पिंपरी चिंचवड : पाण्यासाठी नागरिकांचा वनवास संपेना
पंकज खोले :
गेल्या वर्षभरापासून हेलपाटे मारूनही पाण्याचा प्रश्न सुटला नसल्याने सेक्टर १२ मधील जवळपास ७० नागरिक पीएमआरडीए कार्यालयात धडकले. पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण अर्थात पीएमआरडीए अंतर्गत उभारलेल्या या संकुलात नागरिकांचा पाण्याचा वनवास काही संपायचे नाव घेत नाही. गुरुवारी पाण्यासाठी जवळपास सहा तास नागरिकांनी प्राधिकरणाच्या कार्यालयासमोर ठिय्या मांडला. अखेर दोन दिवसांत पाण्याचा प्रश्न मिटवण्याचे आश्वासन देऊन त्या सर्वांना पुन्हा पाठवले. मात्र, प्रश्नांना सुटल्यास प्राधिकरणावर हंडा मोर्चा काढण्याचा इशारा या नागरिकांनी दिला.
सेक्टर १२ येथील प्रकल्प उभारल्यापासून रहिवाशांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यापैकी जीवनावश्यक बाब म्हणजे पाण्यासाठी नागरिकांना प्राधिकरणापुढे हात पसरावे लागत आहेत. येथील माहुली गड आणि गोरखगड या दोन इमारतींना वर्षभरापासून अपुरे पाणी मिळत आहे. याबाबत प्राधिकरण कार्यालयास आतापर्यंत किमान १२ वेळा पत्रव्यवहार करण्यात आला आहे. तर, पंधरा वेळा प्राधिकरण कार्यालयात पाठपुराव्यासाठी नागरिक आले. मात्र, आश्वासन देण्याच्या पलीकडे प्राधिकरणाकडून कोणतीही कार्यवाही झाली नसल्याचे येथील रहिवाशांनी सांगितले.
दरम्यान, संपूर्ण उन्हाळा नागरिकांनी पाण्याअभावी काढला. गेला तीन महिन्यांपासून निवडणूक, आचारसंहिता आणि अधिकारी जागेवर नसल्याचे सांगत येथील रहिवाशांच्या भावनांसोबत खेळ केला. मात्र, संयमाचा बांध फुटल्याने रहिवासी सकाळी दहा वाजताच प्राधिकरण कार्यालयासमोर धडकले. मात्र, संबंधित विभागाचा अधिकारी आला नसल्याचे सांगून त्यांना बसवून ठेवले. त्यानंतर रहिवाशांचे एक शिष्टमंडळ प्राधिकरणाचे मुख्य अभियंता अशोक भालकर यांना भेटण्यास गेले. त्यांच्या समस्या ऐकून घेतल्यानंतर दोन दिवसांत हा प्रश्न मार्गी लावतो, असे त्यांनी शिष्टमंडळांस सांगितले. मात्र, आता कोणतेही 'आश्वासन नको तर कृती करा' अशी ठाम भूमिका रहिवाशांनी घेतली. त्यामुळे लवकरच यावर तोडगा काढण्याचे आश्वासन देण्यात आले.
दरम्यान, सेक्टर १२ येथील ए-४, ए-५ या इमारतींचे बहुतांश रहिवासी आपल्या रोजच्या कामाला दांडी मारून तर, कोणी सुट्टी काढून पाण्यासाठी या ठिकाणी आले होते. सकाळी १० ते दुपारी दोन असे पाच तास नागरिकांना ताटकळत बसून ठेवण्यात आले. पाण्याची समस्या लवकर सुटावी यासाठी आयुक्तांकडे मागणी केल्याचे पत्र प्राधिकरण कार्यालयास दिले. पाण्याची बिलासाठी महिन्याकाठी सोळा हजार रुपये भरावे लागतात. आत्तापर्यंत रहिवाशांनी पाण्यासाठी गोळा केलेले जवळपास सव्वा लाख रुपये टँकरसाठी केले आहेत. आता तरी आमच्या समस्या सोडाव्यात, अशी मागणी त्यात केली आहे. यावेळी सोसायटीचे पदाधिकारी स्वप्नील गायकर, कृष्णा सातकर, श्याम नांगरे, विठ्ठल देशमुख, ज्ञानेश्वर सुळे, युवराज वनवे, प्रतीक शिंदे, संध्या वाघदरे, गीतांजली मते, आशिष सुर्वे यासह जवळपास ७० नागरिक उपस्थित होते.
बीव्हीजीकडून प्राधिकरणाची खुशामत
सेक्टर १२ येथील साफसफाई, सुरक्षा व्यवस्थेचा ठेका बीव्हीजी कंपनीला देण्यात आला आहे. त्यानुसार पाणी सोडण्याचेही काम बीव्हीजी करते. दरम्यान, रहिवाशांच्या तक्रारी आल्यानंतर प्राधिकरणाने संबंधित कंपनीचे अधिकाऱ्यांना विचारले. मात्र, पुरेसे पाणी येते असा अजब अहवाल बीव्हीजी कंपनीने प्राधिकरणाला पाठवला आहे. त्यामुळे नागरिकांच्या समस्या सोडून प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना खुश करण्यासाठी हा अहवाल पाठवला असल्याचे नागरिकांनी आरोप केला आहे.
मुख्य अभियंता बैठकीत व्यस्त
याबाबत विचारणासाठी प्राधिकरणाचे मुख्य अभियंता अशोक भालकर यांच्याशी भेट घेण्यास गेले असता, ते बैठकीत असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर जवळपास साडेतीन तासांनी त्यांच्याशी संपर्क केला. सेक्टर १२ मधील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न विचारला असता, थोड्या वेळाने फोन करतो, असे भालकर यांनी सांगितले. त्यामुळे प्राधिकरण रहिवाशांच्या प्रश्नावर गांभीर्य घेत नसल्याचे दिसून येते.
या आहेत आणखी काही समस्या :
-संडास-बाथरूम गळती
-अपुरे आणि कमी दाबाचे पाणी
-पाईपमधून सततची दुर्गंधी
-टेरेसमधील ठिक-ठिकाणी गळती
-सोलर पाईप ठिक-ठिकाणी डॅमेज
-ट्रांसफार्मर आणि विद्युत लाईन उघड्यावर
-सदनिकांच्या काचेचे निकृष्ट काम
-सोलर पॅनलचे अर्धवट काम
-प्रवेशद्वाराचे स्लाइडिंग गेट.