संग्रहित छायाचित्र
थेरगाव येथे पवना नदीवर बटरफ्लाय आकारातील स्टील गर्डरमधील पुलाच्या उभारणीचे काम पूर्ण झाले आहे. पुलाला जोडणाऱ्या जोड रस्त्याचे काम अपूर्ण असल्याने हा पूल अद्याप सुरू होऊ शकलेला नाही. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतरच पूल वाहतुकीसाठी खुला होणार का? असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. मात्र, निविदा प्रसिद्ध झाल्यानंतर ७ वर्षे झाले या पुलाचे काम रखडले आहे.
चिंचवडगाव ते थेरगावाला जोडणारा बटरफ्लाय आकारातील स्टील गर्डर पुल उभारण्यात येत आहे. थेरगाव येथील विकास आराखड्यातील १८ मीटर रस्त्यावर हा पूल तयार केला जात आहे. मोरया गोसावी मंदीरपासून काही अंतरावर पवना नदीवर साकारणारा हा पूल थेरगाव आणि चिंचवड अशा दोन गावांना जोडणारा आहे.
महापालिकेच्या सन २०१६ -१७ या आर्थिक वर्षात पुलाच्या कामासाठी निविदा काढण्यात आली. त्यानंतर प्रत्यक्ष कार्यादेश देऊन कामाला सुरुवात झाली. या पुलाच्या कामासाठी २५ कोटी १९ लाख रुपये इतका खर्च मंजूर आहे.
पुलासाठी नदीपात्रामध्ये कोणताही पिलर (सपोर्ट खांब) टाकलेला नाही. त्यामुळे पवना नदीचा प्रवाह सुरळीत वाहू शकणार आहे. थेरगाव पवना नदीवर साकारत असलेला बटरफ्लाय प्रकारातील राज्यातील हा पहिलाच पूल आहे. पुलावरील डांबरीकरण आणि जोड रस्त्याचे काम वेगात सुरू आहे. १०७ मीटर लांबीचा हा पूल आहे. १८ ते २८.२० मीटर इतकी पुलाची रुंदी आहे.
दरम्यान, महापालिकेकडून उभारण्यात येणा-या या पुलाला सात वर्ष लोटली तरीही पुलाचे काम पुर्ण झालेले नाही. पुलाचे काम वेगात सुरु असल्याचे अधिकारी सांगत असले तरीही पुलाला जोडणा-या एका बाजूला काम अपुर्ण असल्याचे नागरिक सांगत आहेत. त्यामुळे आणखी किती दिवस ह्या पुलाचे काम सुरु राहणार असून नागरिकांना कधी पुल वाहतूकीसाठी खुला करणार असा सवाल देखील नागरिक उपस्थित करत आहेत.
वाहतूक सुरळीत होणार
थेरगाव आणि चिंचवडला जोडणारे दोन पूल सध्या पवना नदीवर आहेत. बिर्ला रुग्णालयाजवळ मोठा, तर धनेश्वर मंदिराजवळ छोटा पूल आहे. हा छोटा पूल अरुंद असल्याने येथून अवजड वाहनांची वाहतूक होत नाही. त्यामुळे प्रसूनधाम सोसायटीशेजारी नव्याने उभारण्यात येत असलेला पूल वाहतुकीसाठी फायदेशीर ठरणार आहे. या पुलाने थेरगाव येथील चिंचवड आणि तेथून पिंपरी सहजतेने ये-जा करणे वाहनचालकांना शक्य होणार आहे.