पिंपरी चिंचवड : पाणी दूषित नसल्याचा प्रदूषण मंडळाचा दावा
पंकज खोले :
इंद्रायणी नदीचे पाणी आळंदी देवाची या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दूषित झाल्याची तक्रार स्थानिक नागरिकांनी केली होती. मात्र, इंद्रायणीमध्ये सध्या कोणत्याही प्रकारचा फेस, जलपर्णी आढळून आली नाही. प्रथमदर्शनी कोणतेही केमिकल मिसळले गेलेले नाही. दरम्यान, नदीच्या पाण्याचे सॅम्पल गोळा करण्यात आले असून त्याच्या अहवालानुसार पुढील कारवाई करण्यात येईल, अशी माहिती राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिली.
बुधवारी (५ जून) मध्यरात्रीपासून प्रदूषित सांडपाणी नदीत मिसळल्याने नदीपात्रात पाण्यावर साबणासारखे फेसाचे तवंग निर्माण झाले होते. पाण्यावर फेसाचे तरंग वाहात होते. त्यामुळे इंद्रायणी सेवा फाऊंडेशन याचबरोबर स्थानिक ग्रामस्थांनी या विरोधात आवाज उठवला होता. 'आता रात्रीच्या वेळी इंद्रायणीत रसायनयुक्त पाणी' या शीर्षकाखाली 'सीविक मिरर'ने या विषयाला वाचा फोडली होती. ऐन जागतिक पर्यावरणदिनाच्या निमित्ताने सर्वत्र पर्यावरणदिन साजरा करत असताना इंद्रायणी नदीची ही दुरवस्था नागरिकांच्या रोषाला कारणीभूत ठरली. त्यामुळे इंद्रायणी नदीबाबत सरकारी अनास्था दिसून आली.
राज्यभरातून वारकरी पुढील तीन आठवड्यांत आळंदीत दाखल होतील. त्यामुळे इंद्रायणीची अशी अवस्था पाहून वारकरीदेखील नाराज होण्याची शक्यता आहे. अशावेळी अशाच पद्धतीने प्रदूषित सांडपाणी नदीपात्रात सोडले तर वारकऱ्यांनी स्नान करायचे कसे, असा प्रश्न पडला आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, पिंपरी-चिंचवड महापालिकेचा पर्यावरण विभाग, लोकप्रतिनिधी आणि स्थानिक नगरपरिषद यांनी एकत्र कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
दरम्यान, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने ही तक्रार प्राप्त झाल्यानंतर नदीची पाहणी केली. प्रथमदर्शी नदीमध्ये कोणतेही केमिकल अथवा दूषित पाणी सोडले नसल्याचे दिसून आले. मंगळवारी पाऊस झाल्याने नदीमध्ये फेस झाला होता. तसेच जलपर्णी दिसून आली नाही. पात्र एकदम रिकामे असल्याने कोणत्याही प्रकारचा दूषितपणा आढळून आला नाही. दरम्यान, याबाबत नदीच्या पाण्याचे सॅम्पल घेतले असून त्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल असे सांगितले. तसेच वारीच्या पार्श्वभूमीवर पाण्याचा फ्लो वाढवण्यात येणार आहे. जेणेकरून वारकऱ्यांना स्वच्छ पाणी मिळेल.
पावसामुळे नदीचे पाणी वाढले आणि ते ओव्हर फ्लो झाल्यानंतर बंधाऱ्याजवळ फेस निर्माण होतो. तरी इंद्रायणी नदीचे सॅम्पल घेतले आहेत. केवळ डोमेस्टिक पाणी मिसळत असलेली दिसून आले. त्याबाबत नोटीस देण्यात आल्या आहेत. अधिकाऱ्यांनी या ठिकाणची पाहणी केल्यावर थोड्याच ठिकाणी फेस असल्याचे आढळून आले आहे. इतर ठिकाणी नदी क्लिअर असल्याचे दिसून आले. सॅम्पलचा अहवाल आल्यानंतर डोमेस्टिक आहे की कंपनीचे हे लक्षात येईल. त्यानंतर कारवाई केली जाईल.
-व्ही. व्ही. किल्लेदार, सब रिजनल ऑफिसर, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ