संग्रहित छायाचित्र
पिंपरी-चिंचवड शहरात मेट्रोसेवा सुरु होऊन तीन वर्षे झाली असली, तरी पीसीएमसी मेट्रो स्थानकावरील एक महत्त्वाचा पादचारी पूल अद्यापही प्रवाशांना वापरता येण्याजोगा नाही. प्रवाशांच्या दृष्टीने ही प्रतीक्षा अधिक त्रासदायक ठरते आहे. महापालिका भवनासमोरील हा पूल केवळ अधांतरी स्थितीत राहिल्याने, प्रवाशांना अजूनही महामार्ग ओलांडण्याचा धोका पत्करावा लागत आहे.
पिंपरीतील पीसीएमसी मेट्रो स्थानक हे पिंपरी-चिंचवड शहराचे एक केंद्रबिंदू ठरले आहे. या ठिकाणी दररोज हजारो प्रवासी मेट्रोच्या माध्यमातून प्रवास करतात. या स्थानकातून आकुडी, चिंचवड, पुणावळे, रावेत, वाकड या भागात जाणाऱ्या आणि तिकडून येणाऱ्या प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे या ठिकाणी अत्यंत सुरक्षित आणि सुलभ पादचारी संपर्क असणे गरजेचे होते. त्याच अनुषंगाने या स्थानकासाठी चार पादचारी पूल मंजूर करण्यात आले होते. यापैकी दोन पूल प्रवाशांच्या सेवेत दाखल करण्यात आले आहेत. मात्र महापालिका मुख्यालयासमोरील पूल अद्यापही अपूर्ण स्थितीत आहे. या अपूर्ण पुलामुळे प्रवाशांना महामार्ग ओलांडताना अपघाताचा मोठा धोका निर्माण झाला आहे. या मार्गावर अवजड वाहतूक आणि जलदगती वाहनांची संख्याही लक्षणीय असल्याने, वाहनचालक आणि पादचाऱ्यांमध्ये नेहमीच तणावाची स्थिती निर्माण होते. विशेषतः सकाळी आणि सायंकाळी गर्दीच्या वेळात शालेय विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक यांना जीव मुठीत धरून रस्ता पार करावा लागतो.
अपघाताचे भय सतत वाटत असते. प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे नागरी सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. तीन वर्षांत एक पूल पूर्ण होऊ शकत नाही, यावर विश्वास बसत नाही. शहरात एकीकडे आयटी कंपन्यांचे वाढते जाळे, औद्योगिक क्षेत्रांचा विस्तार, वाढती लोकसंख्या आणि प्रवासी वाहतुकीची गरज वाढत असताना, सार्वजनिक पायाभूत सुविधा मात्र याच्या उलट गतीने उभारल्या जात आहेत. एकीकडे स्मार्ट सिटीचा गजर सुरु आहे, तर दुसरीकडे या मूलभूत समस्यांकडे दुर्लक्ष होत असल्याची भावना नागरिकांमध्ये आहे. मेट्रो स्थानकांभोवती आवश्यक सुविधा आणि सुरक्षेच्या उपाययोजना लवकर पूर्ण व्हाव्यात, अशी मागणी प्रवाशांकडून सातत्याने केली जात आहे. पीसीएमसी स्थानक हे मेट्रोच्या फेज १ अंतर्गत विकसित करण्यात आले असून, त्याचा वापर दररोज हजारो नागरिक करत आहेत. असे असताना, या ठिकाणी सुलभ प्रवेशासाठी पूरक पूल तयार नसणे ही गंभीर बाब आहे. स्थानकाच्या इतर तीन प्रवेशद्वारांवर चालू पूल असले, तरी हा एकमेव अपूर्ण पूल नागरिकांच्या दैनंदिन हालअपेष्टांना कारणीभूत ठरत आहे. या पार्श्वभूमीवर महा मेट्रोने कामाचा वेग वाढवून नियोजित वेळेत पूल पूर्ण करणे ही काळाची गरज आहे. मेट्रो स्थानकांच्या आजूबाजूच्या सुविधांचा अभाव, स्मार्ट सिटीच्या दाव्यांनाही फोल ठरवतो, असा सूर शहरवासीयांतून व्यक्त होतो आहे. या संदर्भात महा मेट्रोचे जनसंपर्क अधिकारी डॉ. हेमंत सोनवणे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी उत्तर दिले नाही.
प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे नागरी सुरक्षेचा प्रश्न
एकीकडे पायवाटही उभी राहिलेली नसल्यामुळे आणि दुसरीकडे पूल नसल्याने नागरिकांपुढे कोणताही सुरक्षित पर्याय उरत नाही. महामेट्रोने या पूलाचे बांधकाम सुरू केल्याचे तीन वर्षांपूर्वी जाहीर केले होते. सुरुवातीस काही पिलर उभारण्यात आले, परंतु त्यानंतर कामाचा वेग कमी झाला. आतादेखील पूल अधांतरी स्थितीत असून जिन्याचे कामही पूर्ण झालेले नाही. नागरिकांनी अनेकवेळा या संदर्भात महामेट्रोकडे तक्रारी केल्या असून स्थानिक नगरसेवकांनीही पाठपुरावा केला आहे. मात्र ठोस कार्यवाही दिसून आलेली नाही. पीसीएमसी परिसरातील एक प्रवासी विशाल थोरात म्हणाले की, प्रत्येक दिवशी आम्हाला महामार्ग ओलांडताना जीव गहाण ठेवावा लागतो.