नियमांचे उल्लंघन करणाऱ्या केबल कंपन्यांवर करणार फौजदारी गुन्हा दाखल; महिनाभरात ३,००० किमी केबल्स हटविण्याचे उद्दिष्ट
पुणे : शहरातील वाढत्या अनधिकृत ओव्हरहेड केबल्सच्या जंजाळावर अखेर महापालिकेने कडक भूमिका घेतली असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या केबल कंपन्यांविरोधात आजपासून (मंगळवार) फौजदारी गुन्हे दाखल करण्याची घोषणा स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी केली. या निर्णयामुळे शहरातील बेकायदेशीर केबल टाकण्याच्या प्रकारांवर आळा बसण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
महापालिकेच्या विद्युत, अतिक्रमण आणि अग्निशमन विभागांच्या संयुक्त पथकाने सोमवारी (दि.६) फरासखाना, बेलबाग आणि बुधवार पेठ परिसरात मोठ्या प्रमाणावर कारवाई करत अनधिकृत केबल्स हटवल्या. या धडक कारवाईनंतर पत्रकार परिषदेत बोलताना भिमाले यांनी शहरातील धोकादायक परिस्थितीची माहिती दिली.
”महापालिका क्षेत्रात सुमारे ३,६०० किलोमीटर लांबीच्या केबल्स अनधिकृत असल्याचे प्राथमिक सर्वेक्षणात आढळले आहे. नियमांनुसार केवळ भूमिगत केबल टाकण्याची परवानगी असतानाही अनेक कंपन्यांनी खांबांवर ओव्हरहेड केबल्स टाकून शहराचे विद्रुपीकरण केले आहे. यामुळे केवळ शहराच्या सौंदर्यावर परिणाम होत नाही, तर नागरिकांच्या सुरक्षेलाही गंभीर धोका निर्माण झाला आहे,” असे भिमाले यांनी स्पष्ट केले.
‘गायरोप’ केबल्समुळे विजेचा धक्का बसण्याचा धोका
शहरातील अनेक रस्ते, चौक आणि इमारतींवर केबल्सचे गुंतागुंतीचे जाळे तयार झाले असून, त्यामुळे अपघातांच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचेही त्यांनी नमूद केले. विशेषतः काही कंपन्यांकडून वापरण्यात येणाऱ्या ‘गायरोप’ केबल्समध्ये ॲल्युमिनियम तारांचा समावेश असल्याने विजेचा धक्का बसण्याचा धोका अधिक असल्याचे त्यांनी सांगितले. महापालिकेने यापूर्वी अनेकदा कारवाई करून केबल्स हटविल्यानंतरही काही कंपन्या पुन्हा अनधिकृतपणे केबल टाकत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे अशा कंपन्यांविरोधात आता थेट फौजदारी गुन्हे दाखल करून कठोर कारवाई केली जाणार असल्याचा इशाराही भिमाले यांनी दिला.
छोट्या केबल ऑपरेटरची काळजी घेणार
दरम्यान, या कारवाईमुळे छोटे केबल ऑपरेटर किंवा ‘वर्क फ्रॉम होम’ करणाऱ्या नागरिकांना अडचण येणार नाही, याची काळजी घेतली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यासंदर्भात महापौर मंजूषा नागपुरे यांच्या उपस्थितीत छोट्या ऑपरेटरच्या शिष्टमंडळासोबत बैठक घेण्यात आली असून, त्यांच्यासाठी स्वतंत्र नियमावली तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या नियमावलीनुसार परवानगी घेऊन शुल्क भरल्यास त्यांना सेवा सुरू ठेवता येणार आहे.
आतापर्यंत १०० किलोमीटर लांबीच्या अनधिकृत केबल्स हटवल्या
महापालिकेकडून १ एप्रिलपासून शहरभर सातत्याने मोहीम राबविण्यात येत असून, आतापर्यंत सुमारे १०० किलोमीटर लांबीच्या अनधिकृत केबल्स हटविण्यात आल्या आहेत. आगामी महिनाभरात तब्बल ३,००० किलोमीटर केबल्स हटविण्याचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. महापालिकेच्या या कठोर भूमिकेमुळे शहरातील बेकायदेशीर केबल जाळ्यावर मोठा आघात होण्याची शक्यता असून, नागरिकांच्या सुरक्षिततेसह शहराच्या सौंदर्यालाही दिलासा मिळणार आहे.


