पीएमआरडीएच्या आयुक्तपदी योगेश म्हसे
राज्यात आगामी विधानसभा निवडणुका तोंडावर मोठ्या प्रमाणात फेरबदल होण्याची चिन्हे असून, त्याची सुरुवात पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणतून (पीएमआरडीए) झाली. जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात काम करून प्रशासकीय कौशल्याबद्दल ओळखले जाणारे योगेश म्हसे यांची प्राधिकरण आयुक्त म्हणून नेमणूक केली आहे. म्हसे आज (२८ जून) पदभार स्वीकारणार आहेत.
आयुक्तपदी राहुल महिवाल यांच्या जागी योगेश म्हसे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महिवाल यांच्याकडे पीएमआरडीए आणि पिंपरी-चिंचवड महापालिका अशा दोन्ही जबाबदाऱ्या होत्या. त्यातच दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करण्यासाठी अवघे दोन महिने बाकी असताना त्यांची बदली झाली आहे. पीएमआरडीए कार्यालयाचा पदभार त्यांनी तत्कालीन आयुक्त सुहास दिवसे यांच्याकडून १८ ऑगस्ट २०२२ रोजी स्वीकारला होता. तर, २७ जून २०२४ या दिवशी सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव (सेवा) नितीन गद्रे यांनी योगेश म्हसे यांच्या नियुक्तीबाबतचे पत्र जारी केले आहे.
पीएमआरडीए अंतर्गत ९ तालुक्यातील ८१६ गावांचा समावेश आहे. त्यात मुळशीसह अन्य काही महत्त्वाची गावे देखील यामध्ये येतात. हिंजवडीसारखा आयटी विभाग पीएमआरडीए अंतर्गत येतो. त्यामुळे या नियुक्तीमुळे पुणे जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणेवर उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांचा ‘होल्ड’ कायम ठेवला असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, पीएमआरडीए स्थापन होण्यापूर्वी अस्तित्वात असलेले पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण अर्थात पीसीएनटीडीएमध्ये योगेश म्हसे यांनी जवळपास तीन वर्षांचा कालावधी पूर्ण केला आहे. ते या ठिकाणी मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून १७ जुलै २०११ ते १८ सप्टेंबर १४ या कालावधीत ते नियुक्तीस होते. अनधिकृत बांधकामावर कारवाई आणि प्रशासकीय कामांमध्ये असलेला होल्ड यामुळे त्यांची कारकीर्द गाजली होती. या काळात प्राधिकरणाचे अनेक रखडलेले विषय त्यांनी मार्गी लावले होते. आता पुन्हा पीएमआरडीएचे आयुक्त म्हणून ते पदभार स्वीकारणार आहेत.
... अन् आयुक्त बदलीची कुजबुज
पिंपरी-चिंचवड महापालिकेचे प्रभारी आयुक्त म्हणून राहुल महिवाल यांची नियुक्ती झाली. त्याचवेळी प्राधिकरणातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये आयुक्तांची बदली होण्याची कुजबुज सुरू होती. विशेष म्हणजे बदली होण्यापूर्वी बुधवारी (२६ जून) आयुक्त महिवाल हे दिवसभर प्राधिकरणात बसून होते. जाण्यापूर्वी आपल्या अधिकाराचा वापर केला. मात्र, गुरुवारी ते आले नाहीत.
ही कामे मार्गी लागणार ?
पीएमआरडीए अंतर्गत अनेक विषय राज्य शासन आणि केंद्राकडे प्रलंबित आहेत. विकास आराखडा, बजेट यासह महत्त्वाचे प्रकल्पदेखील पुढे सरकू शकले नाहीत. त्यामुळे नवीन आयुक्त आल्यानंतर हे काम मार्गे लागतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे रिंग रोड, मेट्रो, इंद्रायणी सुधार प्रकल्प यांसारखे केंद्रीय स्तरावरील विषयदेखील गती देणे आवश्यक आहे.
ही कामे रखडली...
भूसंपादनाअभावी प्रलंबित असलेला रिंग रोड
गृहप्रकल्पातील शिल्लक राहिलेली घरांची सोडत
शैक्षणिक भूखंड लिलाव
मेट्रो कामाला गती मिळणे
रस्ते, त्याचप्रमाणे इतर विकास कामे
लोणावळ्यातील स्काय वॉक प्रकल्पाला गती देणे
अनधिकृत बांधकाम आणि अनधिकृत हॉर्दिंग वर नियंत्रण ठेवणे
अग्निशमन यंत्रणा आणि अधिकारी कर्मचारी वाढवणे
नवीन भरती होईपर्यंत बाह्य स्रोतनुसार मनुष्यबळ प्राप्त करणे