागिने चोरीला जाण्याचे गुन्हे दाखल झाले होते.

या गुन्ह्यांचा तपास पोलिसांकडून केला जात होता. फरासखाना पोलीस ठाण्यातील तपास पथक चोरट्यांचा शोध घेत असताना कसबा पेठेतील सूर्या हाॅस्पिटलसमोर असलेल्या पीएमपी थांब्यावर चोरट्यांची टोळी थांबल्याची माहिती गस्त घालणारे पोलीस कर्मचारी गजानन सोनूने आणि प्रवीण पासलकर यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा लावून आरोपींना पकडले. आरोपींकडून सोन्याचे दागिने, कटर असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. चौकशीत आरोपींनी चार गुन्हे केल्याचे उघडकीस आले आहे.

पोलीस उपायुक्त संदीपसिंग गिल, साहाय्यक आयुक्त नूतन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे, गुन्हे शाखेचे निरीक्षक अजित जाधव, साहाय्यक निरीक्षक वैभव गायकवाड, उपनिरीक्षक अरविंद शिंदे, मेहबूब मोकाशी, गजानन साेनूने, नितीन तेलंगे, महेश राठोड, संदीप कांबळे, प्रवीण पासलकर, वैभव स्वामी, विशाल शिंदे, समीर माळवदकर यांनी ही कारवाई केली.

Share this story

Latest