पिंपरी-चिंचवडकर पिताहेत केमिकलयुक्त पाणी; पवनेतील प्रदूषणाचे घटक थेट पिण्याच्या पाण्यात

पिंपरी-चिंचवड शहरात गुइलेन बॅरे सिंड्रोम (जीबीएस) आजाराचे १८ संशयित रुग्ण आढळून आले आहेत. दूषित पाण्याद्वारे आजाराचा सर्वाधिक प्रसार होत असल्याने शहरातील खासगी विहिरी, बोअर, टॅंकर आणि जारमधील पाण्याची तपासणी करण्यात येत आहे. मात्र, पिंपरी-चिंचवडमधील सुमारे ३० लाख नागरिकांना पवना नदीतून उचलेले प्रदूषित पाणी पिण्यायोग्य करण्यासाठी महापालिकेला प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागत आहे.

Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

प्रदूषित पाणी पिण्यायोग्य करण्यासाठी दररोज होतोय २ हजार ५०० मेट्रिक टन क्लोरिन गॅस, ६२५ किलो ब्लिचिंग पावडरचा वापर

पिंपरी-चिंचवड शहरात गुइलेन बॅरे सिंड्रोम (जीबीएस) आजाराचे १८ संशयित रुग्ण आढळून आले आहेत. दूषित पाण्याद्वारे आजाराचा सर्वाधिक प्रसार होत असल्याने शहरातील खासगी विहिरी, बोअर, टॅंकर आणि जारमधील पाण्याची तपासणी करण्यात येत आहे. मात्र, पिंपरी-चिंचवडमधील सुमारे ३० लाख नागरिकांना पवना नदीतून उचलेले प्रदूषित पाणी पिण्यायोग्य करण्यासाठी महापालिकेला प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागत आहे. वर्षाकाठी करोडो रुपये खर्च करून ते पाणी शुद्ध  केले जात आहे. तरीही प्रदूषणाचे अनेक घटक पाण्यात कायम राहात असल्याने पिंपरी-चिंचवडकरांवर केमिकलयुक्त पाणी पिण्याची वेळ आली आहे.

प्रदूषित पाणी पिण्यायोग्य बनविण्यासाठी निगडीच्या जलशुद्धीकरण केंद्रात दररोज २ हजार ५०० मेट्रिक टन क्लोरिन गॅस आणि ६२५ किलो ब्लिचिंग पावडरचा वापर करावा लागत आहे. तरीही प्रदूषणाचे अनेक घटक पाण्यात राहात असून ते पाणी पिंपरी-चिंचवडकरांना पिण्यासाठी दिले जात आहे. त्यामुळे शहरवासियांच्या जिवाशी खेळ सुरू असल्याची टीका जागरूक नागरिकांकडून करण्यात येत आहे.

पिंपरी-चिंचवड शहराची जीवनवाहिनी असलेल्या पवना नदीने देशातील अतिप्रदूषित नद्यांच्या यादीत स्थान मिळविले आहे. नदीच्या प्रदूषणात प्रचंड वाढ झाली आहे. पवना धरणापासून ते रावेत बंधारा येथील पाणीउपसा केंद्रापर्यंत विविध कंपन्यांचे रासायनिक व केमिकल्सयुक्त पाणी, विविध सोसायटीचे मैलामिश्रित आणि सांडपाणी,  लॉन्ड्रीचे साबण तसेच रसायनयुक्त पाणी हे पिंपरी-चिंचवड शहरासाठी आलेल्या पिण्याच्या पाण्यात मिसळत आहे.

याशिवाय मृत जनावरे, जलपर्णी, वेगवेगळा कचरादेखील त्या बंधाऱ्यात आढळून येत आहे. अशाप्रकारे विविध रासायनिक आणि केमिकल्सयुक्त असलेले सर्वाधिक प्रदूषित पाणी हे रावेत बंधाऱ्यातून पाणी उपसा केंद्रातून उचलून ते निगडीच्या जलशुध्दीकरण केंद्रात आणून त्यावर किलो क्लोरिन गॅस आणि ब्लिचिंग पावडरचा मारा करून ते पाणी पिण्यायोग्य बनविले जात आहे. मात्र, ते पाणी पिण्यायोग्य असले तरीही त्यात काही प्रमाणात प्रदूषणाचे घटक कायम राहात आहेत.    

पिंपरी-चिंचवड शहराला पिण्याच्या पाण्यासाठी मावळातील पवना धरणातून पाणीपुरवठा करण्यात येतो. पवना धरणातून नदीद्वारे पाणी सोडल्यानंतर ते रावेत बंधाऱ्यातून उचलले जाते. धरणातून पालिका पाणीपुरवठा विभाग दररोज ४८० ते ५१० एमएलडी पाणी शहरासाठी घेण्यात येते. मात्र, शहराची लोकसंख्या सद्यस्थितीत सुमारे ३० लाखाच्या घरात असून हे पाणी शहराला दिवसाआड पुरेसे प्रमाणात द्यावे लागत आहे.  

शहराचे वाढते नागरीकरण, औद्योगिक क्षेत्रामुळे पवना नदीच्या प्रदूषणात वाढ होत असून, कधी काळी स्वच्छ पाणी घेऊन वाहणारी पवना नदीला गटाराचे स्वरूप आले आहे. शहरातून सुमारे २५ किलोमीटर पवना नदी प्रवाहित होत आहे.  पवना नदीचा उगम स्थानापासून रावेत बंधाऱ्यापर्यंत नदीत मैलामिश्रित सांडपाणी, रसायन, निर्माल्य, घनकचरा, मांस, चिकन, मासे यांचा कचरा आदी बरेच काही जसेच्या तसे नदीत सोडून दिले जात आहे.

नदीकाठच्या परिसरात दोन्ही तीरावर रहिवासी सोसायट्या, व्यापारी संकुले, हॉटेल, विविध गॅरेज असे रसायनयुक्त पाणी सोडणारे उद्योग आहेत. सांडपाणी, मैलामिश्रित पाणी याचे पूर्णपणे शुद्धीकरण केले जात नाही. या नदीवर काही बंधारे होते, ते तोडून नदीची रुंदी कमी केली गेली. यामुळे नदीला गटाराचे स्वरूप आले. घनकचरा, राडारोडा, नदीकाठी केलेली अतिक्रमणे, जलपर्णी आदींमुळे नदीचे पात्रदेखील अरुंद झाले आहे.

पवना नदीला मिळणाऱ्या मैलामिश्रित पाणी, सांडपाणी, नाल्यांमुळे पवनेच्या प्रदूषणात वाढ झाल्याचे महापालिका पर्यावरण अहवालातून समोर आले आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाने पाणी नमुन्याचे परीक्षण केल्यानंतर पाण्यातील प्राणवायूचे (डीओ) प्रमाण कमी होत असल्याचे आढळले आहे. तुलनात्मकदृष्ट्या रासायनिक (सीओडी) आणि जैविक प्राणवायूचे (बीओडी) प्रमाण दुपटीने वाढले आहे. त्यामुळेच पाणी प्रदूषणात लक्षणीय वाढ होत आहे.

दरम्यान, शहरात जीबीएस रुग्णांचे प्रमाण हे दूषित पाण्यामुळे वाढत असून त्या पाण्याचे शोध करण्यासाठी वैद्यकीय आणि पाणीपुरवठा विभागाकडून दूषित पाण्याचे नमुने घेत ब्लिचिंग पावडर टाकून पिण्यायोग्य पाणी केले जात आहे. याकरिता खासगी विहिरी, बोअरवेल, जार, टॅंकरची ठिकाणी दररोज पाण्याची नमुने घेऊन तपासणी केली जात आहे. पण, महापालिकेने पवना नदीतील पाणी प्रदूषित करणा-यांवर अद्याप कोणतीही कारवाई केलेली नाही. शिवाय शहरातील नागरिकांना स्वच्छ व पिण्यायोग्य पाण्यासाठी बंदिस्त पवना जलवाहिनीचा प्रश्नदेखील १४ वर्षांपासून प्रलंबित आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांनी पाणीपुरवठा करताना महापालिकेकडून प्रदूषित पाण्यावर केमिकल्सचा मारा करूनच पिण्यायोग्य पाणी प्यावे लागत आहे. परिणामी नागरिकांच्या आरोग्याचा भविष्यात गंभीर प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे.

महापालिका म्हणते, पिण्याचे पाणीदेखील केमिकलयुक्त; पण...

रावेतमध्ये पाणी उचलल्यानंतर निगडीच्या जलशुद्धीकरण केंद्रात आणले जाते. ते पाणी शुद्ध आणि पिण्यायोग्य करण्यासाठी प्रक्रिया केली जाते. त्या पाण्यात दररोज क्लोरिन गॅस २ हजार ५०० मेट्रिक टन,  ६२५ किलो ब्लिचिंग पावडर आणि पावसाळ्यात तुरटी ८ किलो पाण्यात टाकली जात आहे. त्यामुळे पाण्यातील गढूळपणा, पाण्याचा गंध, कडवटपणा, शेवाळ, अळ्या, माती, बॅक्टेरिया हे निघून जातात. त्यानंतर पाण्याची चव बदलून ती गोड होते. ते पाणी पिण्यायोग्य होते. मात्र, त्यातील सेंद्रिय कार्बन, नायरेट्स, अमोनिया हे घटक पाण्यात तसेच राहतात. त्या घटकाचा माणसाच्या शरीरावर कुठलाही घातक परिणाम होत नाही, असे दावा महापालिकेच्या वतीने निगडी येथील जलशुद्धीकरण केंद्राचे मुख्य केमिस्ट प्रशांत जगताप यांनी केला आहे.

...म्हणून बंदिस्त जलवाहिनी आवश्यक  

महापालिकेने २००८ मध्ये पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्प हाती घेतला. मात्र, २०११ मध्ये मावळातील शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे हा प्रकल्प रखडला. आता राज्य सरकारने प्रकल्पावरील स्थगिती उठविली आहे. त्यामुळे बंदिस्त जलवाहिनीचा मार्ग मोकळा झाला आहे. थेट पवना धरणातून निगडीतील जलशुध्दीकरण केंद्रात ४८० एमएलडी पाणी बंदिस्त जलवाहिनीतून आणण्यात येणार आहे. पवना धरण ते निगडी सेक्‍टर क्रमांक २३ येथील जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत असे एकूण ३४.७१ किलोमीटर अंतराची समांतर जलवाहिनी टाकण्यात येणार होती. त्यापैकी महापालिका हद्दीतील ४.४० किलोमीटर भूमिगत जलवाहिनीचे काम पूर्ण झाले होते. पवना नदीच्या प्रदूषणामुळे बंदिस्त जलवाहिनी प्रकल्प होणे आवश्यक आहे.

पाणी शुद्धीकरणासाठी केमिकल्सचा उतारा

शहरातील सुमारे ३० लाख नागरिकांना पिण्यायोग्य पाणी देण्यासाठी निगडीच्या सेक्टर २३ मध्ये २०२०-२०२१ मध्ये वर्षभरासाठी १५० टन इतकी ब्लिचिंग पावडर लागत होती. तीदेखील शिल्लक राहायची, २०२३-२०२४ मध्ये वर्षभरासाठी तब्बल ३५० ते ४०० टन इतकी ब्लिचिंग पावडर लागली. त्यामुळे पवना नदीच्या प्रदूषण पातळी किती वाढली, याचा अंदाज येईल. पावसाळ्यात दररोज दोन किलो तुरटी लागत होती. तिचे प्रमाण आता आठ किलोवर गेले आहे.  

पाण्यातील टीडीएस १०० ते ११० पीपीएमपर्यंत वाढले

माणसाला पिण्यायोग्य पाण्याचेदेखील मानांकन ठरवले आहे. मात्र, नदी प्रदूषण वाढल्याने त्या पाण्यात विरघळलेले घन पदार्थ ( Total Dissolved Solids ) वाढत असतात. त्या विरघळलेल्या घन पदार्थांमध्ये सोडियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम केशन्स आणि क्लोराईड, बायकार्बोनेट, कार्बोनेट, फॉस्फेट, सल्फेट आणि नायट्रेट आयनसारख्या अजैविक क्षारांचा समावेश असतो. पूर्वीचे पवना नदीत टीडीएसचे प्रमाण हे ६० ते ७० पीपीएम होते. आता हेच प्रमाण १०० ते ११० पीपीएम पर्यंत गेले आहे. प्रदूषण वाढल्याने क्षारांचे प्रमाणदेखील वाढले आहे.

निगडी जलशुद्धीकरण केंद्र

दररोज ५३५ एमएलडी पाणी उचलले जाते

क्लोरिन गॅस : २ हजार ५०० मेट्रिक टन,  

ब्लिचिंग पावडर : ६२५ किलो,

तुरटी (फक्त ४ महिने पावसाळा) : दररोज ८ किलो, सुमारे ३ कोटी रुपये

राष्ट्रीय मानकांच्या तुलनेत पवनेचे पाणी दुप्पट प्रदूषित

पवना नदीला मिळणाऱ्या सदुंबरे, कासारसाई, सांगवडे, किवळे, मामुर्डी आदी ठिकाणी गटाराचे सांडपाणी, नाल्यांचे पाणी, औद्योगिक कंपन्यांचे पाणी, काही लाॅंड्रीचे पाणी थेट नदीत मिसळले जात आहे. राष्ट्रीय स्तरावर ठरवून देण्यात आलेल्या निश्‍चित मानकांच्या तुलनेत संबंधित नदीच्या पाण्यात रासायनिक घटक, केमिकलयुक्त पाणी आणि जैविक वायूच्या प्रमाणात दुपटीने वाढ झाल्याचे आढळले आहे. परिणामी, पवनेच्या पाणी प्रदूषणातही वाढ झाली आहे. पाण्यातील विरघळलेल्या प्राणवायूसाठी (डीओ) प्रमाण कमी झाल्याने जलचर प्राणी, मासे मरून पडू लागले आहेत. रसायनयुक्त (सीओडी) वाढल्याने जलपर्णीचे प्रमाण वाढले आहे. यामुळे पवना नदीचा समावेश देशातील अतिप्रदूषित नद्यांच्या यादीत झाला आहे.

पवना नदी उगम स्थानापासून रावेत उपसा जलशुद्धीकरणपर्यंत नदीचे प्रदूषण वाढले आहे. हे प्रदूषण रोखणे काळाची गरज आहे. शहरातील नागरिकांना पिण्यायोग्य पाणी आम्ही देत आहोत. परंतु, पाण्याचे प्रदूषण रोखण्यासाठी पूर्वीपेक्षा अधिक केमिकल्सचा वापर होऊ लागला आहे. नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी तातडीने प्रयत्न करणे आवश्यक आहे. जेणेकरून पिंपरी-चिंचवडकरांना प्रदूषण विरहित पाणी मिळण्यास मदत होईल.

- प्रशांत जगताप, मुख्य केमिस्ट, जलशुद्धीकरण केंद्र, निगडी

Share this story

Latest