पिंपरी-चिंचवड :आरटीओ परिसरात वाढला जप्त वाहनांचा पसारा
पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन परिवहन कार्यालय अर्थात आरटीओचा परिसर सध्या भंगार वाहनांनी व्यापला आहे. एकीकडे विविध कारणांसाठी जप्त करून आणलेल्या वाहनांचा मोठा भंगार बाजार कार्यालयाच्या प्रांगणात भरला आहे. दुसरीकडे आरटीओमध्ये येणाऱ्या नागरिकांना आपली वाहने रस्त्यांवर लावावी लागतात. मध्यंतरी या ठिकाणची वाहनांचा लिलाव करून ती कमी करण्यात आली होती. मात्र, काही वाहने गेल्या अनेक वर्षांपासून अक्षरशः सडत असल्याचे चित्र आहे. कार्यालय परिसराची मोकळी जागा भंगार वाहनांनी व झाडाझुडपांनी व्यापली आहे.
परवाना नूतनीकरण, नोंदणी नूतनीकरण न केलेली, वेगवेगळ्या नियमांचे उल्लंघन केल्याने, तसेच विविध कारणांमुळे आरटीओच्या पथकांनी जप्त केलेली वाहने आरटीओ कार्यालयात आडकावून ठेवली जातात. या वाहनांवर खटला भरल्यानंतरही वाहने या कार्यालयाच्या परिसरात जमा करून ठेवली आहेत. यातील अनेक वाहने गेल्या अनेक वर्षांपासून तिथेच पडून आहेत. वाहनांच्या रकमेपेक्षा अधिकचा दंड किंवा वाहनांच्या दीड-दमडीच्या किमतीमुळे मालकांनी दंड न भरणे पसंत करून ही वाहने तशीच पडून राहणे पसंत केलेले आहे. अनेकदा किचकट प्रक्रिया आणि दंडाची मोठी रक्कम यामुळे पुन्हा ते वाहन घेण्यास येत नाहीत. परिणामी, कैक महिन्यांपासून वाहने या ठिकाणी पडून राहतात. त्या ठिकाणी वाहनांचे सुट्टे पार्ट चोरीला जाण्याचे प्रकार ही घडले आहेत. या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था नसल्याने चोरीचे प्रकार वाढत आहेत.
आरटीओच्या वतीने मध्यंतरीच्या काळात या ठिकाणी साफसफाई करण्यात आली होती. त्यावेळी अनेक वाहने लिलावात विकली. मात्र, आता पुन्हा या परिसरात मोठ्या प्रमाणात भंगार वाहनांची वाढ झाली आहे. आरटीओ शेजारी असलेल्या या मोकळ्या जागेत या वाहनांचे अक्षरशः भंगार होत आहे. जप्त केलेले वाहन संबंधित वाहन मालकाने ठराविक मुदतीत आवश्यक तो दंड भरून, प्रक्रिया पूर्ण करून सोडवून नेले नाही, तर ते वाहन तसेच त्याठिकाणी जप्त स्थितीत राहते. ठराविक कालावधीपर्यंत ते नेले नाही, तर त्याचा लिलाव करण्याची प्रक्रिया राबवावी लागते.