तलाठी काही सापडेनात, हेलपाटे काही संपेनात!
विकास शिंदे :
देहूरोड येथील तलाठी कार्यालय सातत्याने बंद असल्याने उत्पन्नाचा, रहिवासी दाखल्यासह विविध कामे करण्यासाठी गेलेल्या नागरिकांना हेलपाटे मारावे लागत आहेत. तलाठी जागेवर सापडेनात म्हणून नागरिकांना नाहक मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे. याबाबत नागरिकांकडून विचारणा केली असता कार्यालयीन कामकाजानिमित्त बाहेर असल्याचे सांगितले जात आहे. तलाठी कार्यालयाच्या या गलथान कारभाराविरोधात नागरिक संताप व्यक्त करत आहेत.
किवळे आणि निगडी भागातील नागरिकांसाठी उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी देहूरोड येथील तलाठी कार्यालयात जावे लागते. मात्र या ठिकाणी बहुतांश वेळा तलाठीच उपलब्ध नसल्याची तक्रार नागरिक करत आहेत. अनेक वेळा रिकाम्या हाताने नागरिकांना परतावे लागत आहे. तलाठी कार्यालय लांब असल्याने सातत्याने ये-जा करणे अवघड असल्याचे नागरिक सांगत आहेत. दाखले न मिळाल्याने पुढची कामे रखडत आहेत. या बाबत तलाठ्यांकडे चौकशी केली असता ते कामानिमित्त बाहेर गेले असल्याचे सांगण्यात येते. तर तहसील कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी याबाबत अनभिज्ञ असल्याचे चित्र आहे. त्यामुळे नागरिकांच्या या तक्रारींची दखल कोण घेणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
उत्पन्नाचा दाखल काढण्यासाठी देहूरोड येथील तलाठी कार्यालयात गेलो होतो. निगडीवरून या ठिकाणी आलेलो आहे. मात्र कार्यालयच बंद असल्याने पुन्हा घरी यावे लागले. या बाबत विचारणा केली तेव्हा कामानिमित्त बाहेर असल्याचे सांगण्यात आले. दाखला न मिळाल्याने पुढील अडचणी निर्माण होत आहेत.
- सतीश कदम, नागरिक.
सध्या तरी कोणता शासकीय कार्यक्रम नाही. संबंधित तलाठी कार्यालयात का नसतात, या बाबत चौकशी करतो. नेमकी अडचण काय आहे हे पाहिले जाईल. त्यानंतर संबंधितांवर कारवाई करण्यात येईल.
- प्रशांत ढमाले, नायब तहसीलदार, अप्पर तहसिल कार्यालय