निगडीतील ज्ञान प्रबोधिनी शाळेभोवतीच्या रस्त्यांची पुनर्रचना; महापालिकेचा प्रायोगिक प्रकल्प

पिंपरी-चिंचवड महापालिकेचा शिक्षण विभाग विद्यार्थी सुरक्षेसाठी विविध उपक्रम राबवत आहे. विद्यार्थ्यांना उत्तम पायाभूत सुविधा मिळाव्यात आणि शाळेचा परिसर सुरक्षित राहावा, यासाठी पालिकेचा 'ग्लोबल डिझायनिंग सिटीज इनिशिएटिव्ह' यांच्यासोबत संयुक्त उपक्रम सुरू आहे. विद्यार्थ्यांची सुरक्षितता केंद्रस्थानी ठेवून या प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यात येत आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Wed, 22 Jan 2025
  • 06:37 am
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

निगडीतील ज्ञान प्रबोधिनी शाळेभोवतीच्या रस्त्यांची पुनर्रचना

शालेय विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित रस्ते

पिंपरी-चिंचवड महापालिकेचा शिक्षण विभाग विद्यार्थी सुरक्षेसाठी विविध उपक्रम राबवत आहे. विद्यार्थ्यांना उत्तम पायाभूत सुविधा मिळाव्यात आणि शाळेचा परिसर सुरक्षित राहावा, यासाठी पालिकेचा 'ग्लोबल डिझायनिंग सिटीज इनिशिएटिव्ह' यांच्यासोबत संयुक्त उपक्रम सुरू आहे. विद्यार्थ्यांची सुरक्षितता केंद्रस्थानी ठेवून या प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यात येत आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेने निगडी परिसरातील ज्ञान प्रबोधिनी नवनगर विद्यालय या शाळेच्या परिसरातील सार्वजनिक रस्त्यांची पुनर्रचना करण्यासाठी सात दिवसांचा प्रायोगिक प्रकल्प सुरू केला आहे. २० जानेवारी २०२५ पासून या प्रकल्पाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. विद्यार्थ्यांना शाळेत ये-जा करण्यासाठी सुरक्षित मार्ग उपलब्ध करून देणे,  हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे. 'ब्लूमबर्ग फिलान्थ्रॉपीज इनिशिएटिव्ह फॉर ग्लोबल रोड सेफ्टी आणि ग्लोबल डिझायनिंग सिटीज इनिशिएटिव्ह' यांच्या सहकार्याने महापालिका रस्त्यांच्या रचनेत सुधारणा करत आहे. शाळेमध्ये पायी तसेच सायकलने येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा प्रकल्प अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. या अंतर्गत शाळा परिसरातील वाहतुकीची गती नियंत्रित करून अपघात कमी होण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. प्रकल्पांतर्गत करण्यात येणाऱ्या प्रस्तावित सुधारणांमध्ये पादचाऱ्यांना सुरक्षित रस्ता ओलांडणे शक्य व्हावे, वाहन वेगमर्यादा,  विस्तारित फूटपाथ आणि सायकल मार्ग यांचा समावेश आहे.

या प्रकल्पाचा सात दिवसांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर पिंपरी-चिंचवड महापालिका आणि ग्लोबल डिझायनिंग सिटीज इनिशिएटिव्ह या पुनर्रचनेचा प्रभाव समजून घेण्यासाठी मूल्यमापन करतील. यामध्ये रस्त्यांच्या स्थितीची माहिती संकलित केली जाईल. त्यानुसार सुधारणा आणि वाहनांच्या वेगाबाबत अंदाज लावणे शक्य होईल. यावेळी ज्ञान प्रबोधिनी शाळेजवळ सकाळी सात वाजता वाहतूक शाखेचे एएसआय सुरेंद्र आढाव, हवालदार एस. डी. गायकवाड आणि वाॅर्डन विकास चव्हाण यांनी पालकांना नवीन नियमाची माहिती देत विद्यार्थी सुरक्षेसाठी विविध उपक्रम राबवत असल्याचे सांगितले.

शाळेभोवतीचा परिसर होणार अधिक सुरक्षित

ज्ञान प्रबोधिनी विद्यालयाच्या दोन हजार विद्यार्थ्यांसाठी महापालिकेने परिसरातील रस्त्यांची सुरक्षितता सुनिश्चित करण्याचा उपक्रम सुरू केला आहे. यामध्ये ३० टक्के विद्यार्थी पायी किंवा सायकलने शाळेत येत असल्याने, त्यांच्या सुरक्षेसाठी विशेष उपाय केले जात आहेत. पाच हजार चौ. मी. क्षेत्र पादचाऱ्यांसाठी सुरक्षित व वाहनमुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच वाहतुकीचा वेग २० किमी/प्रतितास नियंत्रित करण्यात येणार आहे. महापालिकेच्या या प्रयत्नामुळे शाळांभोवतीचा परिसर अधिक सुरक्षित होईल आणि हा प्रकल्प शहरातील इतर शाळांसाठी प्रेरणादायी ठरेल.

विद्यार्थ्यांचा अभिप्राय

शाळेच्या आजूबाजूच्या सार्वजनिक रस्त्यांची पुनर्रचना करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिका आणि ग्लोबल डिझायनिंग सिटीज इनिशिएटिव्ह यांनी विद्यार्थी, परिसरातील नागरिक, शिक्षक यांच्याशी संवाद साधत त्यांना शाळेत ये-जा करताना येणाऱ्या अडचणी, रस्त्याबाबत त्यांच्या अपेक्षा समजून घेतल्या. यामध्ये रस्ता ओलांडताना येणाऱ्या अडचणी, पार्किंग, अतिक्रमणे,  पायाभूत सुविधा आणि शाळेच्या परिसरातील वाहतूक अंमलबजावणी अशा विविध मुद्यांवर संवाद साधण्यात आला. त्यामुळे विद्यार्थ्यांना वाहतुकीशी संबंधित अनेक समस्यांचा सामना करावा लागत असल्याचे लक्षात आले.  परिसरातील नागरिक, विद्यार्थी, शिक्षक यांचा अभिप्राय लक्षात घेऊन सदर प्रकल्प प्रायोगिक तत्त्वावर राबवण्यात आला.

Share this story

Latest