वाळूमाफियांचा रात्रीस खेळ चाले... पिंपळे निलख परिसरात मुळा नदीतून अवैध वाळूउपसा जोरात सुरु

पिंपरी-चिंचवड शहरातून वाहणाऱ्या मुळा नदीतून रात्रीतून लाखो ब्रास वाळूची अवैध चोरी होत आहे. पुणे जिल्ह्यात नदीपात्रातून वाळूउपसा करण्यास बंदी असतानादेखील पिंपळे निलख परिसरातून कित्येक दिवसापासून रात्री जेसीबीच्या सहाय्याने अवैध वाळूउपसा केला जात आहे.

Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

पिंपळे निलख परिसरात मुळा नदीतून अवैध वाळूउपसा जोरात सुरु

लाखो ब्रास वाळूची होतेय चोरी, पिंपरी-चिंचवड अप्पर तहसीलदारांचे दुर्लक्ष

पिंपरी-चिंचवड शहरातून वाहणाऱ्या मुळा नदीतून रात्रीतून लाखो ब्रास वाळूची अवैध चोरी होत आहे. पुणे जिल्ह्यात नदीपात्रातून वाळूउपसा करण्यास बंदी असतानादेखील पिंपळे निलख परिसरातून कित्येक दिवसापासून रात्री जेसीबीच्या सहाय्याने अवैध वाळूउपसा केला जात आहे.

 पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहराच्या हद्दीवरून वाहणाऱ्या मुळा नदीचे दोन्ही महापालिकेकडून नदीसुधार प्रकल्पाचे काम सुरु आहे. नदीच्या पुनरुज्जीवन प्रकल्पाअंतर्गंत दोन टप्प्यात हे काम हाती घेतले आहे. त्यापैकी पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून पहिल्या टप्प्यात पिंपळे निलख येथे नदीकाठावर हे काम सुरु आहे. मात्र, एकीकडे नदीसुधार प्रकल्पाचे काम सुरु असताना त्याच कामाचा फायदा घेत वाळूमाफियांनी मुळा नदीतून वाळू तस्करी करण्याची संधी साधली आहे. पिंपळे निलख परिसरात मुळा नदीतून अवैधपणे वाळूउपसा करून रात्रीत ट्रॅक्टर, हायवाद्वारे त्याची वाहतूक केली जात आहे. याकडे पिंपरी-चिंचवड अप्पर तहसिलदारांसह स्थानिक तलाठ्यांकडून दुर्लक्ष केले जात आहे.

मुळा नदी उत्तरेकडून पुण्याच्या वायव्य दिशेकडे वाहते. पौड, लवळे, नांदे आणि हिंजवडी, कस्पटे वस्ती आणि बालेवाडी ही उपनगरे ओलांडून पिंपरी-चिंचवडमार्गे ती पुणे शहरात प्रवेश करते. पुण्याच्या मुळा आणि मुठा या दोन्ही मोठ्या नद्या शहरातील संगम पुलाजवळ एकत्र येतात. रांजणगाव येथे या नद्या मोठ्या भीमा नदीत विलीन होतात.

मुळा नदीत सांडपाणी, केमिकलयुक्त रासायनिक पाणी आणि नाल्याचे पाणी मिसळत असल्याने नदीचे प्रदूषण प्रचंड वाढले आहे. त्यामुळे पुणे आणि  पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून संयुक्तपणे नदीसुधार प्रकल्प राबविला जात आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील मुळा नदीकाठाची लांबी १४.२० किलोमीटर इतकी आहे. त्यानुसार महापालिकेने मुळा नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाचे काम सुरु केले. मुळा नदीचे पात्र स्वच्छ आणि सुंदर व्हावे, त्यातून शहराची हवा स्वच्छ राहण्यास मदत होईल, शहर पर्यटनास चालना मिळण्यास मदत होईल, असा दावा प्रशासनाचा आहे. परंतु, हे काम करताना होणारी वृक्षतोड आणि नदीपात्रात माती, मुरुम, दगड टाकण्यावरून पर्यावरणप्रेमी संताप व्यक्त करीत आहे. यापेक्षा गंभीर बाब म्हणजे, नदीतून वाळूतस्करी करण्याचा प्रकार नदीसुधार प्रकल्पाचे काम सुरू असताना होत आहे.

मुळा नदीसुधार प्रकल्पाचे काम सुरु असताना नदी पात्रातलगत या ठिकाणी टाकण्यात येत असलेल्या मुरूमाची वाहतूक करणा-या वाहनांकडे गौण खनिज उत्खननाच्या परवानगीचे चलन नाहीत. त्यांच्याकडे उत्खननाचे कोणतेही आदेश अथवा चलनाच्या पावत्या नसल्याचे दिसून आलेले आहे. याबाबत केवळ संबंधितावर २० हजार रुपये दंडात्मक कारवाई केली आहे. परंतु, यापूर्वी या कामासाठी टाकण्यात आलेला मुरूम हा हजारो ब्रास आहे. या टाकलेल्या गौण खनिजाची इटीएस मोजणी करून चौकशी करून अनधिकृत गौण खनिजनाचा दंड आकरण्यात यावा, अशी मागणी पिंपरी-चिंचवड तहसिलदार कार्यालयाकडे करण्यात आली आहे.

‘त्याच’ रस्त्यांवरून वाळूतस्करी

पिंपळे निलखमध्ये मुळा नदीपात्रात अनेक ठिकाणी वाळूउपसा सुरु केला आहे. नदीत ठिकठिकाणी वाळूचे ढिगारे दिसत आहेत. नदीसुधारच्या कामासाठी ठेकेदाराने नदीच्या किनारी मुरूम, माती, दगड टाकून रस्ते तयार केले आहेत. त्याचा फायदा काही वाळूतस्कर  घेत आहेत. याच रस्त्यावरून वाळूचे ढिगारे रात्रीच्या अंधारात ट्रक, हायवा, ट्रॅक्टर भरून इतर ठिकाणी नेले जात आहेत. नदीतून वाळूउपसा किंवा वाहतूक करण्यासाठी कोणताही परवानगी महसूल विभागाकडून दिलेली नाही. असे असतानाही हा प्रकार शहरात सुरू असल्याचे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

महसूल विभागातील अधिकाऱ्यांच्या संगनमताने वाळूउपसा?

मुळा नदीसुधार प्रकल्प कामाचा फायदा घेवून रात्री नदीपात्रातून अवैध वाळूउपसा सुरुआहे. नदीसुधार प्रकल्पाच्या कामामुळे वाहने घेऊन जाणे सहज शक्य झाले आहे.  पिंपळे निलख भागातील नदी पात्रात ठिकठिकाणी वाळूचे ढिगारे दिसत आहेत. कोणत्याही परवानगीविना अशाप्रकारे बेकायदा वाळूउपसा सुरु आहे. विशेष म्हणजे, जेसीबी लावून वाळू उपसा सुरु आहे. याबाबत तहसिलदार कार्यालयाकडे तोंडी तक्रार करुनही संबंधित वाळू उपसा करणाऱ्यांवर अद्याप कारवाई करण्यात आलेली नाही. त्यांची वाहने जप्त करुन त्यांच्या गुन्हे दाखल केलेले नाहीत. त्यामुळे महसूल विभागातील अधिकाऱ्यांच्या संगनमताने तर वाळूउपसा होत नाही ना, अशी शंका आम्हाला येऊ लागली आहे, असा पिंपळे निलख येथील सामाजिक कार्यकर्ते रविराज काळे यांनी ‘सीविक मिरर’ला सांगितले.  

अप्पर तहसिदारांच्या दुर्लक्षामुळे शासनाच्या महसूलावर पाणी

मुळा नदीतून रात्रीतून लाखो ब्रास वाळूची चोरी आणि त्याची अवैध वाहतूक सुरु असताना  पिंपरी-चिंचवड अप्पर तहसिदारांकडे काही सामाजिक कार्यकर्त्यांनी तक्रार करुनही कोणतीही दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे नदीपात्रातून गौण खनिजाचे बेकायदेशीर उत्खनन करुन शासनाच्या महसूलावर पाणी फेरले जात आहे.  

दरम्यान, मुळा नदी पात्रातून चोरी होणा-या वाळूची सुमारे पाच हजार रुपये ब्रास या दराने विक्री केली जात आहे. स्थानिक आणि परिसरातील बांधकाम व्यावसायिकांना ही वाळू बांधकामासाठी पुरविली जात आहे. अवैध वाळूउपसा करुन नदीपात्राला धोका निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

मुळा नदीपात्रातून वाळूचोरी होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार संबंधित स्थानिक महसूल विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सूचना देऊन अवैध वाळूउपसा करणाऱ्यांवर कडक कारवाई करा, अशा सूचना दिल्या आहेत.    -जयराज देशमुख, अप्पर तहसिलदार, पिंपरी-चिंचवड 

Share this story

Latest