संग्रहित छायाचित्र
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या आषाढीवारी पालखी सोहळ्याच्या अनुषंगाने विविध सोयी-सुविधा महापालिकेकडून पुरवल्या जातात. यावेळी संस्थानच्या विश्वस्तांनी महापालिकेकडे विविध मागण्या केल्या आहेत. यामध्ये पालखी मार्गावरील अतिक्रमण तातडीने हटवा. पालखी मार्गावर देशी वृक्षांची लागवड करा, लटकलेल्या वीजेच्या तारा काढून टाकाव्यात. सार्वजनिक शौचालयाची संख्या वाढवा, मोकाट जनावरे, कुत्र्यांचा बंदोबस्त करा, यासह विविध मागण्या महापालिका प्रशासनाकडे करण्यात आल्या.
महापालिकेत संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या आषाढीवारी पालखी सोहळ्याच्या अनुषंगाने बैठक घेण्यात आली. महापालिकेच्या वतीने वारकऱ्यांसाठी पुरवण्यात येणाऱ्या विविध सेवा-सुविधा, इतर नियोजनाचा आयुक्त शेखर सिंह यांनी आढावा घेतला. याप्रसंगी दोन्ही संस्थानचे विश्वस्त उपस्थितीत होते. पिंपरी-चिंचवड शहरात आषाढीवारी पालखी सोहळ्याचे आगमन होत असते. या पालख्यांचे स्वागत करण्यात येते. पालखी सोहळ्यात महापालिकेकडून विविध सोयी सुविधा दिल्या जातात. वारकऱ्यांना देण्यात येणाऱ्या सुविधांमध्ये कोणतीही कमतरता राहणार नाही, असे आयुक्त शेखर सिंह यांनी सांगितले. पालखी सोहळ्याचे सूक्ष्म नियोजन करुन पालखी मुक्काम व मार्गावर देण्यात येणाऱ्या सुविधांसाठी आराखडा तयार करावा, अशा सूचनाही दिल्या.
या बैठकीस अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, सह-आयुक्त चंद्रकांत इंदलकर, शहर अभियंता मकरंद निकम, पोलीस उपायुक्त संदिप डोईफोडे, देहू संस्थानचे विश्वस्त पुरुषोत्तम मोरे आदी जण उपस्थित होते. यावेळी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज व जगदगुरू संत तुकाराम महाराज संस्थान कमिटीच्या वतीने विश्वस्तांनी विविध सूचना केल्या. त्यामध्ये पालखी मार्गावरील रस्त्यातील अतिक्रमण दूर करावीत, पालखी मार्गावर देशी वृक्षांची लागवड करावी, पालखी मार्गामधील लटकलेल्या वीजेच्या तारा हटविण्यात याव्यात, सार्वजनिक शौचालयांची संख्या वाढवावी, मोकाट जनावरे तसेच कुत्र्यांचा बंदोबस्त करावा,
स्वागत कमानीवरील रंगरंगोटी व दिव्यांची दुरूस्ती करावी, स्नान पाण्याचे नियोजन करावे, विसाव्यासाठी खासगी शाळा आणि मंगल कार्यालये खुली करावीत, वारकऱ्यांच्या अभंगांमध्ये व्यत्यय येऊ नये म्हणून इतर स्पीकर आवाज कमी ठेवा किंवा बंद ठेवावा, हरित वारीसारखे आणखी उपक्रम राबवावेत, जास्तीत जास्त देशी झाडांच्या बियांचे आणि रोपांचे वाटप करावे, या कार्यामध्ये सामाजिक संस्थांचा सहभाग वाढवावा अशी सुचनांचा समावेश होता. आषाढीवारी पालखी सोहळ्याच्या अनुषंगाने महापालिकेच्या वतीने विसाव्याच्या ठिकाणी तसेच पालखी मार्गावर वारकऱ्यांना विविध सोयी सुविधा पुरविण्यात येणार आहेत. स्थापत्य, आरोग्य, वैद्यकीय, स्वच्छता, पाणीपुरवठा, सुरक्षा व्यवस्थेबरोबरच ही वारी पर्यावरण पूरक, प्लास्टिक मुक्त, हरितवारी करण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये सैन्य दलासोबत मिळून मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करण्यात येणार आहे. २ लाखांपेक्षा जास्त देशी रोपांचे तसेच बाबूंच्या रोपांचे वाटप करण्याचे उद्दिष्ट महापालिकेने ठेवले आहे, अशी माहिती आयुक्त शेखर सिंह यांनी दिली. स्पीकरच्या आवाजावर नियंत्रण ठेवण्यात येईल आणि सुरक्षेच्या बाबतीत वारकऱ्यांना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही याची दक्षता घेण्यात येणार असल्याचे सांगितले. दोन्ही पालखीच्या प्रस्थानांच्या अनुषंगाने वाहतूकीत बदल करण्याबाबत सूचना देण्यात येतील जेणेकरून नागरिकांची गैरसोय होणार नाही असे वाहतूक पोलीस विभागाच्या प्रतिनिधींनी सांगितले. तर महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी तसेच अन्न व औषध प्रशासन प्रतिनिधींनी पालखी दरम्यान योग्य ती दक्षता व व्यवस्था करण्यात येईल, असे सांगितले.