संग्रहित छायाचित्र
माहिती व तंत्रज्ञाननगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिंजवडीतील टप्पा (फेज) दोनमध्ये पोलीस मदत केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. माहिती व तंत्रज्ञाननगरीत काम करणाऱ्या तरुणींच्या सुरक्षिततेसाठी; तसेच रहिवासी आणि व्यावसायिकांच्या वर्दळीमुळे नागरिकांच्या मदतीसाठी हे केंद्र सुरू करण्यात आले आहे.
पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या हस्ते या केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड, सहायक पोलीस आयुक्त सुनील कुराडे यावेळी उपस्थित होते. हिंजवडी टप्पा दोनपासून हिंजवडी पोलीस ठाणे आणि चौकीचे अंतर जास्त आहे. या भागात कंपन्यांची संख्या अधिक आहे. यामध्ये महिला अभियंता कार्यरत आहेत. या परिसरात गृहनिर्माण सोसायट्या, व्यावसायिक इमारतीसुद्धा असल्यामुळे वर्दळ आहे. येथील महिलांसाठी तसेच इतर नागरिकांना पोलीस मदतीची आवश्यकता भासत असल्याने पोलीस मदत केंद्र सुरू करण्यात आले आहे. माहिती व तंत्रज्ञाननगरीत काम करणाऱ्या तरुण, तरुणींंसाठी पोलीस मदत केंद्र उपयुक्त ठरणार आहे. या मदत केंद्रात २४ तास पोलीस तैनात असणार आहेत.