संग्रहित छायाचित्र
वादग्रस्त ठरलेल्या प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांची जॉइनिंगपूर्वीच १७ कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता असून त्यातून ४३ लाख रुपयांचे वार्षिक उत्पन्न मिळत असल्याचे समोर आले आहे.
प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर यांच्या रुबाबाला अन् चमकोगिरीला जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे वैतागले होते. अखेर शासनाने त्यांची बदली करावी, अशी मागणीच खुद्द जिल्हाधिकारी यांनी २८ पानी अहवाल पाठवून केली. त्यानुसार खेडकर यांची वाशिमला रवानगी झाली. आता खेडकर यांचे अन्यही प्रताप समोर येत आहेत. त्यांनी वादग्रस्त अपंगत्व प्रमाणपत्र देऊन आयएएस अधिकारीची पोस्ट मिळवल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. शिवाय नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने निवडणूक लढविलेल्या वडिलांची ४० कोटी रुपयांची संपत्ती असूनही त्यांनी नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र (एनसीएल सर्टिफिकेट) जोडल्याचा आरोप त्यांच्यावर होत आहे. धक्कादायक बाब म्हणजे, जॉईनिंगपूर्वी खेडकर यांची १७ कोटीची स्थावर मालमत्ता असून त्यातून ४३ लाख रुपयांचे वार्षिक उत्पन्न मिळत असल्याचे केंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएसएसी) ला दिलेल्या माहितीतून उघड झाले आहे. पूजा खेडकर यांनी यूपीएससी समोर सादर केलेल्या संपत्तीचे विवरण ‘सीविक मिरर’च्या हाती लागले आहे.
दरम्यान, प्रोबेशनरी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या राजेशाही थाटाची मागणी संपूर्ण महाराष्ट्रात गाजली. पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसेही या थाटाला वैतागले होते. जिल्हाधिकाऱ्यांच्या बाजूच्याच केबिनची मागणी करणे, वरिष्ठांचे अँटीचेंबर बळकावणे, घराच्या मागणीवर अडून बसणे, शिपाई आणि अन्य मदतनीसांची मागणी करणे, ऑडीसारख्या अलिशान गाडीतून ऑफिसला येणे, शिवाय याच खाजगी गाडीला अंबर दिवा बसवून घेणे, वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत हुज्जत घालणे, अशा थाटात खेडकर यांचा पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात वावर होता.
पूजा खेडकर या २०२३ बॅचच्या आयएएस अधिकारी आहेत. यासाठी आवश्यक असणारी केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षाही त्या उत्तीर्ण आहेत. मात्र ही परीक्षा त्यांनी ‘व्हिज्युअली इम्पेअर्ड’ प्रवर्गातून दिली आहे. त्यांना ‘मेंटल इलनेस’ आहे असे प्रमाणपत्र त्यांनी सादर केले आहे. त्यांनी हे प्रमाणपत्र सादर केल्याने कमी गुण असतानाही त्यांना आयएएस पदासाठी प्राधान्य मिळाले. थोडक्यात विशेष सवलत मिळवून त्या आयएएस बनल्या, असा त्यांच्यावर आरोप आहे. पूजा खेडकर यांनी दिलेले प्रमाणपत्र खरे आहे का? त्यांना खरंच काही त्रास आहे का? याची तपासणी करण्याचे केंद्रीय लोकसेवा आयोगाने ठरविले. मात्र तब्बल सहावेळा पूजा खेडकर यांनी वैद्यकीय चाचणीला उपस्थित राहण्याचे टाळले.
आता पूजा खेडकर यांनी यूपीएससीला सादर केलेल्या स्थावर मालमत्तेच्या विवरण पत्रातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. पुण्यात म्हाळुंगे परिसरात ५.८१ आणि ५.९० गुंठे, तसेच कोंढवा परिसरात ७२४ स्क्वेअर फूट जमीन, तर धडवली येथे ४.७४ हेक्टर जमीन, नगर जिल्ह्यातील नांदूरमध्ये २.८९ हेक्टर, पाचुंदे येथे ०.८१ हेक्टर, सारेडीत ९८४ स्क्वेअर फूट मोकळी जागा त्यांच्या मालकीची आहे.
आई-वडील कोट्यधीश असूनही नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र मिळालेच कसे?
इतकेच नाही तर खेडकर यांनी ओबीसी प्रवर्गातून ही परीक्षा दिली होती. यात त्यांना नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र जोडणे आवश्यक होते. ते त्यांनी जोडलेदेखील. पण त्यांचे वडील दिलीप खेडकर माजी सनदी अधिकारी आहेत. त्यांना मिळणारी पेन्शनच लाखोंच्या घरात असते. वडील दिलीप खेडकर यांनी २०२४ मध्ये अहमदनगरमधून लोकसभेची निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांनी ४० कोटींची संपत्ती जाहीर केली होती. तसेच आई मनोरमा खेडकर यांनीदेखील अर्ज भरला होता. निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार आई मनोरमा यांची संपत्ती १५ कोटी तर वडिलांची संपत्ती ४० कोटीं असताना पूजा खेडकर यांना नॉनक्रिमिलेअर प्रमाणपत्र कसे मिळाले, असा सवाल उपस्थित होत आहे. यामुळेच राजकीय हस्तक्षेपाशिवाय या सगळ्या गोष्टी शक्य आहेत का, अशी शंका यायला लागली आहे.
पूजा खेडकर यांच्या स्थावर संपत्ती विवरणपत्रातील माहिती
-वादग्रस्त प्रोबेशनरी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या विषयी आणखीन एक धक्कादायक माहिती समोर
-पूजा खेडकर यांनी केंद्र सरकारला दिलेल्या संपत्तीच्या विवरणातून ही माहिती समोर आली आहे
-पुणे आणि अहमदनगर येथे पूजा खेडकर यांची १७ कोटी हून अधिक किमतीची स्थावर मालमत्ता
-या मालमत्तेतून पूजा खेडकर यांना वार्षिक ४२ लाख रुपयांची कमाई
-पूजा खेडकर यांनी स्वतःच स्थावर संपत्तीच्या विवरणपत्रात ही माहिती दिली आहे
-पूजा खेडकर यांचं स्वतःचं उत्पन्न ४२ लाख रुपये असल्याने त्या ओबीसी प्रवर्गातून आयएएस कशा झाल्या याबाबत प्रश्नचिन्ह
-ओबीसींसाठी आठ लाख रुपये वार्षिक उत्पन्नाची मर्यादा
-पूजा खेडकर यांच्या वडिलांचे उत्पन्नही ओबीसींसाठीच्या क्रिमिलियर मर्यादेपेक्षा जास्त असल्याची माहिती
-उत्पन्न जास्त असल्याने पूजा खेडकर यांची आयएएसपदी नियुक्ती वादग्रस्त ठरण्याची शक्यता
-पूजा खेडकर यांनी कोट्यवधींची ही संपत्ती कशी खरेदी केली, यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. त्यांच्या उत्पन्नाचे साधन काय होते, याबाबत चर्चा
भंडाऱ्यातून अचानक पुण्यात
पूजा खेडकर यांच्या वैद्यकीय प्रमाणपत्रावर आयोगाने हरकत घेतली आणि सेंट्रल अॅडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल अर्थात ‘कॅट’मध्ये पूजा खेडकर यांच्या निवडीला आव्हान दिले. त्यानंतर २३ फेब्रुवारी २०२३ रोजी कॅटने पूजा खेडकर यांच्या विरोधात निकाल दिला. पण त्यानंतर राजकीय घडामोडी घडल्या. खेडकर यांची नियुक्ती वैध ठरवली. त्यांना मसुरीला प्रशिक्षणाला पाठविण्यात आले. तिथले प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर खेडकर यांना भंडारा जिल्ह्यात प्रशिक्षणासाठी पाठविले. पण अचानक त्यांना पुण्यात प्रशिक्षणासाठी पाठविण्यात आले, असे अनेक आरोप खेडकर यांच्या नियुक्तीवर आहेत. आरोप-प्रत्यारोपानंतर अखेर त्यांची बदली वाशिम जिल्ह्यात करण्यात आली आहे.
विविध परिक्षांवरून लोकांचा विश्वास उडत चालला आहे. आता यूपीएससीवरूनदेखील विश्वास उडावा, अशी परिस्थिती आहे. कारण पूजा खेडकर यांच्या अपंगत्वाच्या प्रमाणपत्रावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. दृष्टीदोष आणि मानसिक रुग्ण असताना नियुक्ती कशी काय झाली? सहा वेळा वैद्यकीय तपासणीला गैरहजर कशा राहिल्या? ओबीसी प्रवर्गातून नियुक्ती झालेल्या पूजा यांच्या आई-वडिलांची संपत्ती ५० कोटी रुपयांच्या घरात आहे. मग नॉन क्रिमीलेयर सर्टिफिकेट कसे मिळाले? यूपीएससीच्या निवड प्रक्रियेवर संशय बळावत चालला आहे. त्यामुळे राज्य सरकार आणि केंद्र सरकारने या प्रकरणाची गंभीर दखल घेत कायदेशीर कारवाई करावी. प्रशासकीय सेवेत अशा बनावट प्रमाणपत्राद्वारे नियुक्ती होत असेल तर ते अतिशय धोकादायक आहे. प्रामाणिक उमेदवारांवर अन्याय करून एखाद्याला अशा प्रकारे नियुक्त केले जात असेल तर ते चुकीचे आहे.
- विजय कुंभार, माहिती अधिकार कार्यकर्ते