चिंचवडमध्ये चाकूने भोसकून युवतीचा खून; दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञातांवर गुन्हा

दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात इसमांनी सतरा वर्षीय युवतीवर चाकूने हल्ला केला.

Pimpri Chinchwad crime, crime news, young lady murdered , murdere

दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात इसमांनी सतरा वर्षीय युवतीवर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या युवतीचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना रविवारी (दि. ११) रात्री नऊच्या सुमारास कृष्णाई कॉलनी, वाल्हेकरवाडी येथे घडली. मध्यरात्री याप्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.

खून झालेल्या युवतीचे नाव कोमल भारत जाधव (वय १७, रा. कृष्णाई कॉलनी, वाल्हेकरवाडी, चिंचवड) असे आहे. याप्रकरणी युवतीचा मामा सचिन बिभीषण माने (वय ३९, रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड) यांनी चिंचवड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, दुचाकीवरून आलेल्या दोघा अज्ञात इसमांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास फिर्यादी यांची मुलगी आदिती हिने फोन करून कळवले की, कोमल दिदीला दोन अज्ञात व्यक्तींनी दुचाकीवर येऊन चाकूने हल्ला केला असून ती रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्ध पडली आहे.

त्यावरून फिर्यादी सचिन माने यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन कोमलला आपल्या वाहनातून ऑक्सीकेअर रुग्णालयात दाखल केले. तेथील डॉक्टरांनी कोमलला पाहून तातडीने वायसीएम रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला. मात्र, वायसीएम रुग्णालयात दाखल करताच डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

दरम्यान, माहिती मिळताच चिंचवड पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला आहे. हल्ल्यामागील नेमकं कारण अद्याप समजू शकलेले नाही. सर्व शक्यता गृहीत धरून पोलीस तपास करत आहेत.

कोमल ही कृष्णाई कॉलनी, चिंचवड येथे आपल्या आई व भावासोबत राहत होती. तिच्या वडिलांना दारूचे व्यसन असल्याने गेल्या काही वर्षांपासून तिची आई पतीपासून विभक्त राहत आहे.

Share this story

Latest