संग्रहित छायाचित्र
पंकज खोले
शहरातील निगडी ते दापोडी १२.५ किलोमीटर रस्त्यावर महापालिकेकडून दोन्ही बाजूने पेवर्स ब्लॉक , फुलझाडे, हिरवळ, रंगरंगोटीद्वारे सुशोभीकरण करण्यात येणार आहे. या कामासाठी १०० कोटींपेक्षा अधिक खर्च करण्यात येणार आहे. मात्र, यामध्ये रस्त्यावरील हातगाडी आणि स्टॉलधारकांना डावलण्यात आल्याचे दिसून येत असल्याने नॅशनल हॉकर्स फेडरेशनच्या वतीने नाराजी व्यक्त करण्यात आली.
पिंपरी-चिंचवड शहराच्या मध्यातून जाणारा रस्ता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई-पुणे महामार्गावर सुशोभीकरण करा मात्र या रस्त्यावरील हातगाडी, स्टॉलधारकांचाही विचार करा अन्यथा आंदोलन करू असा इशारा कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी दिला. नॅशनल हॉकर फेडरेशन, महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघातर्फे निगडी ते दापोडी या महामार्गावरील पथारी, हातगाडी, स्टॉलधारकांची आढावा बैठक नुकतीच झाली. बैठकीस महासंघाचे कार्याध्यक्ष राजू बिराजदार, कार्याध्यक्ष संभाजी वाघमारे, निमंत्रक बालाजी लोखंडे, अध्यक्ष सय्यद अली, अनिता कुमार, अनिता भुजबळ, रुक्मिणी धावारे, ज्ञानदेव चव्हाण, लता कुंबेकर, महादेव माने, समीर बागवान, मनोज यादव, मधुकर वाघमारे, सिद्धाराम पुजारी, रमेश डेंगळे, रमेश वाणी, ओम शर्मा , संतोष वाघमारे, शिवाजी पौडमल आदींसह या मार्गावरील विक्रेते उपस्थित होते. निगडी ते दापोडी मार्गाच्या सुशोभीकरणाच्या कामासाठी अंदाजे खर्च १०९.३८ कोटी रुपये आहे, आणि हे काम सुरू करण्यात आले आहे. त्या अंतर्गत रस्ता सुशोभीकरणासाठी शहरी रस्ता डिझाइन मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केले जाईल. या प्रकल्पात पदपथ, सायकल ट्रॅक, तसेच रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी झाडे आणि हिरवळ लावण्याचे नियोजन आहे. सुशोभीकरणाच्या या योजनेत पदपथाचे काम पूर्ण होणे आणि सायकल चालवण्यासाठी सोयीस्कर वातावरण निर्माण करणे हे मुख्य उद्देश आहेत. या सर्व कामांमध्ये फेरीवाल्यांसाठी व रिक्षाचालक यांचेसाठी योग्य जागा देऊन त्यांना त्यांचे व्यवसाय सुरू ठेवता येतील अशा उपाययोजना देखील करण्यात याबाबत आयुक्त शेखर सिंह यांचेसोबत झालेल्या बैठकीत चर्चा केली आहे, असे नखाते यांनी नमूद केले.