सग्रहीत छायाचित्र
आडगाव येथील १७ वर्षीय प्रांजल तुकाराम गोपाळे हिचा सर्पदंशामुळे उपचाराअभावी दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना शनिवारी (दि. १७) सकाळी घडली. सकाळी नऊच्या सुमारास साप चावल्यानंतर प्रांजलला वेळेत व योग्य उपचार न मिळाल्याने तिचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सर्पदंश झाल्यानंतर प्रांजलला तात्काळ पाईट येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. मात्र, तेथे सर्पदंशावर आवश्यक असलेली लस आणि डॉक्टर उपस्थित नव्हते. त्यामुळे तिला पुढील उपचारासाठी चांडोली येथील रुग्णालयात पाठविण्यात आले. परंतु, तिथे देखील लस उपलब्ध नसल्याने फक्त प्राथमिक उपचारच करण्यात आले. नंतर १०८ रुग्णवाहिकेद्वारे तिला यशवंतराव चव्हाण रुग्णालयात नेण्यात आले. धक्कादायक बाब म्हणजे, या रुग्णवाहिकेत कोणताही आरोग्य कर्मचारी उपस्थित नव्हता. या सर्व प्रक्रियेदरम्यान वेळ वाया गेला आणि प्रांजलचा रुग्णवाहिकेतच मृत्यू झाला.
या घटनेनंतर प्रांजलच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, आई-वडिलांनी आक्रोश केला. “जर वेळेवर उपचार मिळाले असते, तर आमच्या मुलीचा जीव वाचला असता,” असा आरोप तिच्या नातेवाईकांनी केला आहे. ही घटना आरोग्य व्यवस्थेतील ढिसाळपणाचे आणि ग्रामीण भागात वैद्यकीय सुविधांच्या अभावाचे गंभीर चित्र स्पष्ट करत आहे.