पिंपरी- चिंचवड: पहिल्या पावसात रस्ते गेले वाहून!
पंकज खोले :
शहरातील बेलगाम खोदाईला आळा घालण्यासाठी महापालिकेने कारवाईचा बडगा उचलला होता. त्यामुळे खोदाई केल्यानंतर तो खड्डा व्यवस्थित न बुजवता घाईगडबडीत मुरुम आणि माती टाकण्यात आली. मात्र, पहिल्याच पावसात हे कारनामे उघडकीस आले असून पावसाची सर कोसळताच खोदाई केलेल्या खड्ड्यातील माती, खडी पावसामुळे निघून गेली. परिणामी तेथे मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. दुसरीकडे, ऐन पावसात खोदाई केलेले खड्डे अर्धवट सोडल्याने त्यात पाणी साठले असून आता ते अपघाताला कारणीभूत ठरत आहे.
शहरात विकासकामे सुरू आहेत. त्यातच केबल टाकणे, गॅस पाईपलाईन टाकणे यासाठी रस्त्यावरती खोदाई करण्यात आली आहे. त्यासाठी चांगला डांबरी रस्ता, सिमेंटचे रस्तेदेखील खोदण्यात आले. मात्र, ते काम झाल्यानंतर खड्डे व्यवस्थित बुजवण्यात आले नाही. त्यावरती केवळ माती सरकवण्यात आली. तसेच काही ठिकाणी बारीक खडी टाकली गेली आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यातच मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे खड्डे बुजवण्यात आलेली माती, खडी वाहून गेली आहे. त्यामुळे खोदाईच्या जागी पुन्हा अर्धा ते एक फूट खड्डे पडले आहेत. यात वाहने मोठ्या प्रमाणात आदळून अपघात होण्याची शक्यता आहे.
या खड्ड्यामध्ये पावसाचे पाणी साठल्याने खड्ड्याचा अंदाज वाहनचालकांना येत नाही. त्यात दुचाकी वाहने घसरून किरकोळ अपघातही होत आहेत. चिंचवड येथील अहिंसा चौकात ऐन पावसाळ्यात खोदाई करण्यात आली. मात्र खड्डे बुजवण्यासाठी वरचेवर माती टाकली. त्यामुळे पावसाच्या पाण्यात ती माती निघून पुन्हा तेथे खड्डे दिसत आहेत.
वेग मंदावला
भोसरी, मोशी, चिंचवड, निगडी, रहाटणी या ठिकाणी विविध कारणाने खोदाई केली आहे. मात्र, ते खड्डे बुजवून पूर्वीप्रमाणे रस्ता बनवणे आवश्यक होते. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केल्याने पुन्हा खड्डे पडले आहेत. परिणामी, वाहतुकीचा वेग मंदावला असून, शहरात अनेक ठिकाणी वाहतूक कोंडीचा सामना वाहनचालकांना करावा लागतो.
संबंधित अधिकाऱ्यांना विचारा
पिंपरी- चिंचवड शहरातील खड्ड्यांबाबत संबंधित सह शहर अभियंता ज्ञानदेव जुंधारे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी खड्ड्यांच्या दुरावस्थेबाबत संबंधित क्षेत्रीय अधिकाऱ्यांना विचारा, तो भाग त्यांच्याकडे येतो असे सांगितले.
रस्त्यात ठिक-ठिकाणी खड्डे पडले आहेत. पावसामुळे साठलेल्या पाण्याने त्याचा अंदाज येत नाही. याबाबत महापालिकेकडे तक्रार करूनही कोणतीही कारवाई होत नाही. हे दुर्दैव.
- प्रमोद सोनवणे, स्थानिक नागरिक, भोसरी