प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे आदेश
पुणे महापालिका प्रशानसनाने समान पाणीवाटप योजनेला गती देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. महापालिकेच्या मुख्य सभेत व स्थायी समिती बैठकीत शहरातील पाणीपुरवठ्याच्या वाढत्या तक्रारींवर तीव्र चर्चा झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पाण्याची मागणी वाढली असली, तरी शहरात आवश्यक तेवढा पाणीसाठा व आर्थिक तरतूद उपलब्ध असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. मात्र, अपुरा व कमी दाबाचा पाणीपुरवठा, दूषित पाणी, तसेच अनियमित वेळापत्रकामुळे नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे.
दरम्यान, वाघोली हौसिंग सोसायटी असोसिएशन व इतर विरुद्ध युनियन ऑफ इंडिया व इतर या जनहित याचिकेच्या अनुषंगाने विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समिती बैठकीतही पाणीपुरवठ्याबाबत मोठ्या प्रमाणात तक्रारींची नोंद झाली आहे. त्यामुळे या समस्यांचे तातडीने निराकरण करण्यासाठी गळती शोधणे, दुरुस्ती करणे आणि अनावश्यक पाणी वापरावर नियंत्रण ठेवणे यावर भर देण्यात येत आहे.
बैठकीदरम्यान अभियंत्यांनी काही नागरिकांकडून जलवाहिन्या टाकणे व मीटर बसविण्याला विरोध होत असल्याचे सांगितले. तसेच पथ विभागाकडून परवानग्या मिळण्यात होणारा विलंबही प्रकल्पाला अडथळा ठरत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणले. यावर उपाय म्हणून भविष्यात पाणीपुरवठा प्रकल्पांसाठी पथ विभागाची पूर्वपरवानगी आवश्यक राहणार नाही, असे परिपत्रक काढण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. एकूणच, समान पाणीवाटप योजना पूर्णत्वास गेल्यास शहरातील पाणीपुरवठा व्यवस्थेत आमूलाग्र बदल होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. प्रशासनाने तातडीने प्रलंबित कामे पूर्ण करून नागरिकांच्या तक्रारी कमी करण्यावर लक्ष केंद्रीत केले आहे.
नव्या झोनल पद्धतीमुळे पाणी व्यवस्थापनात मोठा बदल
समान पाणीवाटप योजनेअंतर्गत शहराचे १४१ झोनमध्ये विभाजन करण्यात आले असून, प्रत्येक झोनसाठी स्वतंत्र जलटाकी व जलवाहिनीची व्यवस्था करण्यात येत आहे. पूर्वी १० ते १२ प्रमुख स्रोतांवरून मोठ्या क्षेत्राला पाणीपुरवठा होत असल्यामुळे शेवटच्या भागांपर्यंत पाणी पोहोचत नव्हते, तर सखल भागात गळती व अतिरिक्त वापरामुळे तफावत निर्माण होत होती. या पार्श्वभूमीवर नव्या झोनल पद्धतीमुळे स्थानिक पातळीवर नियंत्रण शक्य होणार आहे.
टॅंकरवरील अवलंबित्व कमी झाल्याचा दावा
सध्या सुमारे ४० झोन कार्यान्वित झाले असून बाणेर, बालेवाडी, पाषाण, सिंहगड रोड, दत्तवाडी, राजाराम पूल, परांजपे स्कीम, वडगाव खुर्द, कळस, धानोरी आणि मानस सरोवर परिसरात सुमारे ३५ टाक्या सुरू करण्यात आल्या आहेत. या भागांमध्ये पाणीपुरवठ्यात लक्षणीय सुधारणा झाल्याचे प्रशासनाने नमूद केले आहे. विशेषतः कमी दाबाच्या तक्रारी घटल्या असून टेल-एंड भागांमध्येही पाणी पोहोचू लागले आहे. टँकरवरील अवलंबित्वातही मोठी घट झाली आहे.
निश्चित कालमर्यादेत प्रकल्प पूर्ण करा, आयुक्तांचे निर्देश
काही झोनमध्ये पूर्ण विलगीकरण न झाल्यामुळे अपेक्षित परिणाम दिसत नसल्याचे आढळले आहे. यासाठी शेजारील झोनमधील प्रलंबित कामे पूर्ण करणे आवश्यक आहे. किरकोळ कामे रखडल्यामुळे मोठ्या प्रमाणावर तयार झालेली पायाभूत सुविधा पूर्ण क्षमतेने वापरात येत नसल्याचेही निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्तांनी प्रलंबित कामांचा झोननिहाय आढावा घेऊन ती तातडीने पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. टाकीनिहाय कामांचे वेळापत्रक तयार करून निश्चित कालमर्यादेत प्रकल्प पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच, प्रकल्पात अडथळे निर्माण करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचे संकेत देण्यात आले आहेत.


