संग्रहित छायाचित्र
सायनलेन्सरमधून मोठा आवाज काढून रॅश ड्रायव्हिंग करीत ट्रिपल सीट दुचाकी सुसाट चालवणारे शहरातील विविध मार्गांवर नजरेस पडतात. अशा बेशिस्त वाहनचालकांमुळे अपघाताच्या घटना घडतात.
अशा रॅश ड्रायव्हिंगमुळे स्वतःसह इतरांच्याही जिवाला धोका निर्माण होतो. अपघातात गंभीर जखमी होण्यासह मृत्यू झाल्याच्याही घटना घडतात. त्यामुळे अशा बेशिस्त दुचाकीचालकांना वठणीवर आणण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून कारवाई होत असते. मात्र, तरीही रॅश ड्रायव्हिंग सुरूच असल्याचे दिसून येत असून, अशांना आवर कधी बसणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
रस्तादुभाजक अथवा विजेच्या खांबाला धडक बसणे, दुचाकी नियंत्रणाबाहेर जाऊन घसरणे किंवा समोरच्या वाहनांना धडक देणे, असे अपघात रॅश ड्रायव्हिंगमुळे होतात. यामध्ये अनेकांना जीव गमवावा लागला आहे. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत जानेवारी ते एप्रिल महिन्यात ११९ प्राणांतिक अपघात झाले आहेत. यामध्ये बहुतांश अपघात रॅश ड्रायव्हिंगमुळे झाले आहेत. दरम्यान, अशा बेशिस्त वाहनचालकांवर पिंपरी-चिंचवड वाहतूक पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. रॅश ड्रायव्हिंगप्रकरणी यावर्षी जानेवारी ते एप्रिल या महिन्याच्या कालावधीत विविध वाहतूक विभागांतर्गत ८९५ जणांवर कारवाई केली आहे.
रस्त्याने आपण व्यवस्थित जात असलो, तरी समोरून रॅश ड्रायव्हिंग करीत आलेल्या वाहनचालकामुळे आपलाही गोंधळ उडतो. बेशिस्त वाहनचालकांमुळे अपघाताच्या घटना घडतात. नियमांचे उल्लंघन करून बेशिस्तरीत्या वाहन चालवणाऱ्यांवर आणखी कठोर कारवाई करणे गरजेचे आहे. - विकास पागिरे, नागरिक
रॅश ड्रायव्हिंगमुळे स्वतःसह इतरांच्याही जिवाला धोका निर्माण होतो. त्यामुळे रॅश ड्रायव्हिंग करणाऱ्यांवर पोलिसांची बारीक नजर आहे. मागील काही दिवसांत विविध वाहतूक विभागांतर्गत मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली आहे. वाहनचालकांनी नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. - बापू बांगर, पोलीस उपायुक्त, पिंपरी-चिंचवड
जानेवारी ते एप्रिलमधील कारवाई
वाहतूक विभाग --कारवाई
सांगवी -- २
हिंजवडी -- ९५
निगडी -- ११६
चिंचवड -- २१
पिंपरी -- ६८
भोसरी-- ९०
चाकण -- २५
दिघी-आळंदी -- ११८
देहूरोड -- ४
तळवडे -- १
बावधन -- ८०
महाळुंगे -- ०
तळेगाव -- १४२
वाकड -- १३३
एकूण -- ८९५