पिंपरी-चिंचवड: फिटनेस विलंब दंडासहित चालकांचे प्रश्न सोडवा; रिक्षाचालकांनी घातले परिवहन आयुक्तांना साकडे

लेट गाडी पासिंग दंड, ऑनलाइन कंपन्यांची रिक्षा सेवा, इ रिक्षा परमिट त्यासोबतच विविध समस्यांबाबत अनेक मुद्द्यांवर रिक्षाचालकांनी आपल्या व्यथा परिवहन आयुक्तांसमोर मांडल्या. तसेच त्यावर तातडीने कार्यवाही करण्याबाबत मागणी केली. रिक्षा, टॅक्सी बस ट्रान्सपोर्ट फेडरेशन, ऑटो टॅक्सी चालक-मालक संघटना संयुक्त कृती समिती, त्याचप्रमाणे पुणे, पिंपरी चिंचवड शहरातील, ऑटो टॅक्सी संघटनांची बैठक परिवहन आयुक्त कार्यालयामध्ये नुकतीच झाली.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Edited By Admin
  • Fri, 31 May 2024
  • 11:28 am
pimpri chinchwad, vehicle fitness

पिंपरी-चिंचवड: फिटनेस विलंब दंडासहित चालकांचे प्रश्न सोडवा; रिक्षाचालकांनी घातले परिवहन आयुक्तांना साकडे

परिवहन कार्यालयासमोर आंदोलन करण्याचाही दिला इशारा

पंकज खोले 
लेट गाडी पासिंग दंड, ऑनलाइन कंपन्यांची रिक्षा सेवा, इ रिक्षा परमिट त्यासोबतच विविध समस्यांबाबत अनेक मुद्द्यांवर रिक्षाचालकांनी आपल्या व्यथा परिवहन आयुक्तांसमोर मांडल्या. तसेच त्यावर तातडीने कार्यवाही करण्याबाबत मागणी केली. रिक्षा, टॅक्सी बस ट्रान्सपोर्ट फेडरेशन, ऑटो टॅक्सी चालक-मालक संघटना संयुक्त कृती समिती, त्याचप्रमाणे पुणे, पिंपरी चिंचवड शहरातील, ऑटो टॅक्सी संघटनांची बैठक परिवहन आयुक्त कार्यालयामध्ये नुकतीच झाली.  

राज्याचे परिवहन आयुक्त विवेक भीमनवार, सह परिवहन आयुक्त जितेंद्र पाटील, अतिरिक्त सह परिवहन आयुक्त कळसकर,  कैलास कोठावले, पुणे प्रादेशिक परिवहन अधिकारी संजय भोर उपस्थित होते. दोन तासांपेक्षा अधिक काळ झालेल्या बैठकीत विविध मुद्यांवर चर्चा झाली. पुणे मुंबईसह महाराष्ट्रभर लेट पासिंगसाठी पन्नास रुपये दंड आकारण्याबद्दल कोणताही ठोस निर्णय या बैठकीमध्ये झाला नाही, याबाबत पुणे येथील सर्व संघटनांनी तीव्र संताप व्यक्त केला. कोविड काळात ऑटो, टॅक्सी चालकांचे अतोनात हाल झाले असून अशा परिस्थितीमध्ये त्यांना रोज पन्नास रुपये प्रतिदिवस दंड लावणे, हे अत्यंत चुकीचे व जुलमी आहे. सरकारने तातडीने हा दंड रद्द करून, रिक्षाचालकांचे इतरही प्रलंबित प्रश्न सोडवावेत, अन्यथा मुंबई पुणेसह महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी, याबाबत लवकरच महाराष्ट्र कृती समितीची व फेडरेशनची बैठक घेऊन महाराष्ट्रातील सर्व संघटनांना एकत्र करून या आंदोलनाची तयारी करण्यात येईल, असा इशारा या बैठकीत देण्यात आला. बैठकीमध्ये प्रदीप भालेराव, बापू भावे यांनी न्यायालय निवाडे व यापूर्वी शासनाने काढलेले जीआर याबाबत सखोलपणे चर्चा घडून आणली. सद्यस्थिती परिवहन आयुक्त समोर ऑटो टॅक्सी बस ट्रान्सपोर्ट फेडरेशन राष्ट्रीय अध्यक्ष बाबा कांबळे यांनी मांडली. तसेच त्यावर त्वरित कार्यवाही करण्याची मागणी केली.  रस्त्यावरील लढाईबरोबरच आम्ही न्यायालयीन लढाईचा पर्याय देखील खुला ठेवला असून या निर्णयाविरोधामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये दाद मागितली जाईल, असे रिक्षाचालक आनंद तांबे म्हणाले. परिवहन विभागाच्या मनमानी कारभाराच्या विरोधामध्ये यापूर्वी देखील पुणे येथे आम्ही मोठे आंदोलन केले असून याबाबत देखील लवकरात तीव्र आंदोलन उभारले जाईल असा इशारा देण्यात आला.

पुणे रिक्षा फेडरेशनचे अध्यक्ष आनंद तांबे, मनसे वाहतूक विभागाचे किशोर चिंतामणी, शिवनेरी रिक्षा संघटनेचे अशोक साळेकर, सावकाश रिक्षा संघटनेचे प्रदीप भालेराव, विद्यार्थी वाहतूक संघटनेचे बापू भावे, आजाद रिक्षा संघटनेचे अध्यक्ष शफिक पटेल, शुभम तांदळे, राष्ट्रवादी रिक्षा संघटनेचे अध्यक्ष बापू धुमाळ, एमआयएम रिक्षा संघटना कार्याध्यक्ष महमूद शेख, रिक्षा संघटना समन्वयक तुषार पवार, आदी व पुणे शहरातील रिक्षा संघटना पदाधिकारी उपस्थित होते.

मागण्यांवर करणार सकारात्मक विचार  - भिमानवार

लेट गाडी पासिंग केल्यास दररोज पन्नास रुपये दंड आकारण्यात आला आहे. त्यावर उच्च न्यायालयाचा आदेश विधी विभागाकडे पाठवून पुन्हा एकदा मागील दंड कमी करता येईल का याबाबत प्रयत्न करणार आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रिक्षाचे प्रमाण वाढले असून याबाबत तातडीने मुक्त रिक्षा परवाना बंद करण्यात येईल,  ई - रिक्षांना परमिटच्या कक्षेत आणण्याबाबत लवकरच केंद्र सरकारकडे पाठपुरवठा केला जाईल, रिक्षा कल्याणकारी महामंडळाची तातडीने अंमलबजावणी करू, पुणे आरटीओ व जिल्हाधिकारी यांनी ओला उबेरसह मोठ्या भांडवलदार कंपन्यांवरती बंदी आणली आहे. राज्य सायबर क्राईम यांना पत्र देऊन सर्व बेकायदेशीर मोबाईल ॲप बंद करण्यात येईल, त्याचप्रमाणे इतरही  प्रश्नाबाबत सकारात्मक विचार करण्याची माहिती परिवहन आयुक्त विवेक भिमानवार यांनी दिली.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story