संग्रहित छायाचित्र
पिंपरी-चिंचवड शहरातील हवा प्रदूषणात सातत्याने वाढ होत असून त्याचे दुष्परिणाम शहरवासीयांच्या आरोग्यावर होऊ लागले आहेत. प्रदूषणवाढीमुळे शहरात श्वसनसंस्थेच्या आजारांमध्ये वाढ होत आहे. रुग्णांना श्वासोच्छवास, फुफ्फुसांचे विकार होत आहेत. महापालिका वैद्यकीय विभागाकडील सलग तीन वर्षांच्या आकडेवारीवरून रुग्णसंख्येत मोठी भर पडल्याचे समोर आले आहे.
वेगाने विकसित होणारे शहर म्हणून पिंपरी-चिंचवड शहराकडे पाहिले जात आहे. त्याचा परिणाम शहराच्या विविध घटकांवर होत आहे. विविध प्रकारच्या प्रदूषणात वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. शहरात हवा प्रदूषणामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे शहरात त्यापासून होणाऱ्या आजारांचे रुग्ण वाढत असल्याचे चित्र आहे. शहरातील रुग्णांना श्वासोच्छवास, फुफ्फुसांचे विकार होत असून तीन वर्षात ही संख्या वाढल्याचे समोर आले आहे.
महापालिकेच्या निष्कर्षानुसार २०२०-२०२१ या वर्षात अशा विकारांचे फक्त ३६१ रुग्ण होते. दुसऱ्या वर्षात २०२१ २०२२ मध्ये त्यात तीनपट वाढ होऊन ते १ हजार ३०१ झाले, तर २०२२-२०२३ मध्ये ही रुग्णसंख्या २ हजार ३२१ पर्यंत पोहोचली. तीन वर्षांत सहापट वाढ झाल्याचे निष्पन्न झाले आहे, तर चालू वर्षात यात आणखी वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
खासगी बांधकामे, मेट्रोच्या कामामुळे प्रदूषणात वाढ
शहरातील वर्षभरातील बारा महिन्यांत प्रदूषणाची स्थिती समाधानकारक, मध्यम प्रदूषित असल्याचे पाहायला मिळाले आहे. त्यावर पालिका कार्यक्षेत्रात सल्फर डायऑक्साइड व नायट्रोजन डायऑक्साइडची पातळी ही केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने निश्चित केलेल्या विहित मर्यादेत आहे. शहरात धूलिकणांचे प्रमाण सणासुदीच्या काळात विहित मर्यादेपेक्षा अधिक असते. त्याबरोबर गतवर्षी जानेवारी व फेब्रुवारी महिन्यात शहरातील वाढणारे खासगी बांधकाम, मेट्रोचे बांधकाम व दळणवळण वाढल्याने हवा प्रदूषणात वाढ झाल्याचे दिसले, असा निष्कर्ष पर्यावरण अहवालात मांडण्यात आला आहे, तर धूलिकण नियंत्रित करण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचेही नमूद केले आहे.