संग्रहित छायाचित्र
विकास शिंदे :
पिंपरी-चिंचवड महापालिकेचे वार्षिक अंदाजपत्रक तयार करताना भांडवली विभागांकडून अंदाजपत्रकामध्ये नवीन विकास कामे अथवा मोठ्या प्रकल्पांचा समावेश करताना नाममात्र (टोकन) तरतुदी ठेवल्याचे निदर्शनास आले होते. अशा विकासकामांचा अंदाजपत्रकात समावेश करण्यात येणार नसल्याचे आयुक्त शेखर सिंह यांनी सांगितले आहे. एकूण अंदाजपत्रकाच्या किमान २५ टक्के तरतूद ठेवा, अशा सूचना संबंधित विभागांना आयुक्तांनी दिलेल्या आहेत.
नवीन विकासकामे अथवा मोठ्या प्रकल्पांना नाममात्र तरतूद ठेवल्यामुळे महापालिकेच्या आर्थिक दायीत्वामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे. महापालिकेच्या आर्थिक नियोजन, आर्थिक औचित्य व आर्थिक शिस्तीच्या दृष्टीने नवीन विकास कामांचा अंदाजपत्रकामध्ये समावेश करणे गरजेचे आहे. त्यासाठी अंदाजपत्रकीय रकमेच्या तुलनेत तसेच कामाचा कालावधी गृहीत धरून त्या प्रमाणात पुरेशी तरतूद करणे आवश्यक असल्याचे आयुक्तांनी सुचविले आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेचे सध्याचे पत मूल्यांकन 'एए प्लस' आहे.
महापालिकेला भविष्यामध्ये कर्जरोखे उभारण्याची आवश्यकता वाटल्यास चांगले पत मूल्यांकन राखणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी महापालिकेच्या दायीत्वामध्ये वाढ झाल्यास अथवा आर्थिक स्थिती आटोक्यात न राहिल्यास पत मूल्यांकन घसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे वित्तीय उपाययोजना करणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे अंदाजपत्रकामध्ये नवीन विकासकामे किंवा प्रकल्पांचा समावेश करताना अंदाजपत्रकीय रकमेच्या किमान २५ टक्के तरतूद ठेवणे अपेक्षित आहे. अथवा कामाचा कालावधी गृहीत धरून त्या प्रमाणात टक्केवारीची विभागणी करून ज्या त्या वित्तीय वर्षात तरतूद ठेवण्याची दक्षता घ्यावी, असे आदेश आयुक्तांनी परिपत्रकाद्वारे दिले आहेत. सर्व विभागप्रमुखांनी नोंद घ्यावी व काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, अशा सूचना आयुक्त सिंह यांनी दिले आहेत.