तक्रारीचे स्वरूप ओळखून ‘एआय’ सुचवणार कायदेशीर कलमे
पुणे : नागरिकांना अधिक जलद, सुलभ आणि अचूक सेवा देण्याच्या उद्देशाने पुणे पोलिसांनी बाणेर पोलीस ठाण्यात प्रायोगिक तत्त्वावर एआय (कृत्रिम बुद्धिमत्ता) आधारित एफआयआर नोंदणी प्रणाली सुरू केली आहे. ही प्रणाली सध्या चाचणी टप्प्यात असून, त्याचा उद्देश पारंपरिक एफआयआर नोंदणी प्रक्रियेतील विलंब आणि मानवी त्रुटी कमी करणे आहे.
यापूर्वी पोलीस ठाण्यांमध्ये एफआयआर नोंदवण्यासाठी तक्रारदारांना कागदपत्रे भरावी लागायची, पोलीस कर्मचाऱ्यांची वैयक्तिक भेट घ्यावी लागायची आणि नोंदणी प्रक्रियेत अनेक वेळा अडचणी येत असत. तथापि, नवीन एआय-आधारित प्रणालीमुळे ही प्रक्रिया अधिक सुलभ, जलद आणि अचूक होणार आहे.
या एआय तंत्रज्ञानाचा मुख्य उपयोग तक्रारीचे स्वरूप ओळखणे आणि त्यानुसार कायदेशीर कलमे सुचवणे यासाठी होणार आहे. नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार एआय प्रणाली एफआयआरचा प्राथमिक मसुदा तयार करते. यामुळे मानवी त्रुटी कमी होतात आणि कायदेशीर अचूकता वाढते. तसेच, पोलीस अधिकारी अंतिम नोंदणीपूर्वी मसुद्याचे पुनरावलोकन करतात आणि आवश्यक दुरुस्त्या केल्यानंतर एफआयआर अधिकृतपणे नोंदवला जातो. नोंदणी झाल्यानंतर तक्रारदाराला लगेचच गुन्हा क्रमांक दिला जातो, ज्यामुळे पारदर्शकता आणि तत्काळ सेवा सुनिश्चित होते.
विशेष म्हणजे, ही प्रणाली फक्त एफआयआर नोंदवण्यापुरती मर्यादित नसून भविष्यात गुन्हे तपास, डेटाबेस व्यवस्थापन आणि पोलीस अहवाल तयार करण्यास देखील मदत करेल. एआय तंत्रज्ञानाचा योग्य वापर केल्यास पोलीस यंत्रणेची कार्यक्षमता वाढेल आणि नागरिकांना जलद सेवा मिळेल. पुणे पोलीसांचा हा प्रायोगिक उपक्रम एफआयआर नोंदवण्याच्या पद्धतीत बदल घडवून आणणारा ठरतो आहे. तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून, नागरिकांना अधिक चांगली सेवा देण्याचा हा उपक्रम भविष्यातील स्मार्ट पोलीसिंगचा महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.
व्हॉइस-टू-टेक्स्टमुळे तोंडी तक्रार करता येणार
या प्रणालीमध्ये व्हॉइस-टू-टेक्स्ट तंत्रज्ञानाचा समावेश असून, नागरिकांना त्यांच्या तक्रारी तोंडी मांडता येतात. ही माहिती तत्काळ लिखित स्वरूपात रूपांतरित होते, ज्यामुळे लेखनात अडचण असणाऱ्या नागरिकांसाठी तक्रार नोंदवणे अधिक सोयीचे ठरते. हे नविन प्रयोग विशेषतः त्या नागरिकांसाठी उपयुक्त ठरणार आहे, ज्यांना एफआयआर नोंदवताना पारंपरिक पद्धतींमध्ये अडचण येत होती.
अर्ध्या तासांत होणार गुन्ह्याची नोंद
बाणेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर जाधव म्हणाले, ही एआय-आधारित एफआयआर नोंदणी प्रक्रिया सध्या प्रायोगिक टप्प्यात आहे. या तंत्रज्ञानामुळे नोंदणी जलद आणि सुसूत्र होईल. भविष्यात ही प्रणाली अधिक सुधारित करून इतर कामांमध्ये वापण्याचाही प्रयत्न करण्यात येणार आहे. तसेच आता एखादा गुन्हा दाखल करताना दोन ते तीन तासाचा कालावधी लागतो तो या सगळ्याचा वापर करून हि वेळ २० ते ३० मिनिटांवर आणण्याचा प्रयत्न आहे.
पोलिसांचाही वाचणार वेळ
या प्रणालीमुळे पोलीस कर्मचाऱ्यांचा वेळ वाचणार आहे आणि ते अधिकाधिक वेळ गुन्हे तपासणी आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यावर केंद्रित करू शकतील. कागदपत्रांचे काम कमी होईल, प्रक्रिया अधिक पारदर्शक होईल आणि नागरिकांचा पोलीस यंत्रणेवरील विश्वास वाढण्यास मदत होईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. पुणे पोलीसांचा हा प्रायोगिक उपक्रम यशस्वी ठरल्यास संपूर्ण राज्यात अशा प्रकारच्या एआय-आधारित नोंदणी प्रणालीची अंमलबजावणी करण्याचा मार्ग मोकळा होईल. यामुळे पोलीस प्रशासन अधिक सक्षम, आधुनिक आणि नागरिकाभिमुख होईल.


