पिंपरी-चिंचवड :वाहतूक कोंडीत अडकलाय आयटियन्सचा श्वास
विकास शिंदे
वाकड येथील भूमकर चौक ते हिंजवडीतील शिवाजी चौक रस्त्यावर दररोज वाहतूक कोंडी होत आहे. दररोजच्या या वाहतूक कोंडीने आयटियन्सला प्रचंड त्रास होत आहे. मुळात कस्तुरी चौक ते शिवाजी चौक हा रस्ता अरुंद असून त्या रस्त्यांचे रुंदीकरण होणे आवश्यक आहे. मात्र, एमआयडीसी, हिंजवडी ग्रामपंचायत, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या टोलवा टोलवीने रस्ता नेमका कोणाच्या मालकीचा, त्यांचे काम कुणी करायचे, या वादात कित्येक वर्ष झाले रस्त्यांचे रुंदीकरण, सिमेंट काॅंक्रिट रस्त्याची कामे रखडली आहेत. या लालफितीच्या कारभारामुळे आयटियन्सचे प्रचंड हाल होऊ लागले आहेत.
पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील वाकड-भूमकर चौक ते हिंजवडी शिवाजी चौक रस्ता हा आयटी पार्कला जोडणारा मुख्य रस्ता आहे. या मुख्य रस्त्यावर वाहनांची दररोज प्रचंड गर्दी असते. आयटियन्सकडे मोठ्या प्रमाणात चारचाकी वाहने असल्याने या भागातील रस्त्यावर चारचाकी वाहनांची मोठी गर्दी होते. यामुळे भूमकर चौक ते शिवाजी चौक या रस्त्यावर वारंवार वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. आयटी पार्क परिसरातील शिवाजी चौक आणि भूमकर चौक परिसरात सकाळी आणि संध्याकाळी मोठी वाहतूक कोंडी होते. वाकड चौकातून शिवाजी चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर पावसाळ्यात अनेक ठिकाणी खड्डे पडलेले असतात. त्याच कस्तुरी चौक ते शिवाजी चौक रस्ता खूपच अरुंद आहे. ३० मीटर रस्ता अचानक ९ मीटरचा होत असल्याने वाहनचालकांना कसरत करावी लागते. अनेकदा वाहनांच्या रांगा लागत असल्यामुळे वाहतूक समस्या गंभीर झाली आहे.
पावसाळ्यात वाकड चौक ते शिवाजी चौकादरम्यान रस्त्यावर पावसाचे पाणी साचत असते. त्यामुळे रस्ता खराब होऊन मोठमोठे खड्डे तयार होतात. त्यात रस्ता कुणाच्या मालकीचा यावरून खलबते तयार होऊन एमआयडीसी, हिंजवडी ग्रामपंचायत आणि महापालिका हे एकमेकांवर टोलवा-टोलवी करत असतात. त्यामुळे संपूर्ण रस्त्याची वाट लागलेली असते. या त्रासातून आयटियन्स कधी सुटणार हे कळायला अद्याप मार्ग नाही. इन्फोसिस सर्कल ते माण दरम्यानचा नवीन रस्ता वाहतुकीसाठी खुला झाला आहे. परंतु आयटी कंपनीतील कर्मचारी शिवाजी चौकातून फेज तीनकडे जाणाऱ्या रस्त्याचा वापर मोठ्या प्रमाणात करतात. या रस्त्याचा वापर कमी प्रमाणात होत आहे. त्यामुळे एकाच रस्त्यावरील वाहतुकीचा ताण वाढला आहे. दरम्यान, हिंजवडी शिवाजी चौक ते कस्तुरी चौक हा रस्ता पिंपरी महापालिकेकडे हस्तांतरित करून घ्यावा, त्यांचे रुंदीकरण करून रस्त्यांचे काम करावे, अशी मागणी हिंजवडी ग्रामपंचायतीने केलेली आहे. पण, ही मागणी करून मागील तीन वर्षांपासून महापालिकेने रस्ता हस्तांतरित केलेला नाही. परंतु, मागील वर्षी रस्त्यावर प्रचंड खड्डे पडलेले होते. नागरिकांना खड्ड्याचा त्रास होऊ अपघात होऊ नये म्हणून खड्डे बुजवून डांबरीकरण करून दिले होते.
त्यामुळे रस्ता हस्तांरित करून रुंदीकरण कधी होणार, असा सवाल नागरिक करत आहेत. दरम्यान, महापालिका हद्द ही कस्तुरी चौकापुढे नैसर्गिक नाल्यापर्यंत आहे. तिथपर्यंत महापालिकेने ३० मीटर रुंदीकरण केलेले आहे. पुढे महापालिका हद्द नाही. त्यामुळे शिवाजी चौकापर्यंत एमआयडीसी, सार्वजनिक बांधकाम, किंवा ग्रामपंचायत या तिघांनी कोणाची हद्द असेल, त्यांची रस्त्यांचे रुंदीकरण करून काम करावे, त्यामुळे महापालिकेचा काहीच संबंध नाही, असे स्थापत्य अधिका-यांकडून सांगितले आहे.
जबाबदारी टाळण्याची स्पर्धा
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी), महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि ग्रामपंचायत यांच्यापैकी नेमकी त्या रस्त्यांची मालकी कोणाची आहे, प्रत्येकजण एकमेकांकडे बोट दाखवत असून रस्ता रुंदीकरण, त्यांचे डांबरीकरण करत नाहीत. छत्रपती शिवाजी चौकात गणेश मंदिर आहे. या ठिकाणी दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येतात. मारुंजी, दत्तवाडी, कासारसाई, चांदखेड आदी भागात जाणाऱ्या रिक्षा येथे अस्ताव्यस्त थांबतात, त्यामुळे वाहतूक कोंडी होत असल्याचे ग्रामस्थ बोलत आहेत. तसेच भूमकर चौक ते शिवाजी चौक या रस्त्यावर वाहतूक कोंडी नित्याची बाब आहे. त्यामुळे सर्वांची गैरसोय होते. अरुंद रस्ता असल्याने वाहतूक कोंडी होते, तसेच जवळच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात जाणाऱ्या लोकांना गर्दीतून मार्ग काढताना अडचणी येतात.
भूमकर चौक ते कस्तुरी चौक रस्त्यावरील नैसर्गिक नाल्यापर्यंत महापालिकेची हद्द आहे. महापालिकेच्या हद्दीपर्यंत ३० मीटर रुंदीकरण होऊन रस्ता व्यवस्थित केलेला आहे, पण कस्तुरी चौक ते शिवाजी चौक हा महापालिकेची हद्द नाही. तो रस्ता ग्रामपंचायत, सार्वजनिक बांधकाम किंवा एमआयडीच्या ताब्यात आहे. हे माहिती नाही. केवळ एकदा ग्रामपंचायतीने केलेल्या विनंतीवरून रस्त्यावरील खड्डे बुजवून देखभाल करून दिला होता. परंतु, त्या रस्त्याची हद्द ही महापालिकेची नाही. त्यामुळे रस्ता रुंदीकरण आणि त्याची दुरुस्ती ही ज्यांच्या मालकीचा आहे त्यांनी करावी, महापालिका हद्दीतील ३० मीटरप्रमाणे रस्त्याचे रुंदीकरणाचे काम पूर्ण झालेले आहे.
-प्रमोद ओंबासे, सह-शहर अभियंता, स्थापत्य प्रकल्प विभाग