संग्रहित छायाचित्र
स्थानिकांच्या तीव्र विरोधामुळे चिखली-कुदळवाडी येथील टीपी स्कीम रद्द करण्याचा निर्णय पिंपरी-चिंचवड महापालिकेने घेतला असतानाच चऱ्होली येथील टीपी स्कीम मात्र नागरिकांच्या विरोधानंतरही कायम ठेवण्यात आली आहे. यामुळे चिडलेल्या ग्रामस्थांनी ‘‘आमच्यासोबतच दुजाभाव कशासाठी,’’ असा सवाल महापालिका प्रशासनाला केला आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने चिखली-कुदळवाडी आणि चऱ्होलीसह मोशी गावातील काही भागात प्रस्तावित टीपी स्कीम राबवण्याचा निर्णय घेतला होता. त्याला तिन्ही गावांतील ग्रामस्थांनी तीव्र आक्षेप घेत काही झाले, तरी आम्ही ही योजना होऊन देणार नाही, असा पवित्रा घेतला होता. त्यापैकी चिखली, कुदळवाडी येथील ही योजना रद्द करण्याचा निर्णय महापालिका सर्वसाधारण सभेत घेण्यात आला. मात्र, दुसरीकडे सर्वात जास्त जागा बाधित होणाऱ्या चऱ्होलीतील प्रस्तावित टीपी स्किम रद्द न केल्याने चऱ्होली ग्रामस्थांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे. महापालिका प्रशासन आमच्या बाबतच असा दुजाभाव का करत आहे, असा सवाल चऱ्होलीच्या ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.
महापालिकेच्या वतीने चिखली-कुदळवाडी येथील ३८० हेक्टर, तर चऱ्होली येथे पाच ठिकाणी १,४२५ हेक्टरवर टीपी स्कीम प्रस्तावित करण्यात आल्याचे जाहिरातीद्वारे प्रकटन केले होते. याबाबत नागरिकांना आणि लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेता योजना राबवल्याचा आरोप करीत चिखली, चऱ्होली आणि मोशी ग्रामस्थांनी महापालिका प्रशासनाचा निषेध केला होता. चिखलीतील ग्रामस्थांनी महापालिका प्रशासनाने त्या जाहिरातीची सार्वजनिक ठिकाणी एकत्रित जमून होळी केली होती. त्यानंतर झालेल्या बैठकीत श्री भैरवनाथ बचाव कृती समितीची स्थापना करून या परिसरातील स्थानिक ग्रामस्थ, विविध व्यवसाय निमित्त आलेले उद्योजक, कामगार यांनी एकजुटीने महापालिकेच्या टीपी स्कीमला विरोध केला.
एक इंचही जागा देणार नाही; ग्रामस्थांचा निर्धार
चऱ्होली भागात सर्वाधिक म्हणजे १,४२५ हेक्टर जमिनीवर टीपी स्कीम टाकण्याचा प्रस्ताव पिंपरी-चिंचवड महापालिकेने मांडला आहे. त्याच्या विरोधात ही ग्रामस्थांनी एक इंचही जागा देणार नाही, असा निर्धार बैठकीत व्यक्त केला आहे. योजनेत आमच्या जमिनी आरक्षित करण्यात आल्या आहेत. टीपी स्कीम आल्यावर वर्षभर बांधकाम परवानगी बंद करण्याचा निर्णय महापालिका घेणार आहे. त्यामुळे चऱ्होलीमधे जो विकास सुरू होणार आहे त्याला खीळ बसणार आहे. तसेच योजना मंजूर झाल्यावर नागरिक भूमिहीन होण्याचा धोका वाढत असल्याने चऱ्होलीकरांनी या प्रस्तावित टीपी स्कीमच्या विरोधात जनआंदोलन उभारण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
चिखली-कुदळवाडी येथील टीपी स्कीम रद्द करण्यात आली. मग चऱ्होलीत स्कीम राबवण्याचा अट्टाहास कशासाठी? महापालिका प्रशासनाने इथे योजना का रद्द केली नाही? आमच्याबाबतच दुटप्पी भूमिका का, प्रशासनाने जाहीरपणे सांगावे. आम्ही हे आंदोलन सुरूच ठेवणार आहोत. - कुणाल तापकीर
आमच्या गावाने तुमचे काय घोडे मारले आहे? १,४२५ हेक्टर जमीन ताब्यात घेणे हा आम्हा गावकऱ्यांना भूमिहीन करण्याचा प्रशासनाचा डाव आहे. लोकप्रतिनिधींनी चिखलीची टीपी स्कीम रद्द करण्याची मागणी केली होती. आता ती स्कीम रद्द झाल्याचे सांगण्यात आले आहे. या लोकप्रतिनिधींनी आता चऱ्होलीसाठी प्रयत्न करायला हवे आहेत. जर प्रशासनाने ही स्कीम रद्द केली नाही तर आम्ही जनआंदोलन सुरूच ठेवणार आहोत. - मंगेश माटे, शेतकरी, चऱ्होली