पिंपरी-चिंचवड: प्रवासी वाहनांवर आरटीओचा अंकुश; दोन महिन्यांत ३०० वाहनांची तपासणी, १०५ वाहनांवर कारवाई

पुणे, पिंपरी-चिंचवड परिसरात धावणाऱ्या प्रवासी वाहनांची विशेष तपासणी सुरू करण्यात आली आहे. क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी, कागदपत्रांची पूर्तता न करणे, नियमांचे उल्लंघन करणे यावर कारवाई करण्यात येणार आहे.

संग्रहित छायाचित्र

पंकज खोले

पुणे, पिंपरी-चिंचवड परिसरात धावणाऱ्या प्रवासी वाहनांची विशेष तपासणी सुरू करण्यात आली आहे. क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी, कागदपत्रांची पूर्तता न करणे, नियमांचे उल्लंघन करणे यावर कारवाई करण्यात येणार आहे. पुण्यातील वाढते अपघात आणि प्रवासी वाहनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी ही मोहीम राबवली असल्याचे आरटीओ अधिकाऱ्याने सांगितले.

या पार्श्वभूमीवर गेल्या दोन महिन्‍यात आरटीओच्‍या कर्मचाऱ्यांनी ३०० वाहनांची तपासणी केली आहे. नियमांचे उल्‍लंघन करणाऱ्या १०५ वाहनांवर दंडात्‍मक कारवाई केली आहे. आरटीओच्‍या वायुवेग पथकाकडून महामार्गासह शहरात सातत्‍याने या कारवाईवर भर दिला असल्‍याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. पिंपरी-चिंचवड शहरातील नाशिक फाटाजवळ चार दिवसांपूर्वीच एका खासगी बसच्या एसीच्या वायरिंगमध्ये बिघाड झाल्याने शॉर्टसर्किट होऊन आग लागल्याची घटना घडली. बसमधील प्रवाशांना त्यांच्या थांब्यावर उतरवून चालक गाडी पार्क करण्यासाठी भोसरीकडे निघाला होता. त्‍यावेळी हा प्रसंग घडला. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र प्रवाशांच्‍या सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. खासगी बसचालक तसेच मालकांनी वाहनाचे मेंटनन्स नियमित ठेवणे आवश्यक आहे. यासोबतच परिवहन विभागाने ठरवून दिलेल्या कागदपत्रांची पूर्तता करणेही गरजेचे आहे. ते न केल्‍याने अपघाताच्‍या घटना वाढत असल्‍याचे चित्र आहे.

सुट्यांमध्ये रेल्वे, एसटी यांचे आरक्षण मिळत नसल्याने नागरिक खासगी बसचा पर्याय निवडतात. मात्र त्या वाहनांची माहिती प्रवाशांना नसते. ही वाहने लांबचा पल्ला गाठत असल्याने वाहनांनी सातत्याने वाहनांच्या देखभाल दुरुस्तीवर अधिक भर देणे गरजेचे आहे. त्यासोबत प्रवाशांकडून नियमानुसार भाडे आकारणी करणे, वाहनाचे पासिंग आणि फिटनेस आदी कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक आहे. मात्र या नियमांचे उल्लंघन होत असल्याने गेल्या एप्रिल आणि मे महिन्यात पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन विभागाच्या वायुवेग पथकाने तीनशे खासगी बसेसची तपासणी केली. यामध्ये नियमांचे उल्‍लंघन करणाऱ्या दोषी वाहनांवर कारवाई केली आहे.

...तर करा तक्रार
शहरात धावणारे अशा वाहनांची तपासणी वेळोवेळी आरटीओच्या माध्यमातून करण्यात येत आहे. मात्र, अनेकदा वाहनधारकांकडून प्रवाशांची आर्थिक लूट केली जाते. याबाबत नेमकी तक्रार कोठे करायची याची प्रवाशांना माहिती नसते. त्यामुळे पिंपरी चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयात त्याची तक्रार करा, असे आवाहन आरटीओच्या माध्यमातून करण्यात आले आहे.

नियमांचे उल्‍लंघन करणाऱ्यांवर कार्यालयाच्‍या वतीने कारवाई केली जात आहे. ही कारवाई नियमितपणे चालू असते. त्‍याचाच एक भाग म्‍हणून वाहनांची तपासणी करण्यात येत आहे.
- मनोज ओतारी, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी, पिंपरी-चिंचवड

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story