Pimpri-Chinchwad: शहरात तीन उड्डाणपूल धोकादायक

महापालिकेचा पिंपरीतील इंदिरा गांधी उड्डाणपूल आणि चिंचवड स्टेशनचा रेल्वे उड्डाणपूल धोकादायक स्थितीत असून महापालिकेकडून त्या पुलाची डागडूजी सुरू करण्यात आली आहे. तर ब्रिटिशकालीन दापोडीतील हॅरिस ब्रिजदेखील बंद करण्याच्या अवस्थेला आला होता, त्याचीही देखभाल-दुरुस्ती सुरू आहे.

Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune Newsz

संग्रहित छायाचित्र

दापोडीचा हॅरिस ब्रिज, पिंपरीचा इंदिरा गांधी पूल आणि चिंचवड स्टेशन येथे दुरुस्ती सुरू; चिंचवड पुलावरून अवजड वाहतुकीला बंदी

महापालिकेचा पिंपरीतील इंदिरा गांधी उड्डाणपूल आणि चिंचवड स्टेशनचा रेल्वे उड्डाणपूल धोकादायक स्थितीत असून महापालिकेकडून त्या पुलाची डागडूजी सुरू करण्यात आली आहे. तर ब्रिटिशकालीन दापोडीतील हॅरिस ब्रिजदेखील बंद करण्याच्या अवस्थेला आला होता, त्याचीही देखभाल-दुरुस्ती सुरू आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील तीन पुलांची स्थिती धोकादायक होती. परंतु, त्यावर महापालिकेने कोट्यवधींचा खर्च करत आहे, त्याच पुलांच्या देखभाल- दुरुस्तीस प्राधान्य दिले आहे. तर चिंचवड स्टेशनचा उड्डाणपूल हा अवजड वाहतुकीस बंद करण्यात आलेला आहे.  

पिंपरी गावाला जोडणाऱ्या इंदिरा गांधी उड्डाणपूल आणि चिंचवड स्टेशन हे दोन्ही रेल्वे मार्गावरील उड्डाणपूल हे कालबाह्य झाले आहेत. महापालिकेने या दोन्ही उड्डाणपुलांची तात्पुरती दुरुस्तीदेखील केली होती. तरीही हे दोन्ही उड्डाणपूल धोकादायक बनले असून, त्यांचे आयुष्य संपले आहे. त्यामुळे हे दोन्ही उड्डाणपूल तत्काळ पाडण्यात यावे, जेणे करून भविष्यातील अपघात टाळण्यात येतील, असे पत्र रेल्वे विभागाकडून पिंपरी-चिंचवड महापालिकेला देण्यात आले आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातील पिंपरीगाव, मार्केट येथील इंदिरा गांधी उड्डाणपूल खूप जीर्ण झाला आहे. तसेच, चिंचवड स्टेशन येथील पुणे-मुंबई जुन्या महामार्ग व चिंचवड गावाला जोडणारा उड्डाणपूलदेखील कालबाह्य झाला आहे. रेल्वे मार्गावरील दोन्ही उड्डाणपूल तत्काळ पाडण्यात यावेत, याकरिता रेल्वे विभागाकडून पिंपरी-चिंचवड महापालिकेला पत्र देऊन पाठपुरावा सुरू आहे. परंतु, हे उड्डाणपूल पाडल्यास पिंपरी आणि चिंचवड गावाकडे जाणारी वाहतूक कोणत्या मार्गाने सोडायची, असा प्रश्न महापालिकेच्या अधिकाऱ्यांना पडला आहे.

पाडण्याची सूचना करूनही त्याकडे दुर्लक्ष

पुणे-मुंबई जुन्या महामार्ग आणि पिंपरी गावास जोडणारा पुणे-लोणावळा लोहमार्गावरील पिंपरी येथील इंदिरा गांधी उड्डाणपूल हा शहरातील सर्वांत पहिला पूल आहे. या उड्डाणपुलाचे आयुष्य संपले आहे. सगळे बांधकाम धोकादायक झाले आहे. तो पूल वाहतुकीस बंद करा. पूल पाडून टाका, असे पत्र रेल्वे विभागाने महापालिकेस तत्कालीन आयुक्त श्रावण हर्डिकर यांच्या कार्यकाळात पाठवले होते. शहरातील दोन भागांना जोडणारा हा महत्त्वाचा पूल असल्याने महापालिकेने पुलाचे स्ट्रॅक्टरल ऑडिट केले. त्यानंतर त्यांचे मजबुतीकरण करण्यात आले. हे काम सुमारे २ ते ३ वर्षे सुरू होते. त्यावर उड्डाणपुल दुरुस्तीसाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आला. त्यानंतर पिंपरीच्या उड्डाणपुलाचे मजबुतीकरण करण्यात आले आहे. तसेच, शहरातील चिंचवड स्टेशन येथील लोहमार्गावरील उड्डाणपुलाच्या बांधकामास ४७ वर्षे झाली आहेत. ते बांधकाम धोकादायक झाले असून, तो पूल पाडा, असे पत्र रेल्वेने महापालिकेस नुकतेच पाठवले आहे. या पुलाशेजारी महापालिकेने सुमारे १५ वर्षांपूर्वी समांतर पूल बांधला आहे. जुना पूल तोडावा लागणार असल्याने येथील वाहतूक समस्या अधिक गंभीर होणार आहे. हे दोन्ही पूल महापालिका पाडणार की, नव्याने पुन्हा तयार करणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

सर्वच पुलांचे होणार स्ट्रक्चरल ऑडिट

शहरातील नदीवरील पुलांप्रमाणेच आता नाले, ओढे, तसेच कालव्यांवर बांधण्यात आलेल्या पुलांचेही स्थापत्य लेखापरीक्षण (स्ट्रक्चरल ऑडिट) करण्यात येणार आहे. शहरातून वाहणाऱ्या नदीवर जागोजागी पूल बांधण्यात आलेले आहेत. या पुलांवरून वाहतूक होत असल्याने ते वापरण्यास योग्य आहेत की नाही, याची तपासणी करण्यासाठी महापालिकेने या पुलांचे स्थापत्य लेखापरीक्षण करण्याचा निर्णय यापूर्वीच घेतला आहे. त्यानुसार कामही सुरू करण्यात आले आहे. याच धर्तीवर आता शहरातील ओढे-नाले, तसेच कालव्यांवरील पुलांचेही स्थापत्य लेखापरीक्षण करण्याचे महापालिकेने ठरवले आहे.

हॅरिस ब्रिज ब्रिटिशकालीन

पुणे आणि पिंपरी-चिंचवड जोडणारा हॅरिस ब्रीज हा ब्रिटिशकालीन आहे. पुलाबाबत दक्षता घेण्यात आलेली आहे. या पुलास समांतर पूल उभारण्यात आलेला असून, ही दोन्ही कामे महापालिकेने केली आहेत. या पुलाचे पुणे महापालिकेने २०१३ मध्ये स्ट्रक्चरल ऑडिट केले होते. कुंडमळा पुलाच्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर शहरातील जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात येणार आहे. हॅरिस ब्रीजचे स्ट्रक्चरल ऑडिट होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

नागरिकांच्या सोयीसाठी नवीन पूल उभारणार

जुन्या पुलावरून बस वाहतूक बंद असल्यामुळे चिंचवडकडे जाणाऱ्या बस आणि अवजड वाहने दळवीनगर मार्गे वळसा घेऊन जात आहेत. सदर पुलावरून जड वाहतूक सुरू करण्याच्या दृष्टीने रेल्वे विभागाशी सल्लामसलत करून नवीन रेल्वे उड्डाणपूल बांधण्यासाठी तत्त्वतः मान्यता देण्यात आली. रेल्वे विभागानेदेखील सदर पुलाबाबत महानगरपालिकेस अभिप्राय सादर केला होता. या अभिप्रायामध्ये रेल्वे विभागाने सदरचा पूल जीर्ण झाला असल्याने व सुरक्षिततेच्या दृष्टिने महापालिकेने नवीन पूल बांधवा, असे सुचित केले होते. अखेर समितीचा अहवाल, रेल्वे विभागाचा पूल नवीन बांधण्याचा अहवाल, लोकप्रतिनिधी यांची पुलावरील जड वाहतूक चालू करण्याची मागणी या सर्वबाबींचा विचार करता हा जुना पूल पाडून तेथे नवीन पूल बांधण्यात येणार आहे. आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी नवीन पूल बांधणे व पुलाचे कामासाठी सल्लागार नेमण्याचे कामास मंजुरी दिली आहे.

Share this story

Latest