डॉ. पुरुषोत्तम महाराज राजीमवाले यांचे प्रतिपादन
अग्निहोत्र ही मूळ वैदिक उपासना आहे. आपला शिष्य सामर्थ्यवान बनला पाहिजे. यासाठी गुरू नेहमीच प्रयत्न करत असतात. शिष्याची समृद्धी, कल्याण, चेहऱ्यावरील हास्य, आनंद हीच गुरूला मिळालेली गुरुदक्षिणा असते. प्रत्येक शिष्य आनंदी राहावा हीच स्वामींची इच्छा असते. म्हणून स्वामी सांगतात की, जीवनात गर्व कधीही बाळगू नये. समर्पित भावनेने केलेली साधना तुम्हाला जीवनातील अत्युच्च आनंदाची प्राप्ती देते, असे मार्गदर्शन अक्कलकोट येथील गुरुमंदिर व विश्व फाउंडेशन शिवपुरीचे अध्यक्ष डॉ. पुरुषोत्तम महाराज राजीमवाले यांनी केले.
भारत केसरी पै. विजय हनुमंत गावडे सोशल फाउंडेशनच्या वतीने रविवारी (दि. १९) चिंचवड येथे प्रथमच श्री स्वामी समर्थांच्या पादुकांचा दर्शन सोहळा आयोजित करण्यात आला होता. या निमित्त श्री स्वामी समर्थ चिन्मय पादुका मठ, गुरुमंदिर (श्री बाळाप्पा महाराज मठ) यांच्या सहकार्याने श्रीमन महासाधू श्री मोरया गोसावी समाधी मंदिर शेजारी, देऊळ मळा येथे भव्य सामूहिक अग्निहोत्र करण्यात आले. अकराशे साधकांनी अग्निहोत्रमध्ये सहभाग घेतला. चिंचवड देवस्थान ट्रस्टचे मुख्य विश्वस्त मंदार महाराज देव यांनी उपस्थितांना शुभ आशीर्वाद दिले. डॉ. पुरुषोत्तम महाराज राजीमवाले म्हणाले की, जीवनात चिंतामुक्तीसाठी गुरूंचे सानिध्य व आशीर्वाद आवश्यक आहेत. जीवनाचे खरे रहस्य गुरू-शिष्य परंपरेत दडलेले आहे.
स्वामी समर्थांच्या या पादुका भारतातील अध्यात्माचे प्रतीक आहे. गुरुचरणी नतमस्तक होऊन केलेली साधना निर्भयतेने, आनंदाने जगण्यास प्रेरणा देते. आपल्या हृदयात आलेला प्रत्येक सद्गविचार आनंदाची अनुभूती देतो. देशाला गौरवशाली, वैभवशाली बनवण्यासाठीचा मार्ग गुरू-शिष्य परंपरेत आहे. आपल्या जीवनात क्लेश येऊ नये, आनंदी राहावे यासाठी अध्यात्म गरजेचे आहे. ‘भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे’ हे स्वामींचे वाक्य आपल्याला आशीर्वाद आणि आशावाद देतात. भिऊ नको म्हणजे निर्भय राहा, सक्षम व्हा, आनंदी राहा असा आशीर्वाद देऊन स्वामी तुमच्या पाठीशी नेहमी असतात. अहंकार सोडून सर्वांनी जीवनात येणारी विघ्न दूर करण्यासाठी गुरुचरणी लीन व्हायला हवे.
जीवनात समृद्धी मिळवण्यासाठी साधना, उपासना आवश्यक आहे, असेही डॉ. राजीमवाले यांनी सांगितले. यावेळी पद्मश्री डॉ. गिरीश प्रभुणे, जगद्गुरू कृपांकित भाषाप्रभू डॉ. चेतनानंद ऊर्फ पंकज महाराज गावडे, नाडीतज्ज्ञ डॉ. गणेश शिंदे, उद्योजक विजय जगताप, चिंचवड देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त जितेंद्र देव, विणेकरी हभप मधुकर मोरे महाराज, संस्कृती संवर्धन व विकास महासंघाचे कार्याध्यक्ष डॉ. अजित जगताप, ग्रामजोशी वेदमूर्ती शेखर रबडे, धनेश्वर मंदिराचे अध्यक्ष कैलास साठे, गजानन महाराज मंदिर अध्यक्ष विश्वनाथ धनवे, स्वामी समर्थ मठ अध्यक्ष दिनकर चिंचवडे, गजानन चिंचवडे, मोरया भक्त नारायण लांडगे, नवनाथ पीठचे ईश्वर खेनट, विठ्ठल महादेव मंदिरचे अध्यक्ष गणेश मिरजकर, काळ भैरवनाथ मंदिर उत्सव प्रमुख आवेश चिंचवडे, श्रीराम मंदिरचे अध्यक्ष श्रीकांत देव, केंद्राई गोशाळाचे गोरक्षक धनंजय गावडे, आयुर्वेदाचार्य गजानन खासनीस, ज्ञानेश्वरी सेवा समितीचे अध्यक्ष दत्ता चिंचवडे, गजानन विजय ग्रंथ मुखोदगत असलेली सुरभी ढगे, जीवन विद्या मिशनचे अध्यक्ष बाळासाहेब मरळ, आप्पासाहेब धर्माधिकारी सत्संग केंद्राचे मुकुंद गुरव, भारतमाता सत्संग मंडळ चिंचवड, स्वामी समर्थ मठ उद्योगनगरचे अध्यक्ष सत्यनारायण ओझा, स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरीचे सतीश मोटे यांचा फाउंडेशनच्या वतीने सत्कार करण्यात आला. हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. स्वागत भारत केसरी पै. विजय हनुमंत गावडे, सूत्रसंचालन नाना शिवले, तसेच संतोष निंबाळकर यांनी आभार मानले.