संग्रहित छायाचित्र
शहरात मोठ्या प्रमाणात अवैध वृक्षतोड होत आहे. महापालिकेच्या उद्यान विभागाकडून विविध कारणांनी वृक्षतोड करण्यात येत आहे. उद्यान विभागातील निरीक्षक आणि ठेकेदारांनी वारेमाप वृक्षतोड, झाडाच्या फाद्या तोडून दररोज हजारो टन लाकूड परस्पर विकले जात आहे. या तोडलेल्या लाकडांमध्ये दहा गाड्यांची परस्पर विल्हेवाट लावून एका गाड्याची नोंद उद्यान विभागातील रजिस्टर लावून पावती तयार केली जात आहे. विशेष म्हणजे सात वर्षांत लाकूड विकलेल्या केवळ २०४ पावत्या केल्या. तर काही वेळा वर्षभरात एक-दोनच पावत्या केलेल्या आहेत. त्यात ५५ पैसे प्रतिकिलो लाकूड विकून ५५२ रुपये प्रतिटन भाव घेतला आहे. त्यामुळे महापालिकेच्या उद्यान विभागात लाकूड घोटाळा झाला असून पिंपरी-चिंचवडचा पुष्पा कोण? अशी चर्चा शहरात सुरु आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत वृक्षतोड होत आहे. महापालिकेच्या उद्यान विभागाकडून वेगवेगळ्या कारणांनी वृक्षतोड करण्यात येत आहे. त्यामुळे पालिकेच्या सेक्टर २७ आणि गुलाब पुष्प उद्यानात दररोज वृक्ष तोड केलेल्या झाडांचे ढीग पाहावयास मिळत आहेत. यावरून महापालिकेचा उद्यान विभाग वृक्ष संवर्धन करतो की वृक्ष तोड अशी चर्चा पर्यावरण प्रेमी नागरिकांमध्ये जोरदार सुरु आहे. वृक्ष तोड केल्यानंतर त्या झाडांचा जाहीर लिलाव करुन लाखो रुपये गोळा केले जात आहेत.
शहरात मोठ्या प्रमाणावर वृक्ष संपदा आहे. शहरालगत असलेल्या गावांमध्ये आजही शेती केली जाते. पण, असे असले तरी नागरिकरणामुळे वृक्ष तोड मोठ्या प्रमाणात वाढली आहे. पालिका उद्यान विभागाने वृक्ष गणना पूर्ण केली आहे. जीआयएस पद्धतीने झालेल्या या गणनेतून शहरात तब्बल ३२ लाख वृक्ष असल्याची नोंद करण्यात आली आहे. तर उद्यान विभागाकडून धोकादायक झालेली झाडे, विकास कामांना अडथळा ठरणारी झाडे, पथदिवे, विद्युत तारांना आडव्या येणाऱ्या फांद्या, गृहनिर्माण प्रकल्पात बांधकाम व्यावसायिक होणारी वृक्षतोड, नागरिकांच्या घरांसमोर अडथळा ठरणारे झाडे अशा विविध कारणांनी दररोज शहरातील हजारो झाडांची मोठ्या प्रमाणात कत्तल सुरु आहे. तसेच पावसाळ्यापूर्वी शहरातील धोकादायक वृक्षांची गणना केली जाते. त्यानंतर त्याची छाटणी करायची की तोडायची याबाबत परिस्थिती पाहून निर्णय घेतला जातो. पण, अनेकदा झाडांना धोकादायक ठरवून ती पुर्णपणे तोडली जाऊ लागली आहेत. सोसाट्याचा वारा आणि जोरदार पावसामुळे जुनी झाडे धोकादायक ठरवली जात आहेत.
अनेकदा वादळी वाऱ्यामुळे धोकादायक वृक्ष अचानक पडण्याची भीती असते. शहरातील मुख्य रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात वृक्ष आहे. काही वृक्ष दुभाजकामध्ये आहेत. त्या झाडांची कत्तल केली जात आहे. उद्यान विभागाने वेगवेगळ्या कारणांनी वृक्षांची तोड करण्यास चार ठेकेदार नियुक्त केले आहेत. वृक्ष निरीक्षकांकडून अहवाल मागवून त्या झाडांची तोड केली जाते. पण, हे निरीक्षक, वरिष्ठ अधिकारी हे वृक्षाच्या मूळावर उठले आहेत. वृक्ष संवर्धन प्राधिकरण समितीच्या परवानगीपूर्वीच काही झाडांची तोड केली जात आहे, असे पर्यावरणप्रेमी नागरिकांचे म्हणणे आहे. उद्यान विभागातील गुलाब पुष्प आणि सेक्टर २७ मधील जागेवर तोडलेल्या वृक्षाची ढीग पाहता उद्यान विभाग वृक्ष संवर्धन नव्हे तर वृक्षतोड करु लागल्याचा आक्षेप पर्यावरण प्रेमींकडून घेतला जात आहेत.
दरम्यान, महापालिकेच्या उद्यान विभागातील लाकूड घोटाळ्यात वृक्ष निरीक्षक, अधिक्षक, वरिष्ठ अधिकारी आणि ठेकेदार यांच्या संगणमताने लाखो रुपयांचा घोटाळा होत आहे. शेकडो लाकडाच्या गाड्या परस्पर गायब करुन अधिकारी हे पालिकेचे आर्थिक नुकसान करत आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री, वनमंत्री, महापालिका आयुक्त, विभागीय आयुक्त, हरित लवाद यांच्याकडे लाकूड घोटाळ्याची तक्रार केली असून या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करावी, अशी मागणी तक्रारदार प्रशांत राऊळ यांनी केली आहे.
कोविड लॉकडाऊन वृक्षतोडीचे आदेश
महापालिकेच्या उद्यान विभागाने २०२० ते २०२१ या आर्थिक वर्षात तब्बल ४७९ वृक्ष तोड करण्याचे आदेश दिले आहेत. मुळात अख्या देशात कोविड सुरु होता. त्या काळात २१ मार्चला लाॅकडाऊन सुरु झाले होते. त्यानंतर सहा महिन्यांत सर्वाधिक वृक्षतोड करण्याचे आदेश उद्यान विभागाकडून दिले आहेत. त्यामुळे झाडे तोडण्यासाठी कोविड काळात उद्यान विभागाने आदेश कसे काय दिले, असा सवाल उपस्थित होत आहे.
लाकूड विकून सात वर्षांत सात लाख उपन्न
महापालिका वृक्ष अधिनियमानुसार एक टक्का कर हवा. पण, पालिका ३ टक्के वृक्षकर घेते. शहरात नैसर्गिकरित्या पडलेल्या झाडाच्या लाकडाचा, पालिकेच्या मालकीच्या तोडलेल्या झाडांच्या लाकडांचा कसलाच हिशोब लागत नाही. सन २०१७ ते २०२४ या कालावधीत उद्यान विभागाने २०१७-१८ मध्ये १७५२ रुपये प्रति टन, २०१८-१९ मध्ये ५५० रुपये प्रतिटन, २०१९-२० मध्ये ६६६ रुपये प्रतिटन अशा प्रकारे लाकूड विकले आहे. यामध्ये सात वर्षांत २०४ पावत्या करुन लाकूड विकून ७ लाख ९६९ रुपये उपन्न मिळाले आहे. लाकुड हे वेगवेगळे मूल्य असलेली वस्तू आहे. अगदी जळाऊ लाकुड हे १५ रुपये ते ८ हजार रुपये किलो असे त्याचे भाव आहेत. शहरात देखील अनेक प्रकारची वृक्ष आहेत. ज्या पासुन पालिकेला लाकुड मिळते. पालिकेचा तो एक उत्पन्नाचा स्त्रोत आहे. मात्र, उद्यान विभागाचे निरीक्षक, सहायक अधिक्षक, वरिष्ठ अधिकारी आणि ठेकेदार मिळून लाखो रुपयाचे लाकूड विकून आर्थिक घोटाळा करु लागले आहेत.
महापालिकेच्या उद्यान विभागाकडून अधिकृत परवानगी देऊन झाडे तोडली जातात. पण हे लाकूड पालिकेकडे गोडाऊनमध्ये येत नाही. दहापैकी लाकडाच्या एका गाडीची पावती करत नोंद होत आहे. ते लाकूड परस्पर खासगी वखारीकडे पाठवून विकले जात आहेत. बिल्डर, खासगी झाडे तोडल्यावर तो ठेकेदार लाकूड घेवून जातो. शिवाय पाच ते दहा हजार रुपये झाडे तोडण्याचे घेतो. शहरातील स्मशानभूमी, बेकरी, हाॅटेल याठिकाणी दररोज पाच लाख टन लाकडाची मागणी आहे. जळावू लाकडाची १२ हजार रुपये प्रति टन दर आहे. पण महापालिकेकडून ५५०, ६६६ रुपये प्रति टन लाकूड विकले आहे. विशेष म्हणजे चंदन, रक्तचंदन लाकडाची देखील तस्करी होवू लागली आहे.
- प्रशांत राऊळ, तक्रारदार, नागरिक
पर्यावरणप्रेमींकडून आक्षेप घेऊन आयुक्तांकडे तक्रार
महापालिकेच्या मालकीचे लाकुड हे उद्यान विभागात जमा न होता ते खासगी वखारींना विकले जाते
लाकूड तोडल्यानंतर किती लाकुड जमा झाले, ते नेमके कुठे गेले, उद्यान विभागात की खाजगी वखारीत, याकरिता वन विभागाचे ट्रान्झिट पास घेतले नाहीत.
लाकडाची विक्री करताना बाजार भावापेक्षा खूपच कमी दर ठेवला. तो वाढवण्याऐवजी लाकडाचा दर प्रतिटन कमी केला आहे.
लिलाव करताना नेमके किती लाकुड नेले गेले, किती पावती केली. याची कोणतीही नोंद रजिस्टर नाही.
उद्यान विभागाच्या गेटवर नोंदणी वहीत किती लाकडाच्या गाड्या आल्या. त्यात नोंदी ठेवल्या नाहीत.
वृक्ष तोड केल्यानंतर लाकूड उद्यान विभागात जमा न करता परस्पर विकले जात आहे.
सात वर्षात लाकूड विकलेला तक्ता
२०१७-१८ १७५२ ७८,९८५ २९
२०१८-१९ ५५० २,८५,३३४ १३०
२०१९-२० ६६६ १३,४०० ०१
२०२०-२१ - १०,१६० ०१
२०२१-२२ - ०० ००
२०२२-२३ - २,८६,८२० ४०
२०२३-२४ - २६,२७० ०३
एकूण ७,००९६९ २०४