पिंपरी-चिंचवड | पोटाच्या शस्त्रक्रियेमुळे विधी अभ्यासक्रमाची परीक्षा बुडाल्याने आलेल्या नैराश्यातून सांगवी येथील विद्यार्थिनीने गुरुवारी (२० मार्च) लोहगडावर जाऊन आत्महत्या केली. सांगवी पोलिस ठाण्यात मंगळवारी ही विद्यार्थिनी बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदविण्यात आली होती.
मानसी प्रशांत गोविंदपुरकर (वय २१, रा. सांगवी) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. सांगवी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सचिन शिर्के यांनी दिलेल्या माहितीनुसार, मानसी हिचे कुटुंब मूळचे लातूरचे आहे. ती शिक्षणासाठी सांगवी येथे आपल्या आजी, आजोबांकडे राहत होती. सहा महिन्यांपूर्वी तिच्या पोटाची शस्त्रक्रिया झाली. त्यामुळे तिची परीक्षा बुडाली. या कारणाने ती नैराश्यात होती.
मंगळवारी सकाळी ती कॉलेजला जाण्यासाठी घरातून निघाली. त्यानंतर ती एका टॅक्सी मधून लोहगड येथे एकटी आली. टॅक्सीतून उतरून लोहगडावर जाताना तिकीट काउंटर वरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसत आहे. मानसी बेपत्ता झाल्यानंतर पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तिचा शोध घेतला. त्यावेळी ती लोहगड येथे आल्याची माहिती मिळाली.
पोलिसांनी तिकीट काउंटर वरील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यामध्ये ती दिसून आली. त्यामुळे मानसीचे नातेवाईक आणि शिवदुर्ग रेस्क्यू टीमच्या सदस्यांनी गड परिसरात तिचा शोध सुरू केला. लोहगडाच्या पायथ्याशी असलेल्या घेरेवाडी कडील बाजूला नवग्रह मंदिराच्या जवळ झाडाझुडपात तिचा मृतदेह आढळला. तिचे घरचे आणि मित्र - मैत्रिणींनी मानसी नैराश्यात असल्याचे सांगितले. लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.