संग्रहित छायाचित्र
पवना नदीवर मामुर्डी ते सांगवडे दरम्यान एक साकव पूल बांधण्यात आला आहे. हा साकव पूल ३० वर्षे जुना असून, तो कधीही कोसळण्याच्या स्थितीत आहे. या साकव पुलावरून चारचाकी वाहने नेण्यास बंदी आहे, तरीही जिल्हा प्रशासनाचे आदेश न जुमानता या वरून वाहनाची ये-जा सुरूच असते. यामुळे रविवारी (दि. १५) झालेल्या कुंडमळा घटनेच्या पुनरावृत्तीची भीती व्यक्त करण्यात येत आहे. पवना नदी दुथडी भरून वाहत असल्यामुळे येथे अधिक मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे.
सांगवडेतून मामुर्डीमार्गे पिंपरी-चिंचवड शहराकडे येण्यासाठी नागरिक या साकव पुलाचा वापर करतात. सांगवडे ते मामुर्डीदरम्यान पवना नदीवर साकव बांधण्यात आलेला आहे. हा साकव खूपच जुना आणि जीर्ण झालेला आहे. यावरून वाहने अथवा नागरिक ये-जा करताना पुलावरील फळ्या खाली वाकतात. लोखंडी कड्या अनेक ठिकाणी तुटलेल्या आहेत. एकंदरितच या साकव पुलाकडे जिल्हा प्रशासनाने लक्ष दिलेले नाही.
हा पूल धोकादायक स्थितीत असतानादेखील साकव पुलावरून येणारी आणि जाणारी वर्दळ मोठी आहे. सांगवडे, मामुर्डी, दारूंब्रे या गावांतील नागरिक सदर साकव पुलावरून ये-जा करतात. जीर्णावस्थेतील पुलामुळे त्यांचा जीव धोक्यात आला आहे. कुंडमळा येथील दुर्घटनेत चौघांना प्राण गमवावे लागले. यामुळे परिसरातील धास्तावलेले नागरिके ‘‘मामुर्डी-सांगवडे येथील नवीन पुलाचे काम कधी सुरू होणार,’’ असा सवाल विचारत आहेत.
सोमवारपासून (दि. १६) शाळा सुरू झाल्या आहेत. शालेय विद्यार्थी, कामगारांना हा पूल सोयीस्कर असल्याने यावरून त्यांचा वावर मोठा आहे. ३० वर्षांपूर्वी येथून होडीने ये-जा केली जात होती. त्यानंतर साकव पूल झाला. आता तोही मोडकळीस आल्याने येथे पूल बांधण्यात येणार होता. मात्र, १०-१५ वर्षांपेक्षा अधिक काळ गेला, तरीही नवीन पूल झालेला नाही.
मावळातील मुसळधार पावसामुळे पवना नदी दुथडी वाहत आहे. सांगवडे ते मामुर्डी असलेला हा साकव कधीही कोसळण्याच्या स्थितीत आहे. त्यामुळे या पुलावरून चार चाकी वाहनांनी प्रवास करण्यास प्रशासनाने मनाई केली आहे. मात्र हा आदेश न जुमानता त्यावरून चार चाकी वाहने दामटली जातात. पवना नदीवरील साकव पूल अरुंद असून तो जीर्ण झाला असल्यामुळे अपघाताची भीती व्यक्त केली जात आहे.
पूल ३० वर्षे जुना
पवना नदीवरील जुन्या पुलास समांतर नवीन पूल उभारण्याची मागणी पवन मावळातील सांगवडे, दारुंब्रे, साळुंब्रे, कासारसाई, पुसाणे, पाचाणे, चांदखेड, कुसगाव, उर्से, परंदवडी दहा गावांनी केलेली आहे. माजी महसूल राज्यमंत्री मदन बाफना यांनी १९९३ मध्ये आमदार निधीतून हा पूल बांधला होता. नंतरच्या काळात दिगंबर भेगडे यांनी येथे मोठा पूल व्हावा, यासाठी खूप प्रयत्न केले. त्यानंतर बाळा भेगडे यांनीही यासाठी पाठपुरावा केला. वर्तमान आमदार सुनील शेळके हेसुद्धा नवीन समांतर पूल होण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगवडे गावचे सरपंच रोहन जगताप यांनी ‘सीविक मिरर’ला सांगितले.
नोकरदार वर्ग, व्यावसायिक, व्यापारीवर्ग, शाळकरी मुले आणि शेतकरी या पुलावरून पवन मावळात जाण्यासाठी, तसेच कासारसाई येथे संत तुकाराम साखर कारखाना येथे जाण्यासाठी शहरातील नागरिक जवळचा मार्ग म्हणून या पुलाचा वापर करतात. पूल अरुंद असल्याने येथून एका वेळी एकच वाहन जाते. पूल जीर्ण झाला असल्यामुळे कोणत्याही वेळी येथे अपघात होऊन जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
चारचाकी वाहनचालकांचा जीव धोक्यात घालून प्रवास
सांगवडेसह परिसरातील गावांची वाहतूक या अरुंद पुलावरून होत असते. सिमेंट रस्ता अरुंद आणि नदीवरील पूलही अरुंद असल्याने येथे बरेचदा वाहतूक कोंडी होते. सिमेंटचा रस्ता शेतजमिनीपासून ७ ते ८ फूट उंच असल्याने काही वाहने घसरण्याचे प्रकार घडले आहेत. सांगवडे- मामुर्डी रस्त्यावरील पूल हा फक्त पादचारी बाणि दुचाकी वाहनांसाठी आहे. मात्र, त्यावरून चारचाकी वाहनेही दामटली जातात.
धोक्याकडे दुर्लक्ष करून प्रवास सुरूच
‘‘पवना नदीवरील सांगवडे-मामुर्डीपर्यंतच्या जुन्या लोखंडी पुलावरून चारचाकी वाहन नेऊ नये ते धोक्याचे आहे, हुकूमावरून,’’ असा फलक कार्यकारी अभियंता, बांधकाम (उत्तर) जिल्हा परिषद, पुणे यांनी लावलेला असतानाही त्याकडे डोळेझाक करून चारचाकी वाहने सर्रासपणे नेली जात आहेत. त्यामुळे येथे दुर्घटना घडण्याचा धोका वाढला आहे.
कुंडमळा पूल कोसळला, प्रशासन जागे होणार का?
महाडमधील सावित्री नदीवरील पूल कोसळल्याच्या दुर्घटनेनंतर, राज्यभरातील जुन्या पुलांचा प्रश्न ऐरणीवर आला होता. तसेच, आता कुंडमळा येथील इंद्रायणी नदीवरील साकव पूल रविवारी कोसळून चार जणांचा मृत्यू झाला. ४३ जणांना वाचवण्यात आले. त्यातील ६ ते ८ जणांची प्रकृती गंभीर आहे. झोपलेले प्रशासन जागे होऊन अशा धोकादायक पुलांबद्दल तातडीने काही उपाययोजना करणार का, असा प्रश्न जागरूक नागरिक विचारत आहेत.
नवीन पुलासाठी ३६ कोटी मंजूर
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने मामुर्डी-सांगवडे असा पवना नदीपात्रावर पूल बांधण्यात येणार आहे. त्यासाठी ३६ कोटी ६६ लाख १० हजार रुपये खर्चास आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी मंजूर केले आहेत.
महापालिकेच्या स्थापत्य ब मुख्यालयाच्या वतीने पुलाच्या कामासाठी ३७ कोटी २५ लाख ९१ हजार ३६६ रुपये खर्चाची निविदा ४ सप्टेंबर २०२४ ला प्रसिद्ध केली होती. त्यासाठी चार ठेकेदारांच्या निविदा प्राप्त झाल्या. त्यापैकी ए. आर. कन्स्ट्रक्शन व टी अॅण्ड टी इन्फ्रा लिमिटेडची निविदा पात्र ठरली. त्यातील ३६ कोटी ६६ लाख १० हजार रुपये खर्चाची कमी दराची ए. आर. कन्स्ट्रक्शनची निविदा स्वीकृत करण्यात आली आहे. कामाची मुदत १२ महिने आहे. मामुर्डी-सांगवडे पूल बांधण्याची अनेक वर्षांची मागणी आहे. या पुलामुळे मामुर्डी व सांगवडे, तसेच, हिंजवडीकडे ये-जा करणे सुलभ होणार आहे. नव्या पुलामुळे येथून सर्व प्रकाराच्या वाहनांना ये-जा करता येणार आहे.
पवना नदीवरील मामुर्डी-सांगवडे पूल कमकुवत झाला आहे. सुरक्षेच्या दृष्टीने चारचाकी वाहने या पुलावरून नेण्यास बंदी आहे. हा पूल चारचाकी वाहने नेण्याचे दृष्टीने धोकादायक आहे. परंतु, सांगवडे ग्रामस्थ, शेतकरी, नागरिकांना इच्छीतस्थळी पोहोचण्यासाठी काही किलोमीटर अंतरावरील जांबे आणि सोमाटणेमार्गे वळसा घालून जावे लागते. त्यामुळे नाईलाजास्तव सांगवडे पुलाचा वापर करावा लागतो.
- रोहन सुनील जगताप, सरपंच, सांगवडे