संग्रहित छायाचित्र
महाराष्ट्र शासनाच्या 'मुख्यमंत्री-१०० दिवस कार्यालयीन सुधारणा' कार्यक्रमांतर्गत पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने उत्कृष्ट कामगिरी नोंदवत तिसरे स्थान मिळवले आहे. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल मंगळवारी (दि. २०) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हस्ते पीएमआरडीएचे आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांचा गौरव केला.
मुंबई येथील मंत्रालयात झालेल्या या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री छगन भुजबळ यांच्यासह मुख्य सचिव सुजाता सैनिक, मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव विकास खरगे, अपर मुख्य सचिव नगरविकास विभाग असिमकुमार गुप्ता यांच्यासह प्रशासकीय स्तरावरील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. मुख्यमंत्री-१०० दिवस कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमाचा अंतिम निकाल १६ मे २०२५ रोजी जाहीर झाला. यात गुणवत्ता परिषद भारत (क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडिया) यांनी केलेल्या अंतिम मूल्यांकनात पीएमआरडीएने ७६.०२ गुण मिळवत राज्यभरातील ९५ महामंडळे, प्राधिकरणे, शासकीय / निमशासकीय संस्था, कंपन्या आदी गटातून तिसरा क्रमांक मिळवला आहे. आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांच्या नेतृत्वाखाली पीएमआरडीएने सर्वसामान्य नागरिकांचे हित केंद्रस्थानी ठेवत कार्यालयात अपेक्षित सोयी-सुविधांसह प्रशासकीय कामकाजातील गतिमानतेला अधिक प्राधान्य दिले. यात प्रशासकीय कामकाजातील नावीन्यता, लोकाभिमुख प्रशासन व्यवस्था, आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब, अद्ययावत संकेतस्थळ, कार्यालयीन स्वच्छता व सोयी-सुविधा अशा काही महत्त्वांच्या मुद्द्यांची राज्य शासनाने दखल घेतली.
मुख्यमंत्री १०० दिवसांच्या कार्यक्रमात माझ्या सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घेतलेल्या सामूहिक मेहनतीमुळे पीएमआरडीएला हा पुरस्कार मिळाला. नागरिक केंद्रीत कार्यालयीन सोयी सुविधा आणि लोकाभिमुख प्रशासनावर आमचा अधिक भर आहे. -डॉ. योगेश म्हसे, आयुक्त, पीएमआरडीए